निर्माल्य

आज माझ्या डायरीत
केविलवाणं झालेलं
एक गुलाबाचं फूल सापडलं..
तुझ्या वाढदिवसाला घेतलेलं
आता बरचसं हिरमुसलेलं

डायरीच्या
त्याच दोन पानांवर दिसले
आठवणींच्या शिंतोड्यांसारखे
उमटलेले गुलाबी ठिपके

खिडकीबाहेर दिवसा मोहवणार्‍या
नेहमीच्याच गुलमोहराने
रात्री सावल्यांचे भेसूर आकार
नाचवावेत तसे...

आपल्या आठवणींच्या जणू
तशाच सावल्या झाल्या आहेत
आणि नातंही
त्या गुलाबासारखं....

वाहिलेल्या दुर्वांचं शेवटी
निस्तेज निर्माल्यचं होतं ना गं,
कालच्या पूजेची
अस्पष्ट आठवण करुन देणारं!
--
मंदार जोशी
mandarkelshikar@gmail.com

6 comments:

सुहास October 20, 2011 1:54 PM  

व्वा छान जमलीय... आवडली !!

अमित गुहागरकर October 20, 2011 2:15 PM  

जीवघेणी...!!! निव्वळ अप्रतिम..!!

Sonal B October 20, 2011 5:23 PM  

सुंदर!! मोजकं लिहितोस आणि तेच मनाला मोहून टाकणारं असतं!!

क्रांति October 20, 2011 9:20 PM  

खरंच खूप खोल तळाशी रुतून राहणारं लिहिलंय!

davbindu October 21, 2011 12:52 AM  

खुपच सुंदर लिहल आहे ... भापो ...

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP