त्याचे घर

खरंतर हे जोडीदाराबरोबर मजा करण्याचं, संसार थाटण्याच वय त्याचं. पण का कोण जाणे, अजूनही तो तितकासा उत्साही नव्हताच. सगळ्या मित्रांना आपापले बस्तान बसवताना पाहून तो अस्वस्थ व्हायचा. पण त्यांच्या प्रथेप्रमाणे घरं बांधून मग जोडीदार शोधण्याचा उत्साह त्याच्यात अजूनही आला नव्हता. कुणी याबद्दल छेडलं की लक्ष नसल्यासारखं करून तो हा प्रश्नच टाळायचा.

त्यादिवशीही असंच त्याचं उगीच इकडेतिकडे करणं चालू होतं. मात्र आजूबाजूला सगळेच एकदम आपापल्या कामात व्यग्र असल्याचे पाहून त्याला अजूनच कसंतरी वाटायला लागलं. एकटेपणाची भावना मनात घर करायला लागली. "हम्म! चला आता संसाराच्या तयारीला लागायलाच हवं. जवळपासचे ओळखीतले सगळेच संसाराच्या पाशात अडकत आहेत. वय आहे तोवर आपणही विचार करायला हवाच." तो स्वत:शीच पुटपुटला.

"एक जोडीदारीण शोधायला हवी हे खरंच. पण त्या आधी एक घरही हवं. घर बांधायचं म्हणजे कमी का कटकट असते? आपणही एखाद्या गुहेबिहेत राहत असतो तर काय छान झालं असतं." त्याचा वैताग पुन्हा एकदा उफाळून वर आला.आळस घालवण्यासाठी तो उठून आसपास चक्कर टाकायला निघाला. पुढच्याच वळणावर त्याचा एक जिवलग मित्र भेटला.

"काय मग? काय चालू आहे सध्या? " त्याने सहज चौकशी केली.
"एकदम मजेत. आजच तिला घेऊन जाणारे घर दाखवायला!"

मित्राच्या उत्तराने तोच विषय समोर आला. इकडचं तिकडचं जुजबी बोलत मित्राला कटवून तो पुन्हा एकदा निघाला. आता पुन्हा कोणी भेटू नये म्हणून नेहमीपेक्षा वेगळ्याच वाटेवर भरकटत राहिला. पण बहुतेक आज दिवस वाईटच होता त्याचा. या अशा दूरच्या जागीही त्याला पुन्हा एक जण ओळखीचा भेटला.

"काय इथे इतक्या दूर कसे काय? " त्या ओळखीच्याने हटकलेच.
"असंच, आलो फिरत फिरत. तुम्ही इथे कसे काय? " त्याने काहीच न सुचून विचारले.
"अहो इथे या बाजूला घराचे मटेरियल चांगलं मिळतं. त्याच्याच शोधात आलो होतो. तुम्ही बांधताय की नाही घर?"

पुन्हा एकदा तोच विषय ऐकून तो खरंच वैतागला. काहीतरी थातुरमातूर उत्तर देऊन कसाबसा निघाला. आता त्याच्याने पुढे जाववेना. काही खायची इच्छाही नव्हती म्हणून गुपचूप परत येऊन नेहमीच्या आसऱ्याला बसला. 'आता उद्या मात्र आळस झटकून कामाला लागलंच पाहिजे,' असा विचार करतच केव्हातरी झोपेच्या अधीन झाला.

सोनेरी किरणे घेऊन उगवलेला दुसरा दिवस मात्र एकदम छान होता. कालचा वैताग कुठल्या कुठे पळून गेला होता. सकाळीच सगळं आवरून तो उत्साहाने घरासाठीच्या जागेच्या शोधात निघाला. आपल्या भावी जोडीदारिणीला आवडेल अशी जागा त्याला शोधायची होती. "दोघांच्या संसाराला सोयीची हवीच पण पुढे बाळालाही सोयीची हवी." आपल्या या विचाराचे त्यालाच हसू आले. "अजून नाही जोडीदाराचा पत्ता आणि आपण कुठल्या कुठे पोचलो!"

बराच वेळ शोधाशोध केल्यावर एक चांगली जागा नजरेत भरलीच त्याच्या. "आजचा दिवस एकदम भारीच आहे. आज जागा शोधायला सुरुवात केली काय आणि ही जागा आवडली काय! सगळंच कसं जुळून येतंय. आता दोन चार दिवसात या जागेचं ठरवून टाकलं पाहिजे. नाहीतर हातची जायची." असा विचार करतच तो जागेच्या आसपास भटकून आला. आसपासचा परिसर पाहिल्याशिवाय जागा कशी आहे ते कळणारच नाही हे त्याला नक्की माहीत होतं. पुढचे दोन चार दिवस धावपळीतच गेले. पण जागा मात्र याच्या नावे झालीच. "आता आळसाला थारा नाही. लवकरात लवकर घर बांधायला घ्यायला हवं. आपल्या गावात काही मजूर वगैरे मिळत नाहीत. आपलं आपल्यालाच बघायला हवंय सगळं." असा विचार करत त्याने घराचा आराखडा आखायला घेतला.

आपण इतके भराभर काम आटोपू शकतोय याबद्दल त्याचे त्यालाच खूप आश्चर्य वाटत होते. घर बांधणी वाटते तितकी कठीण नाहीये आणि उपजत असलेल्या कौशल्याने काम फारच लवकर होतंय हे पाहून तो स्वतः वरच खूश होता. चांगल्या प्रतीच्या बांधकाम साहित्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शोधणे. ते सामान घेऊन येणे हे सगळे खरेतर फार वेळखाऊ होते. पण कुठल्याशा अनामिक उत्साहाने त्याने हे काम लवकरात लवकर पूर्ण करायचा चंग बांधला होता.

अर्ध्यावर बांधकाम होत आले होते. त्यादिवशी बाहेरून पाहणी करताना अचानक त्याला ती दिसली. तिची नजरही खरेतर त्याच्यावरच होती. त्या पहिल्याच नजर भेटीने दोघांच्याही मनात चलबिचल झाली. पण त्याने फारसे काही न दाखवता पुन्हा एकदा कामात व्यग्र असल्याचा आव आणला. मन मात्र तिचीच चाहूल घेत होतं. पुढचा काही काळ असाच एकमेकांकडे बघण्यात गेले. नाही म्हणायला घराचे काम थोडे थंडावलेच. त्यादिवशी धीर करून त्याने तिच्याशी गप्पा मारल्या. आधी अशाच आजूबाजूच्या, मग थोड्या आवडी निवडी आणि मग मनातल्या गुजगोष्टी. त्या गप्पा सरता सरू नयेत असेच त्याला वाटत असले तरी प्रत्यक्षात तसे होत नाही हे ही खरेच. पुन्हा लवकरच भेटण्याच्या आणाभाका घेऊन दोघे आपापल्या रस्त्याने निघून गेले.

'आता मात्र घराकडे थोडं लक्ष द्यायला हवं. तिला आवडेल असं घर सजवायलाही हवं', हे त्याला प्रकर्षाने वाटून गेलं. "बाहेरचा भाग होतोच आहे बांधून, पण थोडं आतूनही सजवूयात आणि तिला दाखवूयात", असा विचार करत दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उठून तो आतल्या सजावटीच्या तयारीला लागला. पुढच्या एकदोन दिवसात त्याने आतल्या भिंती छान सारवून गुळगुळीत केल्या. त्यांच्या प्रथेप्रमाणे पानाफुलांची नक्षी करून सजवल्या. उद्या भेटल्यावर तिला घर बघायचे आमंत्रण देण्याचे मनाशी ठरवून तो स्वप्नांच्या गावात निघून गेला.दुसऱ्या दिवशीची भेट पुन्हा नेहमी सारखीच नवीन आणि नव्याने ओढ लावणारी ठरली. हलकेच तिचा हात हातात घेत त्याने तिला घरी येण्याबद्दल विचारलं. लाजत लाजत तिनेही होकार दिला आणि तो आनंदाच्या झुल्यावर झुलायला लागला. त्यादिवशी ठरल्याप्रमाणे तो तिला घेऊन घरापाशी आला. अजून थोडं बांधकाम बाकी होतं पण तरी स्वतः बांधलेले घर तिला दाखवण्याचे त्याला भारीच अप्रूप होतं. घरात येताच तिच्यासाठी सजवलेली भिंत पाहून ती अगदी हरखून गेली. घरातच त्याने तिला आपली जोडीदार बनण्याविषयी विचारले आणि तिच्या होकाराने सगळे घर आनंदाने भरून गेले.

घराचे उरलेले बांधकाम मात्र दोघांनी जोडीने केले. आतल्या सजावटीबद्दल तिच्या खास सूचना होत्या. तिने तिला हवे तसे अगदी छान सजवून घेतले. तिच्या सहवासाने आणि मदतीने त्याच्या उत्साहाला पारावार नव्हता. कधी एकदा घर पूर्ण होतंय आणि आपण एकत्र राहायला जातोय असे त्याला होऊन गेले आणि शेवटी एकदा तो दिवस उजाडला.

एका सोनेरी संध्याकाळच्या गोरज मुहूर्तावर मावळत्या सूर्याच्या साक्षीने त्यांनी गृहप्रवेश केला. आपल्या हातांनी बांधलेलं घर पुन्हा पुन्हा कौतुकाने पाहण्यात दोघे गुंग झाले. इतक्यात "जरा बाहेर जाऊन आलोच गं" असं म्हणत तो बाहेर गेला.

"थांब आता रात्रीचा कुठे..?" अशी साद घालेपर्यंत तो दिसेनासाही झाला. ती एकटीच त्या अंधाऱ्या घरात त्याची वाट बघत राहिली.

बऱ्याच वेळाने तो आला, चोचीत काहीतरी घेऊन. आपल्या खोप्याच्या चिंचोळ्या दारातून आत शिरत आपण आल्याची वर्दी त्याने तिला दिली. ती थोडी रुसलीच होती. त्याने हळूच चोचीतले चार काजवे घराच्या कोनाड्यात ठेवले. त्या प्रकाशदिव्यांनी सुगरणीचा खोपा उजळून निघाला.आता मात्र तिचा रुसवा कुठल्या कुठे पळून गेला आणि त्याची जागा कौतुक आणि प्रेमाने घेतली. झाडावर टांगलेल्या आणि वाऱ्याने झुलणाऱ्या त्या खोप्यात सुगरणीचे ते जोडपं सुखाने नांदू लागलं.
--
स्वप्नाली मठकर

11 comments:

अमित गुहागरकर October 20, 2011 at 2:10 PM  

घर बनवण्याची धडपड आणि त्या घरास घरपण आणणारे ते जोडपं खास..!

क्रांति October 20, 2011 at 6:25 PM  

कित्ती गोड कथा आहे स्वप्नाली! खूप खूप आवडली.

Kanchan Karai October 21, 2011 at 12:23 PM  

स्वप्नाली, तुम्ही एक उत्तम फोटोग्राफर आहात, हे तर मला माहित होतं पण इतकी सुंदर आणि गोड कथादेखील लिहू शकता, हे खूप मोठं सरप्राईज आहे. कथा वाचतानाच खूप छान वाटत होतं. ही कथा वाचताना बोअरबर्ड नावाच्या पक्ष्याची आठवण झाली. तोदेखील आपल्या जोडीदारणीसाठी असंच पानं, फुलं आणि रंगीत किडे जमा करून घर सजवतो.

मीनल गद्रे. October 22, 2011 at 7:07 AM  

कथा खूप आवडली. विशेषत: काजवे!!

mau October 22, 2011 at 5:01 PM  

मस्त कथा...खुपच छान लिहिली आहे तुम्ही स्वप्नाली.:)

सुधीर कांदळकर,  October 25, 2011 at 6:42 AM  

जोरदार धक्का देणारे वळण आवडले. स्त्री लेखिका असावी हे पहिल्या काही परिच्छेदात जाणवले. मुलांच्या डोक्यात असे विचार सहसा येत नाहीत. पण नंतर आलेल्या वळणाचा अजिबात पत्ता लागला नाही. मस्त. रत्नाकर मतकरींच्या एका कथेचे असे धक्का देणारे वळण आठवले. केवळ शेवटच्या एका वाक्यात त्या कथेला कलाटणी दिलेली आहे.

भानस October 26, 2011 at 5:42 PM  

स्वप्नाली, कथा छानच! आवडली!

संपादक : लेखांकन...(प्रथमेश शिरसाट) October 27, 2011 at 8:48 AM  

माणसांप्रमाणेच पक्षीही घरासाठी झटतात याचे वर्णन करणारी सुंदर कथा !

Ameya Mathkar,  October 28, 2011 at 9:24 AM  

खूपच छान. शेवट तर अत्युत्कृष्ठ !!!!

Anonymous,  November 1, 2011 at 4:46 PM  

Khupch chan...

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP