बाजार

वैशाखातल्या रणरणत्या उन्हाची तिरीप सुदामाच्या गावीही नव्हती. लांब लांब ढांगा टाकीत उजव्या हातात असलेल्या कासऱ्यानं बांधलेल्या कालवडीला खेचताना कधी तो तिच्या नावानं शिव्या हासडायचा, तर कधी लाडीला आपण कायमचे मुकणार या कल्पनेनं अश्रू ढाळायचा. चारापाण्याची व्यवस्था ठीकठाक होत नसल्यानंच केवळ त्याची लाडकी असलेली कालवड- लाडी, जिला त्यानं पोटच्या लेकराप्रमाणं वाढवले होते, ती त्याला पारखी होणार होती.

बोधेगावचा गुरांचा बाजार पंचक्रोशीतीलच नव्हे तर अख्ख्या जिल्ह्यातील दांडगा बाजार. गायी, बैल, म्हशी, शेळ्या-मेंढ्या तसेच उत्तम घोडे यांच्या चारच दिवसातील व्यापाराची उलाढाल दोनेक कोटीपर्यंत होत असे. गावठाणालगत ७०-८० एकराच्या विस्तीर्ण पठारावर दरवर्षी वैशाखात भरणारा हा गुरांचा बाजार शेतकऱ्यांना अनेक दृष्टीने सोयीचा होता. एक तर या दिवसात त्यांना अंमळ काहीसा मोकळा वेळ असतो. रब्बी पिकांच्या कापणी, मळणी सारख्या कामातून सवडही असते. बाकी हे बोधेगावचे पठार ग्रामपंचायतीच्या वनीकरण मोहिमेमुळे चांगलेच बहरले होते. गुराढोराना सावलीची काही ददात नव्हती तसंच जवळूनच नदी वाहत असल्याने पाण्याचीही चिंता नव्हती. त्यामुळे इथल्या गुरांच्या बाजारावर शेतकरी वर्ग जाम खूश असे.

"सुदाम्यारंऽऽ... " अशा जोरदार हाळीनं सुदामा भानावर आला. त्याचे पाय आपोआपच थबकले. कोण आपल्या नावानं ओरडतोय असं वाटून त्यानं मागं वळून पाहिलं तर काय.... मुंढेवाडीच्या पाटलाचा सालगडी बारकू एक दांडगी गाय हाकीत येत होता. नावाप्रमाणंच किरकोळ देहयष्टीचा बारकू तसा खूप जिगरबाज व मेहनती. म्हणूनच मुंढेवाडीतील नाथा पाटलाच्या आठ बैलजोडीच्या शेतीच्या दलखान्यात बारकू मुख्य गुमास्ता होता.

"आरं कामून असं भिंगरीवाणी पळाया लागलायस मर्दा? जत्रा काय पळून बिळून चालली का का?"
"तसं न्हवं बारक्या या लाडीला यकदाची उजवून टाकावी म्हंतुया, वैरणकाडीची लई आबदा चाललीया बग." चाणाक्ष बारकू सगळं काही समजला.

"सुदाम्या, तुला काय वाटतं, लाडी तुज्या वटीत बक्कळ पैका घालणार हाय व्हय? आरं पाठ पोट एक झालेली तपली कालवड... आयची आन, ढुंकूनबी बगनार न्हाय कुनी "

सुदाम्याचं काळीज लक्ककन हललं. दुष्काळानं त्याची पार वाट लावली होती. दीड एकराच्या वावरावर घरच्या आठ जणांची गुजराण होणे शक्यच नव्हते. लग्न झाल्यापास्नं सहा वर्षात तीन पोरांचं लेंढार, म्हातारा लंगडा बाप, नवऱ्यानं टाकलेली त्याची थोरली बहीण आणि तिची सात वर्षांची मुलगी आणि ही दोघं नवरा बायको असा गाडा हाकताना सुदामाची हबेलहंडी उडे. नाही म्हणायला त्याची कारभारीण हौसा मोठी हुशार होती. घरचं सगळं करून नवऱ्याच्या बरोबरीनं शेतात काम करायची. हळव्या सुदामाला तिचा खूप आधार वाटे. मोकळी असताना हौसा आसपासच्या वावरात तण कस्पट काढण्याच्या मोल मजुरीला जात असे. पाच सहा कोंबड्याही पाळल्या होत्या तिनं. पाटलाच्या मळ्यांतून भाजीपाला आणून गावात फिरून विकून होता होईल तेवढं आपल्या फाटक्या संसाराला ठिगळ लावणाऱ्या हौसाचा सुदामाला अभिमान वाटे.

"ए दोस्ता, कुटं तंद्री लागली म्हनायची तुजी..? अजुक चार फर्लांग दामटीत जायाचं हाय.. उचल की पावलं बिगिनं."

बारकूची सूचनाही रास्त होती. दिवस मावळावयाच्या आत ठिकाणावर पोहोचायला हवे असं वाटून सुदामानं आपला वेग वाढवला .

"बारक्या, येक इच्चारू का? "
"आरं बिनघोर इचार. तेवडाच टाइम पास हुईल दोगांचा" असं म्हणून बारकू मोठ्यानं हसला.
"न्हाई म्हंजी.. गाय कुनाची रं?.. तुज्या मालकाची तर न्हवं? "

सुदामाच्या या प्रश्नावर पुन्हा एकदा बारकू गडगडून हसला.

"सुदाम्या येडा हौदाच हाइस बग तू.. आरं एवढी दांडगी गाय बाळगायला मी काय तुज्यासारका शेतीवाला हाय व्हय? पाटलाच्या गोठ्यातली हाय ही काळी", असं म्हणून हातातली बिडी विझवून बारकू गायीच्या पाठीवरून हात फिरवू लागला.

"दोन वर्षापास्नं भाकड हाये. मालक म्हनला टाक इकून. "

हत्तीसारखी थोराड दिसणारी, सुलक्षणी अशी ती देखणी गाय बारकू का विकायला घेऊन चाललाय याचा आत्ता कुठं सुदामाला उलगडा झाला.

"बारकू, बाजारात यवडं उमदं जनावर.. लोक पारखूनच घेनार की रं... "

"खरं हाय लेका तुजं, पन मी काइ चार दीस तुज्यावानी तळ नाइ ठोकून बसनार या बोदेगावच्या पठारावर. "

सुदामा आणखीनच बुचकळ्यांत पडला. त्याचेकडे पाहत बारकू म्हणाला, "आरं मालकानंच सांगिटलय मपल्याला की शेतकरी कुनीबी काळीला इकत घेनार न्हाइत... कुनी इच्चारलं तरी हजार रुपडेबी सुटनार न्हाईत... तवा मालकानं सकत ताकीद दिलीय मला की सरळ कसाई गाटायचा आन वेव्हार संपवायचा. लई डोकेबाज बेनं, माजा मालक... म्हंतो कसा वजनावर ईक काळीला, आन आट-नऊ हजार घिऊन ये... आपून काय हुकुमाचं गुलाम... " असं म्हणत बारकूनं शर्टाच्या बाहीला डोळे पुसले.

सुदामा मात्र बारकूने केलेला उलगडा ऐकून हमसाहमशी रडू लागला. केवळ नाइलाज म्हणून, आर्थिकदृष्ट्या परवडत नाही म्हणून पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेली कालवड विकायला चाललेल्या, तिच्या होणाऱ्या वियोगानं अश्रू ढाळणाऱ्या सुदामाला कळेना की श्रीमंती उतू जाणारा तालेवार पाटील खाटकाला घरची गाय विकून पैसा का कमवू पाहतोय ते... त्याच क्षणी स्वतःला सुदामा पाटलापेक्षा श्रीमंत समजू लागला. त्याने मनोमन निर्धार केला की नाही कुणी घेतली कालवड तरी हरकत नाही पण पाटलासारखं खाटकाच्या दावणीला लाडीला बांधायची नाही, हे विचार मनात येऊन त्याला हलके वाटले.

एव्हाना दोघेही बाजाराच्या ठिकाणी येऊन पोहोचले होते. एका झाडाखाली दोघांनीही आपली पथारी मांडली, बरोबर आणलेल्या जित्राबांना बांधण्यासाठी त्यांनी खुंटे रोवले, वैरण विकत घेऊन त्यांच्यापुढे टाकली, थोडासा भाकरतुकडा खाऊन, दोघांनी बिडी शिलगावल्या आणि पाहू लागले वाट आपापल्या गुरांना विकत घेणाऱ्यांची.

*************

या कथेस महाराष्ट्र मंडळ, बेंगलोर येथील गणेशोत्सवात प्रसिद्ध झालेल्या ’स.न.वि.वि.’ या विशेषांकासाठी घेतलेल्या कथास्पर्धेस प्रथम पारितोषक देण्यात आले.

--
धनंजय जोग
drjog22@gmail.com

9 comments:

अमित गुहागरकर October 20, 2011 at 12:50 PM  

मनाला चटका लावणारी कथा आहे. पारीतोषिक मिळणे, रास्तच होतं. अभिनंदन..! :)

THEPROPHET October 20, 2011 at 1:05 PM  

छान जमलीय कथा...
पारितोषिकाबद्दल अभिनंदन!

Suhas Diwakar Zele October 20, 2011 at 2:35 PM  

मस्त... छान जमलीय कथा. पारितोषिकाबद्दल अभिनंदन :)

एकदम टिंग्याची आठवण झाली..

http://cinema-baghu-ya.blogspot.com/2009/08/tingya.html

क्रांति October 20, 2011 at 6:12 PM  

खूप खूप आवडली कथा. पारितोषिकाबद्दल हार्दिक अभिनंदन. कथा आहेच तेवढ्या ताकदीची.

Anonymous,  October 20, 2011 at 9:02 PM  

छान आहे कथा...पारितोषिकाबद्दल अभिनंदन

Kanchan Karai (Mogaraafulalaa) October 21, 2011 at 12:02 PM  

धनंजयजी, प्रथम पारितोषिकाकरिता हार्दिक अभिनंदन! आपल्यासारख्या मान्यवरांचे साहित्य या अंकात समाविष्ट झाले हे या अंकाचे भाग्य आहे. जीवाला चटका लावणारी कथा आहे. मुक्या जनावरांबद्दल आपल्याला किती ओढ असते, ते अशा प्रकारची नशीबाची परिक्षा पहातानाच लक्षात येतं.

ही कथा वाचताना लहानपणी गावी पाहिलेल्या ’भुर्‍या’ नावाच्या गोर्‍ह्याची आठवण झाली. त्याला बाजारात विकायचं असा मोठ्या काकांनी विचार केला तेव्हा माझ्या चुलत भावाने रडून खूप गोंधळ घातला होता. शेवटी तो भुर्‍याच्या गळ्याला मिठी मारून गोठ्यातच बसून राहिला, तेव्हा काकांना विचार बदलावा लागला.

सुधीर कांदळकर,  October 25, 2011 at 5:50 AM  

भाषा अस्सल गावरान, आवडली.

Unknown October 27, 2011 at 8:40 AM  

गावरान भाषेतली प्रतिभावान कथा !

dhananjay October 27, 2011 at 12:05 PM  

कथेबद्दल आपणां सर्वांकडून जो भरभरून प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल धन्यवाद !
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP