एकदा हे करून तर पाहू

शु s s s s s s s s s ssssssssss बा sssssssssssssssssss स्स्स, बास्स............. खूप झालं....................................... खूप ऐकून घेतलं...... आता बास..........

मी, मी आहे म्हणून का एवढं सहन करू, आणि किती सहन करू, सहनशक्तीला पण काही मर्यादा असतात, मर्यादेला पण काही सीमा असतात. आता मी बोलणार, आणि काय हो ? का बोलू नये मी,..... मी बोलणार आणि तुम्हाला ऐकावंच लागेल.

झालं परत एकदा मनामनात द्वंद्व सुरु झालं. आज परिस्थितीच अशी उद्भवली आहे कि मनाचे कितीतरी भाग झालेत आणि डोक्याचा अगदी भुगा होऊन गेलाय. त्यातच अण्णा म्हणतात कि भ्रष्टाचार करू नका. का करू नका? प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी अडकल्या आहेत, किंबहुना त्या तश्या अडकवून ठेवल्या आहेत, शे-पाचशेची चिरीमिरी दिल्याशिवाय ही साधी सरळ कामेसुध्दा होणार नाही. अण्णांना काय जातंय सांगायला.

खूप विचार केला आणि विश्वासाने सांगतोय तुम्ही सर्व ऐकून घ्या, या देशाचं काहीही होणार नाही, जसं आहे तसं सुरु राहू द्या त्यातच सगळ्यांचं भलं आहे आणि मी म्हणतो कशाला या नसत्या उठाठेवी करायच्या, पूर्ण यंत्रणा बुडालेली आहे, मी एकट्याने भ्रष्टाचार थांबवला तर त्याचा समूळ नाश थोडीच होणार आहे.

आज मुलाचा जन्म झाला, नोंदणी झाली पण जन्माच्या दाखल्यात नावाच्या ठिकाणी मुलगा असं लिहिलंय. मग बरोबर आहे ना, तुम्ही कायद्याप्रमाणे जन्माच्या सात दिवसांच्या आत जन्माची नोंदणी केली, मग त्यात नावाच्या रकान्यात मुलगा असंच लिहिणार ना. कायद्याला कुठे कळतंय कि मुलगा झाल्यावर बाराव्या दिवशी बारसे करतात आणि मग नांव ठेवतात आणि तो पर्यंत नोंदणी थांबवली तर कायद्याचा बडगा नाकी नऊ आणतो पण हे सर्व सांगेल कोण आणि समजावेल कोण? तर महत्वाचा मुद्दा, जन्माच्या दाखल्यात नांव लिहावयाचे आहे, दोनशे रुपये दिले तर ३ दिवसात, ३ प्रतीत नांव घालून मिळेल. काय म्हणता, अण्णा हजारे आगे बढो हम तुम्हारे साथ है, एक छदाम देणार नाही! राहिलं, उद्या या हा अर्ज करा, प्रतिज्ञापत्र पत्र द्या, बारश्याची पत्रिका लावा, दोन साक्षिदाराचे प्रतिज्ञापत्र द्या आणि १५ दिवसांनी या, मग पाहू काय करायचे आहे, सगळं काही नियमानुसार होईल पण केव्हा होईल ते सांगता येत नाही. काय मंडळी काय करू, अण्णांना बोलावू की देऊन टाकू दोनशे रुपये?

मुलगा शाळेत गेला, मग महाविद्यालयात, मग नौकरी, मग लग्न, मग संसार, रेशन कार्ड, वैद्यकीय दाखला, पॅन कार्ड, ओळखपत्र, मग त्यांची मुलं आणि परत पहिले पाढे पंचेवीस...... किती वेळा अण्णांना उपोषणाला बसविणार, मी काहीच करू नये. पण काय करू शकतो मी? काहीच नाही? हॅ हे काय जगणं झालं? नाही पण मी काही तरी नक्कीच करणार काय करू? काही सुचत नाही, कुठून सुरुवात करू. कुणी तरी मार्गदर्शन करा.

कसलं मार्गदर्शन मागताय काही मिळणार नाही, जे आहे ते मुकाट्याने सहन करायचं आणि दिवस भरले कि एके दिवशी मरून जायचं. पण काहो, खरंच काहीच मार्ग नसेल? केवढी ही दुर्बलता, हताशा, हतबलता आणि तेही स्वतंत्र भारतात. नक्कीच काही तरी मार्ग असेल. आपण शोधू म्हणजे सापडेल.

आपण असं करू पुढील निवडणुकीत सगळ्या म्हणजे अगदी सगळ्या लोकांना सांगू कि मतदान करा, तो तुमचा हक्क आहे. अगदी १००% मतदान झालंच पाहिजे मग बघुया कशी यंत्रणा ठीक नाही होत ते. पण काहो मतदान करायचं म्हणजे निवडणुकीच्या दिवशी... हो हो त्याच दिवशी ज्या दिवशी सार्वजनिक सुटी असते, त्याच दिवशी मत द्यायचं. पण कुणाला ? कारण फार तर फार १० टक्के सोडले तर सगळीकडे सारखीच लोकं आहेत. मग का करायचं मतदान. कारण मतदान केलं कि परत हेच ९० टक्के लोकं येणार आणि परत ये रे माझ्या मागल्या. मग काय हो? करायचं ना मतदान १०० टक्के? हो हो. पण मतदान असं करायचं कि १० टक्क्यांमधून १०० टक्के लोकं निवडणुकीला उभे करायचे आणि त्यांना निवडून आणायचं. होईल हे सर्व? जमेल हे सहज? हो हो, का नाही जमणार, एक दिवस असा येईल कि निवडून येण्यार्‍या १०० टक्के लोकांमध्ये कुणीही ९० टक्क्यामधील माणूस प्रतिनिधित्व करणार नाही. सगळे कसे निरभ्र, स्वच्छ आणि मग सुरु करायची यंत्रणेची साफसफाई. ती जाहिरातीतली बाई नाही का एकदाच रिनने घासते आणि इतरांचे कपडे पिवळे दिसतात. खालच्या वर्गापासून तर वरच्या वर्गापर्यंत सर्वत्र साफसफाई. आम्हाला देश चालवायचा आहे पक्ष नाही. फार तर फार निवडणुकीच्या वेळी आम्ही पक्ष-पक्ष खेळू, पण एकदा का निवडणुकीचा निकाल लागला कि पक्ष गेले उडत आम्ही सर्व भारतीय, भारत देश चालवू. अगदी कायद्याने. संपूर्ण निवडून आलेल्या लोकांचे सर्वसमावेशक शासन देशावर राज्य करेल. ते देशवासियांचे, देशवासीयांनी, देशवासियांकरिता चालविलेले राज्य, रामराज्य आणि तुम्ही खात्री बाळगा असं नक्की होणार. हवी तर मी खात्री देतो.

मग सर्वप्रथम देशाच्या काना-कोपर्‍यात चाललेल्या घडामोडीचा सखोल अभ्यास करू आणि त्याप्रमाणे कायदे तयार करू. हो हो, नव्याने तयार करू. त्या कायद्यामध्ये कुणा एका साठीही पळवाटा नसतील. गुन्हेगाराला शासन होईल, हो हो अगदी त्याच्या हयातीतच होईल. मग कुणी एकमेकांना वाचविण्यासाठी नैतिकतेचा बाजार मांडणार नाही, द्वेषपूर्ण चाली खेळणार नाही.

मग जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात शे-पाचशेची चिरीमिरी द्यावी लागणार नाही. तशी यंत्रणाच राहणार नाही. अण्णांना त्रास होणार नाही, किंबहुना असल्या उपोषणाची गरजच भासणार नाही. त्याकरिता फक्त एक मला करावं लागेल, मला माझी मानसिकता बदलावी लागेल. लाल दिवा लागल्यावर मला थोडं थांबायची सवय करावी लागेल. जास्त नाही फक्त एक मिनिट कारण त्यानंतर माझ्यासाठी परत हिरवा दिवा लागलेला असेल. अरे तो तसा नेहमीच लागतो, फक्त मला वेळ नसतो, मुलखाची घाई झालेली असते, पण मी यानंतर तो एक मिनिट अगदी गाडी बंद करून थांबेन, परत दिवा हिरवा होण्याची वाट पहात.

जाऊ द्या काहीतरीच काय, कसल्या स्वप्नरंजनात आहात तुम्ही. तुम्ही म्हणता म्हणून आम्ही तुमच्या बोलण्याकडे लक्ष ठेवायचं आणि त्या प्रमाणात वागायचं ? जमणार नाही........... तुम्ही तुमच्या जागी शहाणे आणि आम्ही आमच्या जागी.

आज देशात काय चाललंय पहा, जरा डोळसपणे बघायला शिका. ज्यांच्या हातात शक्ती असते ते शक्तीचा वापर, गैरवापर कसाही करू शकतात, तुम्ही त्यांचे काही पण वाकडे करू शकत नाही. एकामागून एक घोटाळे झालेत, काय केलं तुम्ही, समिती आणि त्यांच्या बैठका, उपयोग काय शून्य, तुम्हाला स्वप्नांत राहण्याची सवय झाली आहे. आज हतबलतेने कळस गाठलेला आहे. सगळीकडे नैराश्य आहे, संवेदना मृत पावल्या आहेत आणि तुम्ही काय घेऊन बसलात. म्हणे रामराज्य. हॅ!

तेच तर तुम्हाला कळत नाही. नियोजन, योग्य रीतीने नियोजन केलं तर सर्व काही शक्य आहे. आता हेच बघा, मुल जन्माला येण्यापूर्वी मुलगा किंवा मुलगी होईल या अंदाजाने आईवडील बाळाचे नांव आधीच पक्के करतात, फक्त त्यावर बारश्याच्या दिवशी शिक्कामोर्तब करतात. मग, कायद्याप्रमाणे नोंदणी करताना ते नांव अर्जात लिहायचे जेणेकरून बारश्याच्या आधीच जन्माचा दाखला नावासकट हातात पडेल. किती कष्ट पडलेत हे सर्व जमवून आणायला, कशाला द्यायचे दोनशे रुपये. पण नाही तुम्ही सवयीचे गुलाम. बघा बघा मी सांगतोय तसं करून बघा.

निवडणुकीत निवडून आलेल्या १०० टक्के लोकांमधून मग ते कुठल्याही पक्षाचे असो राज्य करायचे तसे त्यांचेकडून करवून घ्यायचे. राज्यकारभारात प्रतिनिधित्व प्रत्येक निवडून येणार्‍याला द्यायचे मग तो कुठल्याही पक्षाचा असो. शेवटी तुम्हाला संपूर्ण देशवासियांचे, देशवासीयांनी, देशवासियांकरिता चालविलेले राज्य प्रस्थापित करायचे आहे. संविधानात असे कुठे म्हटलेय कि अमुक एका पक्षाचेच राज्य राहील आणि अमुक एक पक्ष विरोधी गटात राहील. निवडणुकीनंतर येणारे राज्य हे सर्वसमावेशक असेल, मग त्यात, पक्ष, जात, रंग, भेद, उच्च, नीच, धर्म या सर्वांचे प्रतिनिधी असतील, मग कोण कुणाच्या उणीदुणी कशाला काढेल आणि समजा काढलेच तर जनता त्याला योग्य जागा दाखवेल. किती दिवस आपण स्वत:ला निर्बुद्ध समजायचे आणि तसे समजू द्यायचे. आता पर्यंत तसे समजू दिले आणि किती नुकसान आपण स्वत:चे करून घेतले. अहो ६५ वर्षात अगदी पिढ्या निघून जातात, निसर्गाचे एक अख्खे चक्र पूर्ण होते, आणि आपलीच प्रगती होऊ नये. देशाभिमान आणि स्वाभिमानाला चांगले खतपाणी घाला मग बघा कसे सोन्यासारखे पीक येते.

कसं आहे ना, थोडी मानसिकता बदलण्याची गरज आहे. तेवढी बदला... शब्दाचा मान महत्वाचा. भारतीयतेसमोर कसली आलीय जात आणि धर्म, उच्च आणि नीच, गरीब आणि श्रीमंत, राजा आणि रंक, या दुहीमधील कुणीही उच्च वर्गाचा असला म्हणून कानाने खात नाही ना. प्रत्येकाला निसर्गाच्या चाकोरीतुनच जावयाचे आहे. त्याच्या समोर कुणाचेही चालत नाही. आता नेमकं काय होतंय की प्रत्येकाला स्वर्गात जायचं आहे पण मरायला कुणी तयार नाही. त्यामुळे आता प्रत्येकाला मरावंच लागेल आणि तेव्हाच स्वर्ग दिसेल.

थोडं थोडं कळतंय पण पूर्णपणे पटत नाही. तुमचा खूप विश्वास आहे असं दिसतंय खरं पण काहो असं होईल. तुम्हाला तरी वाटतंय का? झालं झालेत ना आडवे, अहो विचार आधी प्रगल्भ करा. तुम्हाला नकारघंटाच वाजवायची सवय. इकडे कळतंय म्हणता मग रुजवा ना. हं थोडासा त्रास होईल पण शेवटी फायदा सगळयांना.

अनुशासन हा एक महत्वाचा मुद्दा. मला वाटतं कि घरातल्या प्रत्येकाने किमान एक वर्ष देशाची सेवा मिलिटरीत जाऊन करावी. मग कळेल कि देश म्हणजे काय. तुम्हाला काय, स्वातंत्र्य अगदी आयतं मिळालं म्हणून त्याची किंमत नाही, जरा झळ पोहोचू द्या मग कळेल. तिकडे सीमेवर आपला जवान प्राणांची पर्वा न करता अहोरात्र झटतोय म्हणून आपल्याला शांत झोप येतेय त्यामुळे त्यांच्या सेवेची कदर नाही. मग पाठवा ना घरातला प्रत्येक माणूस मिलिटरीत, जाऊ द्या सीमेवर, मग कळेल डाळआट्याचा भाव. घरात बसून गप कुणीही मारतो हो. जरा बाहेर निघा, देशावर प्रेम करा, मग बघा देश कसा त्याची परतफेड करतोय ते. प्रत्येक घरात सैनिक असल्यावर कुठला आतंकवादी आपल्याकडे नजर वर करून बघेल.

मग करायची सुरुवात, फार काही नाही, फक्त मानसिकता बदला, प्रेम, माया, माणसांमाणसा वर देखील करा. काय हरकत आहे, इतर धर्माचा, जातीचा, पंथाचा असला तर काय झालं आपल्याला फक्त माणसावर प्रेम करायचं आहे. वृत्ती बदला, सगळं काही बदलेल.

घ्या मग माझ्यासोबत शपथ, आम्ही कुठलाही भ्रष्टाचार करणार नाही, झोपलेल्या देशाभिमानाला, स्वाभिमानाला जागे करू, प्रत्येकावर प्रेम करू, भारतीयत्वाचा स्वीकार करू, एकदा का आपण प्रगतिपथावरून प्रगती साध्य केली कि निवांत होताना भरपूर वेळ मिळणार आहे भांडण्यासाठी, पण तत्पूर्वी एकदा प्रेम करून तर पाहू. देशाला एकदा फक्त एकदा घडवून तर पाहू.

बघा आज मनामनात द्वंद्व झाले नसते तर नैराश्याच्या गर्तेत अडकून पडलो असतो. पण आज कळले कि मी कितीही हतबल झालो असलो तरी मला देखील विचार करता येतो. काहीतरी चांगले करायची इच्छा व्यक्त करता येते त्याची अंमलबजावणी करायची प्रेरणा मिळते, असे द्वंद्व प्रत्येकात झाले पाहिजे, मी तर माझा मार्ग निवडला आहे, सगळे उपाय करून झालेत आता अनुशासन आणि नियोजनाच्या माध्यमातून एकदा हे करून तर पाहू.
--
जयंत अलोणी
jhaloni@gmail.com

4 comments:

क्रांति October 20, 2011 at 7:44 PM  

अगदी मनापासून पटलं.

Jayant October 21, 2011 at 2:36 AM  

धन्यवाद,
आपणाला ते पटलं
शतशः धन्यवाद.......

Kanchan Karai October 22, 2011 at 11:54 AM  

१००% पटलं. कल्पना प्रत्यक्षात उतरवणं कठीण असलं तरी अशक्य नक्कीच नाही आणि सर्वांना पटलं तर कठीणही रहाणार नाही.

Meena October 23, 2011 at 5:44 PM  

सर्वसामान्य माणूस म्हणून प्रत्येकाच्या मनात मूल्य आणि वस्तुस्थिती यांचा झगडा चालू असतो .ती घुसमट योग्य शब्दांत मांडली आहे .अवघड आहे ,पण अशक्य मात्र नाही ,दीपावलीच्या शुभेच्या ............

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP