स्वत:साठीही जग गं...

तू नेहमीच मनस्वी वागायचीस. स्वत:वर आसुसून प्रेम करायचीस. अगदी लहान होतीस तेव्हांही आणि आता ’सरलं किती - उरलं किती’चा हिशोब स्वत:च वारंवार मांडू लागलीस, तरीही. तुझा अट्टाहासी, झोकून देण्याचा स्वभाव तसाच, किंबहुना जास्तीच मनस्वी झालाय. मनात एखादी गोष्ट आली की त्या क्षणापासूनच तू स्वत:ला त्या गोष्टीस समर्पित करून टाकायचीस. योग्य-अयोग्य, गरज, शक्य-अशक्य, यासारख्या माझ्या मध्यमवर्गीय शंकाकुशंका कधीच तुला पडल्या नाहीत. चुकून कधी मी त्या तुझ्या डोक्यात भरवण्यात कणमात्र यशस्वी झालेच तर, तू ते कधीच मला दाखवले नाहीस आणि त्या कणमात्र शंकांना लगेचच कचर्यााची टोपली दाखवायला चुकलीही नाहीस.

परिणामांची तुला कधीच भीती नव्हती आणि क्षितीही. एखाद्या गोष्टीला किती वाहून घ्यायचं हे परिमाणात तू मोजलं नाहीस की त्या वेड्या ध्यासातून तुला सुखाची-दु:खाची-प्रेमाची-अवहेलनेची-तिरस्काराची-रागाची आणि शब्दात न मांडता येणार्याख ’ त्या ’ काही जिव्हारी भावांची प्राप्ती होईल याचीही फिकीर केली नाहीस. मोजके, अगदी बोटावर मोजण्या इतकेच अपवाद वगळता हा मनस्वी अट्टाहास तुला अपयशच देऊन गेला. तरीही तू थांबलीच नाहीस.

नक्की काय शोधत होतीस गं तू? का कोण जाणे, ’खरंच का काही शोधत होतीस तू?’ या प्रश्नातून मी कधीच बाहेर आले नाही. आजही हा प्रश्न तसाच अनुत्तरित आहे. अर्थात मी तुला कधीच उत्तर विचारले नाही. जे तुझ्याकडे नाही ते विचारण्यात काय मतलब गं? उगाच तुझ्या डोळ्यात त्या प्रश्नाने क्षणमात्र उठणारी वेदनेची लहर, कुठेशी लागलेली बोच, ठसठसणारी ठेच उघडी पडायची अन् मीच त्यात जखमी व्हायची, नेहमीसारखीच पुन:पुन्हा.

.... आताशा तुझ्या वेदनांची-ठेचांची दुखरी ठणठण सोसायची ताकद नाही गं माझ्यात. म्हणून बये, वारंवार तुला सावरायचा फोल प्रयत्न मी सोडत नाही. तुला आवडो न आवडो, पटो न पटो... तू माझीच... माझ्यातच सामावलेली आहेस ना बयो.... म्हणून माझा हा दुबळा अट्टाहास सोडत नाही. त्या विक्रमादित्यासारखीच मी ही सदैव प्रयत्न... प्रयत्न आणि प्रयत्न करते आहे. पाहू कोण जिंकते ते. कुठेतरी, कधीतरी तू थकशील.... थांबशील.... शांत बसशील..... मी वाट पाहीन. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत..... मात्र जिंकेन नक्की.

ही आयुष्यभर अशीच सामान्य... नाही नाही, मध्यमवर्गीयच राहणार. अगदी लाडका शब्द आहे तिचा हा. या मध्यमवर्गाचे चांगलेच फावले आहे. काही जमले नाही, काही मिळाले नाही... अहं... मिळवता आले नाही की लगेच याच्यावर खापर फोडून मोकळे व्हायचे. जरा चौकटीच्या बाहेर जायची वेळ आली की लगेच याची ढाल पुढे करायची.

मनात कितीही भरार्‍या मारायची ऊर्मी उसळली तरी, "छे! हे कुठले आपल्या आवाक्यात... " असे म्हणत तेच तेच घिसेपिटे, मागल्या पानावरून पुढच्या पानावर मिळमिळीत आयुष्य उलटत राहायचे. बदल गं जरा स्वत:ला. हे बागुलबुवे तूच उभारलेस, तेही अनाकारण. अगं, इथे स्वत:चे झालेय जड तिथे दुसर्‍याच्या आयुष्याची उठाठेव करायला कोणाला वेळ आहे?

काय म्हणतेस? स्वत:च्या पायाखाली काय जळतेय हे पाहायला वेळ नसेल पण लोकांच्या घरची खडानखडा माहिती आहे.

बरं. समजा असेलही तू म्हणतेस तसे. त्याने तुला काय गं फरक पडतो. मुळात तुझा स्वत:कडे पाहण्याचा चष्मा बदल. लोक काय म्हणतील.... हे शब्दच तुझ्या कोशातून हद्दपार कर. आणि लोकांचे काय घेऊन बसलीस, त्यांना स्वत:च्या टोचणीतून सुटका हवी असते ना. मग करतात हा दुसर्‍याच्या जीवनात डोकावण्याचा टाईमपास. तू कधीपासून लोकांच्या या छंदाला भीक घालू लागलीस? अगं ते तुला जगायला देत आहेत/नाहीत हा संभ्रम का पडावा? एकेक नवलच ऐकते आहे मी हे. जरा जग गं मनापासून.... मनसोक्त! इच्छा, ओढ, आस फक्त मारण्यासाठीच नसते गं. उद्या तू फट्‌दिशी मरून गेलीस ना, तर लोकं त्यांना म्हणायचे तेच म्हणतील फक्त तुझा जीव मात्र गेलेला असेल. मग ही भावनांची आसुसलेली भुतं धड ना तुला मरू देतील धड ना दुसर्‍या जीवात जगू देतील.

अजूनही वेळ गेलेली नाही. जगायचे, का रोज... अव्याहत कणाकणाने कुढत मरायचे..... निवड तुलाच करायची आहे. निदान ती तरी मोकळी होऊन.... निर्भयपणे कर..... करशील ना?

चला. आजचा एपिसोड संपला रे. आताशा ही प्रतिबिंबांची लढाई वारंवार होऊ लागली आहे. का? भुवया का उंचावल्या तुझ्या? ’प्रतिबिंब’ म्हटले म्हणून? मग काय म्हणू? खरं सांग, ’तुला तरी कळतेय का, खरी कुठली आणि छबी कुठली? ’भेसळ इतकी बेमालूम आहे की माझा पाराही ओळखू शकत नाही आताशा. म्हणा, मी ही काहीसा जीर्ण, विदीर्ण झालोय. कुठे कुठे पारा उडलाय... विरलाय.... त्या विरलेल्या तुकड्यात दिसणारी तिची तडफड पाहवत नाही. वाटतं, सांगावं तिला.... इतरांसाठी जगच गं बयो पण त्याचबरोबर स्वत:साठीही जग गं... स्वत:साठीही जग...
--
भाग्यश्री सरदेसाई
shree_279@yahoo.com

5 comments:

Anonymous,  October 21, 2011 at 12:56 AM  

विचारांची आवर्तन शब्दात छान मांडली आहेस.शेवटचा संदेशही खूप आवडला ....

Kanchan Karai (Mogaraafulalaa) October 22, 2011 at 1:44 PM  

रंच गं ताई, दुसर्‍यासाठी जगता जगता स्वतःसाठी जगायचं राहूनच जातं नाही. नुसतं श्वास घेणं म्हणजे जगणं नव्हे ना!

भानस October 26, 2011 at 4:56 PM  

उमा, देवेन, कांचन अभिप्रायाबद्दल अनेक आभार! :)

भानस October 26, 2011 at 4:56 PM  

उमा, देवेन, कांचन अभिप्रायाबद्दल अनेक आभार! :)

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP