मुखवटा

"डॉक्टर, हे घ्या आजचं पत्र!" नर्सनं एक कागद आणून डॉ. म्हांब्रेंकडे दिला.
"हे तेच का?" अभिजीतनं विचारलं.
"होय." डॉक्टर तो कागद नीट निरखत म्हणाले. "लिखाण बरंचसं गचाळ होऊ लागलंय." डॉक्टर तो कागद अभिजीतच्या हातात देत म्हणाले.
"ह्म्म. म्हणजे केस बिघडत चाललीय की सुधरत चाललीय." अभिजीत त्या लेखनाचा अर्थ लावायचा प्रयत्न करत होता.
"मला वाटतंय सुधारणा आहे. कारण बिघडलेलं हस्ताक्षर म्हणजे त्याच्या दुसर्‍या पर्सनालिटीचा त्याच्यावरचा कंट्रोल कमी कमी होतोय."
"पण कदाचित हे फ्रस्ट्रेशन वाढल्याचंही लक्षण असू शकतं ना? म्हणजे, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट डॉक्टर, पण माझ्या थिसिससाठी मी इतर ज्या केसेस बघितल्या, त्यावरून असं वाटलं मला."
"ह्म्म शक्य आहे." डॉक्टर चष्म्याची काच साफ करत म्हणाले.

अभिजीत ते पत्र निरखून वाचू लागला.

-----

फेड इन. पाण्याची मोठी लाट दरवाज्यावर एकदा धडकते. फेड आऊट. कट टू बेडरूम. पाच वर्षांचे सुशील आणि आयुब पलंगावर घाबरून बसलेत. कट टू आऊटसाईड. पाण्याची लाट खिडक्यांवरही आदळतेय. कट टू इनसाईड. पाण्याचा लोट दरवाजा तोडून आत शिरतो आणि हॉलमधला टीपॉय त्यात वाहतो आणि फिशटँकचा स्टँड कोलमडल्यामुळे फिशटँकही पाण्यात पडतो. प्रिफरेबली फिशटँक न फुटता, पाण्यातच तरंगत राहतो. आतल्या माशांच्या मोशनवर झूम इन. थोड्याच वेळात कशावरतरी आपटून फिशटँक फुटेल तोपर्यंत फॉलो करायचा. कट टू बेडरूम. सुशील आणि आयुब एकमेकांना घट्ट धरून बसलेत.चादरी स्वतःभोवती गुंडाळून. कट टू आऊटसाईड बेडरूम. पाण्याचा लोंढा बेडरूमचा दरवाजाही तोडून आत शिरतो. कट टू आऊटसाईड. पाण्याचा दुसरा लोंढा खिडक्या तोडून आत शिरतो. कट टू स्काय व्ह्यू. चहूकडे पाण्याचं थैमान. पाण्याखाली गेलेली घरं. भल्याथोरल्या झाडांचे नुसते दिसणारे शेंडे. कट टू बेडरूम. आयुब छताजवळच्या झरोक्यात थोडासा अडकतो आणि त्यातून बाहेर फेकला जातो. कट टू शेजारच्या घराचं छप्पर. आयुब तिथेच बेशुद्ध पडलाय. पाऊस मंदावलाय. पाणी ओसरलंय. कट टू रोड. बंद पडलेल्या असंख्य गाड्या. कट टू वन पर्टिक्युलर कार. एक जोडपं काचा बंद असलेल्या गाडीत गुदमरून मेलंय. कट टू आयुब. तो डोळे चोळत उठतो आणि घराकडे बघतो. कट टू झरोका. अंगानं लहानसा आयुब त्यात अडकल्याचा फ्लॅश. पुन्हा झरोक्याचा स्टिल शॉट. अन मग हळूहळू कॅमेरा खाली येऊन उघड्या खिडकीवर स्थिरावतो. कट टू इनसाईड बेडरूम. सगळं अस्ताव्यस्त, पण कुठेही सुशील नाही. कॅमेरा एका मोडक्या फोटोफ्रेमवर स्थिरावतो. सुशील अन त्याच्या आईवडलांचा (बंद कारमधलं मृत जोडपं) फोटो. कट टू स्काय व्ह्यू. शहरभर पडलेल्या मोडक्या कार्स, घरांचे भाग, झाडं अन प्रेतं. कट टू आयुबचा क्लोज-अप. फेड आऊट.

एव्हढं लिहून त्यानं वर पाहिलं. दूरवर निरूद्देश नजर फिरवली आणि एक उसासा टाकून चहाचा अजून एक घोट घेतला. पुन्हा एकदा लिहिलेल्या मजकुराकडे पाहिलं. त्याला एकदम जडत्व आल्यासारखं वाटलं. हातातलं पेन त्यानं खाली ठेवलं आणि पुन्हा दूरवर पाहण्यात हरवून गेला.

"एक्सक्यूज मी." त्यानं आवाजाच्या दिशेनं पाहिलं. "मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. रोज तुम्हाला इथे बसून लिहिताना पाहतो." त्याच्या चेहर्‍यावरचे त्रासलेले भाव पाहून तो पोरगेलासा युवक घाईघाईनं पुढे म्हणाला. "तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं. पण उद्या मी देश सोडून दोन-तीन वर्षांसाठी शिकायला परदेशी चाललोय. तर जाण्यापूर्वी तुमची सही घ्यावी म्हणून तुम्हाला डिस्टर्ब केलं. खरंच सॉरी!"

तो हलकंसं हसला आणि त्यानं पेन उचललं. त्या युवकानं स्वतःच्या बॅगेतून चटकन त्यानंच लिहिलेलं एक पुस्तक काढलं आणि त्याच्यासमोर धरलं. त्यानं स्वतःच्या पुस्तकाचं कव्हर निरखलं. पुस्तकावर एका चेहर्‍याची सावली अर्धी काळी आणि अर्धी पांढरी काढलेली होती आणि मानेच्या मुळाशी 'मुखवटा' हे शीर्षक फराटे ओढल्याप्रमाणे लिहिलेलं होतं. आणि कोपर्‍यात त्याचं नाव. स्वतःचं नाव त्यानं बराच वेळ टक लावून पाहिलं आणि मग पुस्तकाच्या नावाकडे पाहून तो स्वतःशीच हसला. मग पहिल्या पानावर त्यानं संदेश लिहिला, "स्वतःची ओळख बनवा." आणि खाली स्वाक्षरी करून त्याला दिलं. एव्हढ्यात मोठे फटाके फुटल्याचा आवाज आला आणि पाठोपाठ काचा फुटल्याचा. दोघांचीही नजर आवाजाकडे गेली आणि त्यांच्या सर्वांगाचा थरकाप उडाला. दारात दोन मशीनगनधारी तरूण उभे होते. अन त्यांच्या कोवळ्या चेहर्‍यांवर खुनशी भाव होते. त्यांनी खिशातून दोन ग्रेनेड्स काढून भिरकावली. प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे हे दोघेजण टेबलखाली शिरून पाहू लागले. धूर कमी झाल्यावर थोडं नीट दिसू लागलं एव्हढ्यात दोघांची बखोटी धरून एकानं त्यांना टेबलाखालून बाहेर ओढलं आणि त्यांच्यावर मशीनगन रोखून उभा राहिला. त्यांचं टेबल भिंतीकडे असल्यानं ते सापळ्यातच अडकलेले होते. दुसर्‍यानं बंदुकीचा धाक दाखवून उर्वरित टेबलांवरच्या अद्याप जिवंत असलेल्या लोकांना ह्यांच्याजवळ आणलं आणि एका ओळीत उभं केलं. ह्या गदारोळात तो लिहित असलेले कागद इतस्ततः पसरले. तो विषण्णपणे सर्वत्र पसरलेला रक्त अन मांसाचं थारोळं पाहत होता. त्यानं असंच थारोळं कित्येक वर्षांपूर्वी पाहिलं होतं, फक्त कारणं वेगळी अन कर्ते वेगळे. त्यावेळेसचं संकट अस्मानी होतं, ह्यावेळेस इन्सानी. त्याच्यासोबतचा मुलगा पुरता गर्भगळीत झाला होता.

-----

"हे काही नीट वाचता येत नाहीये डॉक्टर." अभिजीत वाचण्याचा प्रयत्न सोडत म्हणाला.
"मजकूर नेहमी तोच असतो, त्यामुळे मला सवयीनं वाचता येतो." डॉक्टर स्मित करत पुढे म्हणाले. "तुमच्यासाठी सुरूवातीच्या काळातलं एक पत्र काढतो." असं म्हणत डॉक्टर उठून त्यांच्या कपाटाकडे गेले.
"पण असं नक्की काय घडलं होतं त्यादिवशी की ह्यांच्या डोक्यावर इतका परिणाम झाला." अभिजीत म्हणाला.
"नक्की काय घडलं ते, ते स्वतः सोडून कुणालाच माहित नाही आता." डॉक्टर एक फाईल काढत पुढे म्हणाले, "नेहमीच्याच कॅफेमध्ये बसून पुढच्या सिनेमाची स्क्रिप्ट लिहित होते. तेव्हा अतिरेकी हल्ला झाला. अतिरेक्यांनी ग्रेनेड्स फेकली आणि अंदाधुंद गोळीबार केला. हे एका प्रेताखाली अडकले आणि चारीबाजूंनी रक्तामांसाचा खच पडला होता. हे निश्चेष्ट पडून राहिल्यामुळे बहुतेक हे जिवंत की मेलेले ते अतिरेक्यांनाही कळलं नसावं, त्यामुळे ते तिथून निघून गेले. पुढे अतिरेक्यांचंही एन्काऊंटर झालं. त्यामुळे त्या कॅफेमध्ये असलेल्यांपैकी हे एकटेच जिवंत आहेत आता."

डॉक्टरांनी एक कागद काढून अभिजीतसमोर धरला.

-----

"भाईजान, जल्दीसे उडा डालते हैं सबको, आगे भी जाना है. यहां से स्टेशन और फिर हो सके ते अस्पताल में जाके बाकी भाईयों की मदद करनी है!" ह्या वाक्यानं सगळ्यांचीच गात्रं गोठली. पण त्याच्या चेहर्‍यावर एक वेगळंच समाधान झळकू लागलं. तो वेगळ्याच नजरेनं त्या हलणार्‍या बंदुकींच्या नळ्यांकडे पाहू लागला. त्याला काही ऐकू येईनासं झालं. ते रक्त-मांसांचं थारोळं अन पस्तीस वर्षांपूर्वीची ती चित्र, सगळं एकामागोमाग एक त्याच्या डोळ्यांपुढे फिरू लागलं. आणि अचानक बंदुकीच्या नळीच्या धक्क्यानं तो भानावर आला.
"चले पँट उतार." दोघांमधला एकजण त्याच्या बरगडीवर बंदुकीची नळी आपटत त्याला दटावत होता. त्याला काहीच कळेना.
"चल उतार साले पँट, नहीं तो ऐसेही उतार दूंगा गोली." असं म्हणून त्यानं बंदुकीची नळी त्याच्या बक्कलात अडकवून ओढली आणि त्याची पँट खाली पडली. बंदुकीची नळी त्यानं जेव्हा अंतर्वस्त्रात घातली तेव्हा त्याचं डोकं ताळ्यावर आलं आणि त्याला सगळ्या गोष्टींचा संदर्भ लागला. त्याचं लक्ष बाकीच्यांकडे गेलं आणि बंदुकीचा दस्ता त्याच्या डोक्यात बसला आणि तो खाली पडला. डोक्यात पुढचा काही विचार येण्याच्या आतच उभ्या सगळ्यांवर गोळ्यांचा वर्षाव झाला. तो जमिनीवर स्वतःच लिहिलेल्या कागदांच्या आणि रक्त-मांसाच्या चिखलात पडला होता. "मुझे भी मारो. मुझे भी मारो." असं त्याला ओरडावंसं खूप वाटत होतं पण तोंडातून शब्दच फुटत नव्हते. त्याची सही मागणार्‍या मुलाचं प्रेत त्याच्या अंगावरच पडलं होतं आणि त्याला अचानकच खूप जडत्व आल्यासारखं वाटू लागलं. तो तसाच निपचित पडून राहिला.

-----

अभिजीत परत परत ते पत्र वाचत होता.

"तारीख - २७ नोव्हेंबर

सुशील,

कुठे आहेस तू? आहेस ना तू खरंच? तू असायलाच हवंस रे. तू जर नसशील तर कसं चालेल. मी किती ओझी उचलू रे! हे ओझं असह्य होत होतं म्हणून मी ते उतरवायचा प्रयत्न करत होतो. पण त्यात दुसरंच ओझं डोक्यावर आलं. आणि आता हे नुसतंच असह्य नाही तर अशक्य झालंय. मी एकटा हा भार उचलू नाही शकणार. एक तर तू ये, नाहीतर मला यावं लागेल. आजपासून शंभर दिवस मी तुझी वाट पाहीन. त्यानंतर मी तुझ्याकडे येईन.

तुझाच आयुब."

"हा आयुब नक्की कोण डॉक्टर?" अभिजीत म्हणाला.
"हा सुशीलकुमारांचा लहानपणीचा जिवलग मित्र."
"...?"
"सुशीलकुमारांच्या आई-वडलांकडे घरकामाला येणार्‍या बाईचा तो मुलगा. ते लहान असताना, घरकामाची बाई आयुबला सुशीलकुमारांच्या घरी सोडून इतर घरी कामांना जायची. ज्यादिवशी अचानक पूर आला, त्यादिवशी सुशीलकुमारांचे आई-वडील पावसाचा रागरंग बघून अत्यावश्यक सामानाचा साठा करावा ह्या इराद्यानं बाहेर पडले आणि लगेच येता येईल हा अंदाज असेल कदाचित, पण त्यांनी मुलांना घरीच ठेवलं. अन बाहेर मात्र ट्रॅफिकचे बारा वाजले आणि अचानक आलेल्या पुरानं सगळंच गणित बिघडवलं. पुरात सुशीलकुमार वाचले, पण आयुब मात्र कुठेतरी वाहून गेला. तो कुठे गेला ते कुणालाच कधीच कळू शकलं नाही. सुशीलकुमारांच्या आई-वडीलांना त्यांच्या पालकांनी, प्रेमविवाह केल्यामुळे टाकलं होतं. पण ह्या दुर्घटनेनंतर त्यांनी कधी तोंडही न पाहिलेल्या आपल्या नातवाला जवळ केलं, अन सुशीलकुमारांचं आयुष्य वाया जाण्यापूर्वी सावरलं. पण त्या जखमेच्या खुणा त्यांच्या मनावरून कधीच पुसल्या गेल्या नाहीत. त्यांनी आजवरची सगळी पुस्तकं आयुबला डेडिकेट केलीत आणि प्रत्येक सिनेमाच्या सुरूवातीला त्यांच्या आई-वडलांच्या फोटोनंतर ज्या ओळी लिहून येतात, त्यात हा सिनेमा आयुबला डेडिकेट केल्याचंही लिहून येतं."
"येस, येस, तो फोटो जो येतो, तो पुरातूनही वाचलेला त्यांच्या आई-वडीलांचा एकमात्र फोटो आहे नाही का? तो अर्धा फाटलेला आहे पुरात. वडलांचं धड आणि सुशीलकुमार अख्खेच त्यामधून गायब आहेत. फक्त आई आणि वडलांचा चेहरा."
"होय बरोबर. तर असा हा आयुब. इम्प्रेशनेबल एजमध्ये असं झाल्यावर मनावरचे ओरखडे कायम राहतात." डॉक्टर गंभीरपणे म्हणाले.
"तरी मृत्यूच्या तांडवामुळे डोक्यावर परिणाम होणं समजू शकतो मी. पण पस्तीस वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या मित्राच्या पात्राची कल्पना करून आपण स्वतःच तो आहोत असं कल्पून मग स्वतःलाच रोजरोज पत्र लिहिण्याचं कारण मला समजू शकत नाहीये." अभिजीत म्हणाला.
"आधी मला पण कळत नव्हतं की ह्या दोन घटनांचा संबंध कसा लावायचा. मग त्यांच्या सेक्रेटरीनं मला सांगितलं की जेव्हा हा हल्ला झाला, तेव्हा ते ज्या सिनेमाची स्क्रिप्ट लिहित होते, तो त्यांच्या स्वतःच्या आयुष्यावरच बेतलेला होता. त्यांची आत्मकथा. त्यामध्ये ते पाच वर्षांचे असताना आलेला तो पूर आणि त्यामध्ये ते कसे त्यांच्या मित्राबरोबर अडकले आणि कसे ते एकटेच वाचले आणि ह्या सगळ्यामुळे त्यांच्या आयुष्याला वेगळंच वळण कसं लागलं, हे सगळं ते दाखवणार होते. कदाचित हा सगळा स्क्रिप्टचा एक भाग असेल जो ते तेव्हा लिहित होते. तशीही त्यांच्या सिनेमाची स्टाईल थोडी फँटॅस्टिकलच असते."
"पण म्हणून असं? दिवसरात्र फक्त त्याचाच ध्यास घ्यायचा आणि इतका की आपण स्वतःच आयुब आहोत असं समजू लागायचं?"
"मानवी मनाचे खेळ शंभरातून नव्याण्णव वेळा कुणाच्याही समजण्यापलीकडचे असतात."

अभिजीत ते जुनं पत्र आणि त्यादिवशीचं ताजं पत्र ताडून पाहत होता. आणि एकदम तो चमकला.

"डॉक्टर, हे त्यांनी लिहिलेलं पहिलं पत्र आहे?"
"हो. का? काय झालं?"
"डॉक्टर, ह्याच्यावरची तारीख वाचलीत? २७ नोव्हेंबर."
"हो २६ नोव्हेंबरला दुर्घटना झाली आणि २७ ला ते इथे भरती झाले."
"डॉक्टर! आज ६ मार्च आहे." अभिजीत उठून उभा राहत म्हणाला.
"मग?" डॉक्टरांना कळेना.
"डॉक्टर आज शंभरावा दिवस आहे."
"डॅम!" डॉक्टर ताडकन उठत म्हणाले. टेबलावरची बेल वाजवत त्यांनी कोट उचलला आणि ते केबिनबाहेर पडले. पाठोपाठ अभिजीतही बाहेर पडला.
"नर्स, सुशीलकुमारांवर आज स्पेशल लक्ष ठेवा. आज काहीतरी होऊ शकतं. चला आधी माझ्यासोबत, मी एकदा चेक करतो त्यांना."
डॉक्टर अन अभिजीत नर्ससोबत सुशीलकुमारांच्या खोलीकडे गेले. नर्सनं खिडकीतून डोकावून पाहिलं.
"झोपलेत ते." नर्स म्हणाली अन तिनं दरवाजा उघडला.
डॉक्टर अन अभिजीत आत गेले. डॉक्टरांनी नस चेक केली अन त्यांना धक्काच बसला. दोन्ही हातांच्या नस इंटॅक्ट होत्या, गळा नॉर्मल होता. तेव्हढ्यात डॉक्टरांनी प्रेताचा खिसा चेक केला. आणि त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. त्यांनी प्रेताचं तोंड उघडलं आणि त्याच्या घशामध्ये कोंबलेला एक कागदाचा बोळा बाहेर काढला.
"स्मार्ट वे टू कमिट स्युसाईड." डॉक्टर उसासा टाकत म्हणाले.
"हे काय आहे?" अभिजीतला कळेना.

कागदाचा बोळा उघडत डॉक्टर म्हणाले, "आयुबचा लहानपणीचा फोटो. ते कायम स्वतःजवळ ठेवायचे. नो वन थॉट ऑफ धीस."

अभिजीत तो फोटो निरखत होता. 'कुठल्यातरी मोठ्या फोटोतून फाटून उरलेला वाटतोय.' तो स्वतःशीच म्हणाला.
--
विद्याधर भिसे
vnb2005@gmail.com

11 comments:

सुहास October 20, 2011 at 11:11 AM  

विषण्ण झालो रे एकदम..सगळं कसं डोळ्यासमोर आलं. :(

मस्त लिहिलीयस कथा..!!

क्रांति October 20, 2011 at 6:44 PM  

वेगळ्या विश्वात नेणारी कथा! शैली खूपच आवडली. अगदी खिळवून ठेवलं अखेरपर्यंत.

मीनल गद्रे. October 20, 2011 at 7:14 PM  

प्रसंग डोळ्यासमोर घडताहेत असे वाटले.

विनायक पंडित October 20, 2011 at 7:17 PM  

श्वास रोखून वाचत राहिलो कथा! एकदम वेगळी आणि खूप छान!

Anonymous,  October 20, 2011 at 10:37 PM  

हैटस ऑफ यार ...
खुपच छान पद्धतीने लिहिली आहेस कथा ...आवडली ...

Kanchan Karai October 21, 2011 at 12:47 PM  

विभि, एकदम हटके कथा लिहिली आहेस. अगदी मागच्या वेळेसारखीच. पत्रामधे लिहिलेला पुराचा सीन तंतोतंत डोळ्यांसमोर उभा रहातो. अशाच भन्नाट कथा लिहीत रहा.

अपर्णा October 21, 2011 at 9:52 PM  

एकदम हटके...मस्त..and the end it too good...

Anjali October 22, 2011 at 4:16 PM  

absolutely stunnig...perfect suspence..........great end............

Anonymous,  October 23, 2011 at 10:17 PM  

Good one I am sure most of them must have read the end twice...

Bhaanasa October 26, 2011 at 4:33 PM  

विभि,खुपच छान लिहिली आहेस कथा.
आवडली!

Nisha October 27, 2011 at 3:57 PM  

या घटना डोळ्यासमोर घडताहेत असं वाटत राहतं. हे कसब तुमच्या शब्दांचं आणि शैलीचं. अभिनंदन. हे असं लिहिताना बराच त्रास होतो. नाही? पण तरीही ते लिहिल्याशिवाय चैन पडत नाही. हिच ती लेखनाची ऊर्मी! त्यासाठी अनेक शुभेच्छा. ही दीपावली तुम्हा सर्वांना आनंदाची आणि भरभराटीची जावो.

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP