आयुष्य

असंख्य जीवांचे पुंजके
या फलाटावर त्या फलाटावर
कुणाचा चुकलेला
बदललेला
कोण घाईत कुणी संथ
आपल्या आपल्यातच
प्रवेशासाठी तैय्यार…
जीव सगळी भानं, मर्यादा तोडून बेपर्वा
प्रवेशाचा धुमाकूळ!...
आधीच प्रवेशलेल्या हुशारांची स्थानं बळकट
मग नंतरचे कोण कुठे जमेल तसे
भांडून, उपकारावर, आधाराने
एकमेकांच्या पायावर, पुढे जाण्याच्या घाईत
असोशीने दाखल…
जागत, झोपेत प्रवास…
असंख्य स्थानकं आणि येणारे लोंढे लोंबकळत
त्यांचाही समावेश
त्यांची तर इच्छाही बळकट आणि दोरीही
मग सापशिडीतली शिडी गवसल्याचा वेग
स्थानकांवर न थांबता ती मागे टाकल्याचा आनंद…
नेहेमीच नाही तरीही वेळापत्रकाप्रमाणे
वेळेचं अंदाजपत्रक किंवा अंदाजपंचे वेळापत्रक…
पुन्हा कुणाचं सोडून जाणं, कोणाचं आगमन
कुणा भाग्यवंताला मिळालेलं
त्यानं करून घेतलेलं- स्वत:चं स्थान
स्वत:चं म्हणजे प्रवासाच्या अंतापर्यंतचंच…
कुणाला ते अंतीच गवसलेलं
तोपर्यंत चिकटून बसणाऱ्यांबद्दल चरफड…
संवेदी जीवांचं पाश तयार करणं
सुखदु:ख वाटणं, “वरच्याला” शिव्या घालणं
आपापली स्थानं सांभाळत
हिरीरीने, संतापाने, सौम्यपणे, नाईलाजाने, स्थितप्रद्न्य…
तोपर्यंत प्रवास संपत आल्याच्या खुणा
निर्गमनं
एवढा वेळ ताटकळणाऱ्यांना स्थानलाभ
चरफडीतून मुक्तता…
कुणा अध्यात्मी जीवाची मोडलेली
ब्रह्मानंदी टाळी
कुणाचे सुस्कारे, नि:श्वास
पायऊतार…
नीरवता… सुटलेसुटलेपण…
निर्वात पोकळी आणि
“ पुढे काय?”
रेल्वेच्या डब्यासारखंच
आयुष्यही!
--
विनायक पंडीत
winayak.pandit@gmail.com

10 comments:

विनायक पंडित October 20, 2011 at 5:46 PM  

सुहास! मन:पूर्वक आभार!

क्रांति October 20, 2011 at 6:50 PM  

क्षणभंगुर आयुष्यासाठी रेल्वेच्या डब्याचं रूपक खूपच नाविन्यपूर्ण आणि कल्पक आहे! रेल्वे स्थानकाचं आणि आयुष्यातल्या घडामोडींचं साधर्म्य थक्क करणारं! उत्तम कविता.

विनायक पंडित October 20, 2011 at 8:03 PM  

क्रांति तुमच्या अभिप्रायाचं मोल विशेष आहे! मनापासून आभार!

mau October 20, 2011 at 9:59 PM  

खुप सुंदर !!!

SUNIL JOSHI October 20, 2011 at 11:02 PM  

रोजचं जीवन आणि रेलवे ... सुंदर कल्पना ... सुंदर मुक्त काव्य ...

Anonymous,  October 20, 2011 at 11:21 PM  

रेल्वेच्या डब्ब्यासारख आयुष्यही..खर आहे ...
सुंदर विचार आणि मांडणी ...

अमित गुहागरकर October 21, 2011 at 3:07 PM  

आयुष्याला रेल्वेच्या डब्ब्याद्वारे उलगडवून दाखवलतं. प्रचंड आवडली.

अपर्णा October 21, 2011 at 10:02 PM  

मुंबईची असल्याने रेल्वेच्या डब्ब्याच रूपक जरा जास्त सार्थ वाटतय...:)

विनायक पंडित October 22, 2011 at 6:54 PM  

मनापासून आभार उमा!:)
सुनील! मन:पूर्वक धन्यवाद!:)
देवेन खूप खूप आभार!:)
अमित! मनापासून आभार!:)
अपर्णा मलाही! त्यामुळे मुंबईबाहेरच्याना कसं वाटतंय याची धाकधूक आहे! आभार!:)
आपल्या सर्वांना दीपावलीच्या सस्नेह शुभेच्छा!

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP