बिअरडा

श्रावण महिना सुरु झाला की आमच्या घरी कांदा, लसूण, वांगी बंद केले जायचे. चार महिने कांदा लसूण वांगी बंद! आमच्या घरी कांदे नवमी साजरी केली जायची. कांद्याचं थालीपीठ ते कांदा भजी. सगळे प्रकार लागोपाठ दोन तीन दिवस चालायचे. मजा यायची. अशा बाळबोध घरात वाढलेला मी पण जेंव्हा पासून नॉनव्हेज खाणं सुरु केलं तेंव्हा पासून मी स्वतः कधीच विधिनिषेध पाळला नाही. बाराही महिने नॉनव्हेज चालतं मला.

श्रावण महिना हा व्रतवैकल्याचा महिना. या दिवसात नॉनव्हेज खाणं योग्य नाही असं समजणारे लोकं आहेत. काही लोकं, जे नियमीतपणे खातात ते चातुर्मासात नॉनव्हेज खाणं सोडतात. एखाद्या दिवशी मंदिरात जायचं असलं तरीही नॉनव्हेज न खाणारे लोकं आहेत. मला वाटतं की ठराविक दिवशी नॉनव्हेज बंद करणे म्हणजे एक प्रकारे नॉनव्हेज खाणे वाईट किंवा धर्माविरुद्ध आहे हे मान्य करणे! स्वतःवर अशा प्रकारे बंधनं घालून घेणे म्हणजे स्वताडन करणे नाही का?

गटारी म्हणजे पिऊन गटारात पडण्याचा कार्यक्रम. मला वाटतं की गटारी अमावस्या हे नांव जे पडलं आहे ते खाण्यावरून नाही तर पिण्यावरून. काही लोकं चातुर्मासात दारू पिणंदेखील बंद करतात. हे गटारी नावच इतकं सर्वसमावेशक आहे, की त्या नावातच सगळं काही येतं. वाईन, व्हिस्की, रम आणि मला आवडणारी गोष्ट म्हणजे बिअर!

काही लोकं फक्त उन्हळ्यातच बिअर पितात पण मला मात्र १२ही महिने बिअर आवडते. आता आवडते म्हटलं म्हणजे मी काही रात्र अन दिवस नुसता बाटल्या रिचवत बिअरच्या बाटल्यांच्या ढिगा शेजारीच बसलोय असं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहील कदाचित पण तसं नाही.... एखादी गोष्ट जी कडसर चवीची, उग्र वास असलेली का आवडावी हा पण एक प्रश्नच आहे. कुठल्याही मित्रांच्या (लग्ना पूर्वीच्या) पार्टी मधे कायम बिअरच घ्यायचो मी - म्हणून मित्र मला बिअरडा म्हणायचे... (दारूडा च्या चालीवर :))

पूर्वी तर कुठलीही ऑफिसची वगैरे पार्टी असली, तरीही स्कॉच पेक्षा मी बिअर किंवा ओल्ड्मॉन्क प्रिफर करायचो. सुरुवात तर ओल्ड्मॉन्क पासूनच झाली - कोला मधे मिक्स करुन. (मित्रांनी जबरदस्तीने पाजली असे नाही. मी स्वतःच माझ्या ग्लासातल्या कोलामधे थोडी मिक्स केली होती. बहुतेक वेळा लोकं म्हणतात की मित्रांनी फसवून पाजली वगैरे. माझ्या बाबतीत तसं झालं नाही.) रमची कोला मधे मिक्स केल्यानंतरची चव आवडली आणि नंतर मग तोच ब्रॅंड झाला माझा. जरी बिअर आवडायची तरीही!

वय आणि सोबतच पोटाचा व्यास वाढायला लागल्यावर मात्र ऑफिस पार्टी मधे बिअर बंद करून सो कॉल्ड ’जंटलमन्स ड्रिंक ’म्हणजे व्हिस्कीचा ग्लास हातात घेतला. एक पेग+ सोडा मिक्स करुन पार्टी संपेपर्यंत पुरवायचा हा प्रकार सुरु केला. काहीही झालं तरीही एका पेग पेक्षा जास्त घ्यायची नाही हे नक्की ठरवलेलं असायचं. पार्टी मधे ग्लास हा शेवटपर्यंत हातात रहायलाच हवा हा एक अलिखित नियम असतो. तुमच्या हातात ग्लास नसला की तुमचा एखादा ज्युनिअर "सर - क्या हुवा? मै लेके आता हूं ... वगैरे वगैरे". मग दुसरा नको असेल तर जो ग्लास हातात आहे त्यातच पुन्हा पुन्हा नुसता सोडा किंवा पाणी मिक्स करुन ग्लास हातात धरून ठेवायचा. आणि हो, हा ग्लास नेहेमीच टिशू पेपरने गुंडाळून ठेवायचा असतो म्हणजे त्यातल्या व्हिस्कीचा वारंवार सोड्याने टॉप अप केल्यामुळे झालेला पाण्यासारखा रंग लोकांना दिसत नाही!

गेली कित्येक वर्ष मार्केटींग मधे काम केल्यावर, सोशल ड्रिकिंग म्हणून सुरू झालेली बिअर कधी आवडायला लागली हेच लक्षात आलं नाही. इतकं झालं तरीही मी कधीही बिअर किंवा इतर दारूच्या आहारी कधी गेलो नाही. तसं म्हंटलं, तर नेहेमीच कंपनी अकाउंटवर बाहेर रहावं लागतं, त्यामुळे पैशाचा प्रश्न नव्हताच आणि त्यामुळे सवय लागायची खूप शक्यता होती. पण देवदयेने खाण्यामधे इतका जास्त इंटरेस्ट आहे की ड्रिंक्सच्या नादी फारसा लागलोच नाही. कुठेही टूर ला गेलो की मी खाणं कुठे जास्त चांगलं मिळतं तेच शोधत असतो. दुसरं म्हणजे अल्कोहोल घरी आणायची नाही आणि प्यायची नाही हा नियम केला होता स्वतःच.

पूर्वी मी जेंव्हा नागपूरला मार्केटींग मधे होतो, तेंव्हा मुंबईला वर्षातून दोन वेळेस मिटींग साठी यावं लागायचं, तेंव्हा आमचा मुक्काम डिप्लोमॅट हॉटेल मधे असायचा- ताज च्या मागच्या गल्लीतलं. मुंबईचं नाईट लाइफ त्याच काळात पाहिलंय. कदाचित मुंबईकरांनी पाहिलं नसेल इतकं जवळून पाहिलंय. रात्रीची मुंबई! आम्ही जवळपास ७-८ लोकं असायचो. वेगवेगळ्या ठिकाणून आलेले. सगळे जण एका घोळक्यानेच फिरायला जायचो- त्यामूळे जरा सेफ वाटायचं इतकंच.

एकाच हॉटेल मधे बसून टाइम पास करण्यापेक्षा निरनिराळ्या हॉटेल्स मधे जाणं आवडायचं आम्हाला. आमच्या हॉटेलच्या बाजूच्याच एका गल्ली मध्ये एक मला वाटतं की गोकुळ नावाचं हॉटेल होतं. तिथे तर चक्क गे बार होता - हे तिथे गेल्यावर लक्षात आलं. तिथे जाण्याची चूक पुन्हा केली नाही.

एक ’क्राउन ऍंकर’ नावाचा बार पण असाच. ताज च्या मागे, डिप्लोमॅट हॉटेलच्या शेजारी होता हा. तिथे गेल्यावर तर चक्क पिक अप जॉइंट आहे हे लक्षात आलं. भरपूर मुली इकडे तिकडे फिरतांना दिसल्या - ते सगळं पाहिलं आणि आम्ही अक्षरशः पळत बाहेर निघालो तिथून. शेवटी रिगल शेजारच्या लिओपाल्ड मधे अड्डा बनवला होता आम्ही. तिथे एकदम सेफ वाटायचं. पण नंतर परत रुमवर येतांना रस्त्यावर मात्र खूप त्रास व्हायचा. असो.. रात्री लिओपाल्डमधली बिअर बार बिअर ढोसण्यात (पिण्यात नाही, बिअर ही ढोसायची असते) जी मजा आहे, त्याला तोड नाही.

आत्तापर्यंत तुम्ही वाचलं असेल आणि 'हे काय लिहिलंय' असा प्रश्न पडला असेल. काय झालं, एक मित्र आहे तो स्वतःशीच खूप हासत बसला होता. विचारलं की "काय झालं रे?" तर म्हणाला, "काल घरी गेलो होतो, तेंव्हा घरचीच भावाने अमेरिकेतून आणलेली स्कॉच ची बाटली उघडली होती." मी म्हणालो "बरं मग? त्यात काय झालं इतकं हसायला?" तर तो म्हणाला थांब काय झालं ते सांगतो आणि त्याने हसता हसता सांगणे सुरु केले. त्याचं आणि त्याच्या बायकोचं संभाषण खाली देतोय.

ती: तुला पापड देऊ का रे भाजून...?

तो: दे ना! ( थोडा आश्चर्यचकीत झालेला. च्यायला बायको चक्क पापड देऊ काय म्हणते आहे?)

थोड्या वेळा नंतर...म्हणजे अगदी दोनच मिनिटांनी पुन्हा...

ती: काय रे, थोडं फरसाण देऊ का डीश मधे?

तो: हो, दे नां.. चालेल. (आश्चर्याचा धक्का - च्यायला! झालं तरी काय बायकोला?)

थोड्या वेळाने किचन मधून डोकावून तिने प्रश्न विचारला, "सॅलड देऊ का रे चिरून? आणि अजून काही हवे का? नाही तर फ्रीज मधे चीज आहे ते देऊ का तुकडे करून?"

या प्रश्नाला पण त्याने पुन्हा "होय" म्हणून उत्तर दिल्यावर ती विचारते, "आता इतकं सगळं केलं आहेच, तर 'मुंगळा मुंगळा, मै गुडकी भेली' म्हणून डान्स करू का आता?"

त्याने बिचाऱ्याने बाटली बंद केली आणि जेवायला बसला.

तर हे बिअर पुराण इथेच संपवतो. एक गोष्ट बाकी आहे, आता नॉनव्हेज खात नाही, सिगरेट, तंबाखू सगळं काही सोडलंय. पण माझ्यासारखा हाडाचा बिअरडा कधी बिअर सोडू शकेल?
--
महेंद्र कुलकर्णी
kbmahendra@gmail.com

4 comments:

Anonymous,  October 21, 2011 at 1:17 AM  

तुमच्या मित्राच्या घरच दृश्य अगदी डोळ्यासमोर आल ...बिचारा ... :)

बाकी लगे रहो महेंद्रजी ... :)

mau October 21, 2011 at 3:31 PM  

प्रामाणिक मत द्या असे आवर्जुन म्हटल्यावर विचार करत होते देउ का नको.उगाच वाईट वाटेल म्हणुन नाही दिले मत..पण मग रहावेना.
हा लेख नाही आवडला हो.तुमच्या कडुन खुप अपेक्षा होती.ब्लॉगवर पण बहुदा नसताच आवडला.आणि दिवाळी अंकात तर नाहीच.विविध चांगल्या विषयांवर तुम्ही लिहु शकता.पण ह्या वेळेस असे का झाले.. हिरमोड झाला.असो !!!

THE PROPHET October 21, 2011 at 4:53 PM  

हाहाहा... काका जबरा!!
पण खरंच बिअर आवडू कशी शकते हा प्रश्न मला पडतो.. पण इतके लोक आवडीनं पितात ह्याचा अर्थ दोष माझ्यात आहे! ;)

Kanchan November 8, 2011 at 11:35 AM  

बिअर हे एक "सेफ" ड्रिंक आहे त्यामुळे पिणार्‍यांपैकी बर्‍याच जणांना ते आवडतं. तर काही "अट्टल" पिणारे बियरला ’गर्ल्स ड्रिंक्स’ म्हणूनदेखील हिणवतात. अर्थात, कुणी काय प्यावं आणि त्याला काय म्हणावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मुंबईचं नाईट लाईफबद्दल मुंबईकर जास्त बोलणार नाहीत कारण पिकतं तिथे विकत नाही. मुंबईतल्या लोकांना समुद्राचं आकर्षण वाटत नाही पण बाहेरून येणार्‍यांना ते वाटणं साहजिकच आहे. कधीतरी कॅफे मॉन्डीगर मधे जाऊन या. तिथल्या समोरच्या दोन भिंतींवर काही कार्टून्स आहेत, त्यांच्यात एक मजेशीर कनेक्शन आहे. जमलं तर पहा.

पण महेंद्रजी प्रामाणिकपणे सांगते, तुमचा लेख अर्धवट वाटला मला. "बियरडा" म्हटल्यावर तुमच्याकडून बियरबद्दल जास्त माहिती अपेक्षित होती. उदा. शॅम्पेन ऑफ द बियर कुठल्या बियरला म्हणतात आणि का? किंवा प्रत्येक बियरची चव एकसारखीच असते की काही फरक असतो? किंवा बिअर पितानाचे एटिकेट्स काय आहेत? किंवा बियर ग्लासमधे कशी ओतावी? किंवा बियरचा पिण्याव्यतिरिक्त इतर उपयोग आहे की नाही? किंवा अल्कोहोल काचेच्या ग्लासमधूनच का पितात? वगैरे वगैरे पिंटचा खरा उच्चार पाईंट आहे पण कथा, कादंबर्‍यांमधून पिंट म्हणलं जातं, म्हणून इथे सर्व पिंटच म्हणतात. आपल्याकडे व्होडकासुद्धा शॉट मधे न पिता बर्‍याचदा पेग मधे सर्व्ह केली जाते. असो.

अल्कोहोल घरी घेऊन न जाण्यात काय प्रयोजन आहे, हे नाही समजलं. पोटात अल्कोहोल घेऊन घरी गेलेलं चालतं तर अल्कोहोल सोबत घेऊन घरी गेलेलं का चालत नाही? मला लेखाचा आणि विनोदाचा संबंध नाही कळला. तुम्ही नॉनव्हेज, सिगारेट सोडलीत? किती दिवसांसाठी ;-)) म्हणजे आता तुमच्या फेसबुकवरच्या चविष्ट नॉनव्हेज डिशच्या फोटोंना मुकणार आम्ही :(

अरे बापरे! माझी प्रतिक्रिया वाचल्यानंतर इथे हा लेख वाचणार्‍या काही पुरूष मित्रांचे डोळे बाहेर तर येणार नाहीत ना? ;-) पुरूषाने दारूबद्दल लिहीलं तर तो दिलखुलास स्वभावाचा आणि स्त्रीने असं काही लिहिलं तर...? अर्थात बियरबद्दल माहिती करून घेण्यासाठी बियर प्यावीच लागते असं नाही काही. सायनाईड कुणी खात नाही, ते विष आहे, हे माहित करून घेण्याकरता!

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP