आठवण

आठवण नसावी उन्हासारखी
मनास भाजून काढणारी
जेव्हा कधी येईल तेव्हां
हृदयी चटका लावणारी ॥१॥

आठवण नसावी थंडीसारखी
कमी-जास्त होत राहणारी
जेव्हां येईल तेव्हां तेव्हां
अंगास कापरं भरणारी ॥२॥

आठवण नसावी पावसासारखी
एकदाच येऊन जाणारी
भरभरूनी काही देताना
दुसर्‍याला रीतं करणारी ॥३॥

आठवण नसावी वार्‍यासारखी
फक्त वाहत राहणारी
मनी येऊनी जाताना
उगाच एकटं करणारी ॥४॥

म्हणूनच असे म्हणतात की...

आठवण असावी सावलीसारखी
सतत सोबत करणारी
आपण तिला सोडले तरी
आपल्याच जवळ राहणारी ॥५||

आठवण असावी शालीसारखी
मन-हृदयी ऊब देणारी
अपशब्दांचाही मारा होता
सद्‌विचारांनी जपणारी ॥६॥

आठवण असावी रिमझिमणार्‍या
धारांसारखी बरसणारी
कितिही विसरू म्हटले तरी
मनातच रुंजी घालणारी ॥७॥

आठवण असावी मंद झुळूक
मनास अलगद स्पर्शिणारी
कितिही दु:ख उरी दाटता
वास्तवातही हर्षविणारी ॥८॥
--
प्रियांका पाटणकर (सुचिता देवधर)
priyanka_sweetheart24@yahoo.co.in

10 comments:

Suhas Diwakar Zele October 20, 2011 at 1:35 PM  

आठवण असावी मंद झुळूक
मनास अलगत स्पर्शणारी
कितीही दु:ख उरी दाटता
वास्तवातही हर्षवणारी

सुंदर !!

क्रांति October 20, 2011 at 6:53 PM  

प्रियांका, फारच सुंदर कविता आहे! आठवणींचा किती वेगवेगळ्या कोनांतून आढावा घेतला आहेस! आवडली मनापासून.

ashokanand October 20, 2011 at 7:18 PM  

namaskar

tried to write to you on priyanka sweetheart24@yahoo.co.in in marathi
it could not be delivered to you.

Anonymous,  October 21, 2011 at 12:14 AM  

कविता करावी तर अशी
सुंदर,मन मोहवणारी
कोणी वाचेल तेव्हा
स्वत:च व्यक्त होणारी.......... :)

Shreya's Shop October 21, 2011 at 7:53 AM  
This comment has been removed by the author.
Shreya's Shop October 21, 2011 at 7:53 AM  

आठवण म्हणजे मनात रुंजी घालणारी, सद्‍-विचारांना जपणारी, आपल्याच जवळ रहाणारी आणि वास्तवातही हर्षविणारी...... बहोत खूब ! आता आठवण म्हटली की हेच आठवत राहील.

Shreya's Shop October 21, 2011 at 10:11 AM  

@ashokanand...... तो ईमेल आयडी

priyanka_sweetheart24@yahoo.co.in

असा आहे.

Suresh Shirodkar November 9, 2011 at 8:15 PM  

मस्त !!

आता आठवण म्हटली की हीच कविता आठवत राहील.

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP