संपादकीय

नमस्कार,

‘मोगरा फुलला’च्या सर्व मित्रमैत्रीणींना, हितचिंतकांना, या अंकासाठी साहित्य पाठविणार्‍या सर्वांना आणि समस्त वाचकवर्गाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ’मोगरा फुलला’चा हा दुसरा दिवाळी अंक, आपणां सर्वांच्या सदिच्छेने, सहकार्याने आणि संपादक मंडळातील सदस्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आकारास आला आहे. मराठी साहित्य निर्मितीला प्रोत्साहन मिळावं, सदर साहित्य प्रकाशित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावं आणि या निमित्ताने विचारांचं आदान-प्रदान होऊन स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा हा या दिवाळी अंकाचा उद्देश आपाल्या सर्वांना ज्ञात आहेच.

गेल्या वर्षीप्रमाणेच विविध प्रकारचं सहित्य आलं. संपादक मंडळातील सदस्यांनी त्यांची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली. परंतु, मी मात्र काही कौटुंबिक अडचणींमुळे विशेष हातभार लावू शकलो नाही याची खंत वाटते. अर्थात् माझी बरीचशी जबाबदारी उपसंपादक कांचन यांनी उचलल्यामुळे हा अंक ठरल्या दिवशी प्रकाशित करणं शक्य झालं हे मी आवर्जून सांगू इच्छितो. आमच्या विनंतीला मान देऊन अंकाच्या सजावटीची जबाबदारी श्री. फिरदोस कराई यांनी आत्मीयतेने उचलली, तर सिद्धहस्त कवयित्री क्रांति साडेकर यांनी अंकाच्या मुखपृष्ठासाठी समर्पक अशी काव्यरचना अल्पावधीत करून दिली याबद्दल त्यांना शतश: धन्यवाद.

तुम्हां सर्वांचा सहभाग आणि सहकार्य हीच या दिवाळी अंकामागची प्रेरणा आहे. हा प्रेरणेचा ओघ अखंड रहावा ही इच्छा आणि अपेक्षा. अंकातील लेखनावर, तसंच अंकाबाबतही आपले अभिप्राय कृपया नोंदवून आपण लेखकांना प्रोत्साहन द्याल याची खात्री आहे.

पुन्हा एकदा सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा!

लोभ आहेच, वृद्धिंगत व्हावा.
--
उल्हास भिडे
संपादक
मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११

Read more...

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP