सौजन्याची ऐशी तैशी

सकाळचे १० वाजलेले. नवरात्राची पाचवी माळ. दसरा रविवारी येत होता. उद्या परवा नाहीच जमले तर शुक्रवारी फारच गर्दी उसळलेली असेल म्हणून आजच जाऊन यावे असा विचार करून माझ्या कोऑपरेटिव्ह बँकेत येऊन पोहोचले. चांगली नावाजलेली व गेली कित्येक वर्षे ठाणे जिल्ह्यात खूपच गाजत असलेली ही आमची बँक. कॅलेंडरवर जेमतेम पहिला आठवडा उलटला होता. पगार, पेन्शन, आरडी वगैरे नेहमीच्या गडबडीतून अजून पूर्ण सुटका झालेली नसली तरी थोडीशी श्वास घेण्याइतपत परिस्थिती असेल, असा माझा होरा.

दारातच एटीएमची छोटीशी केबिन. एक जण आत खुडबुडत होता, बाहेर पाच सहा डोकी लाईनीतून पुढे झुकून, माना उंचावून आतला कधी बाहेर येतोय ची वाट पाहत उभी होती. कधी घड्याळाकडे, तर कधी मागे वळून रेंगाळणार्‍या रिक्षांचा माग काढत, चुळबुळत, मध्येच काहीतरी पुटपुटत ... नेहमीचेच दृश्य. रांगेत आपण उभे असतो तेव्हांच नेमके कोणीतरी काहीतरी गोची करते. कधी कार्डच अडकते तर कधी कोडच चुकीचा पंच होतो. माझ्या बर्‍याच मैत्रिणी तर चुकूनपण एटीएम मशीनकडे जात नाहीत. ओल्ड स्कूल म्हटले तरी चालेल पण हेच बरे पडते गं, असे म्हणत पटापट स्लिपा भरून मोकळ्या होतात.

ही शाखा घराजवळ असल्याने बरी पडते, चालतही जाता येते. एटीएम ओलांडून पायर्‍या चढून आत पाऊल टाकले तर नजर पोचेल तिथवर माणसं व वर सुरू असलेले दिवेच फक्त दिसत होते. थोडक्यात होरा चुकला होता. एकतर ही शाखा तशी लहानच आहे. तशात सणासुदीचे दिवस. नुसती झुंबड होती. दारापाशीच असलेल्या दोघांतिघांना विनंती करत करत थोडी आत सरकले. मला दोनतीन कामे करायची होती. पासबुक व चेक भरायचा होता. पैसे काढायचे होते व लॉकरही उघडायचा होता. प्रत्येक काउंटरपासून लाइन निघालेली दिसत होती पण शेपटाच्या टोकाचा पत्ताच लागेना. सगळ्या रांगा एका ठिकाणी येऊन गुंतल्या होत्या. प्रत्येकाचा चेहरा वैतागलेला, त्रासलेला. बाहेर सुरू असलेली डोकवेगिरी इथेही सुरू होतीच. पाच मिनिटे त्याचे निरीक्षण केल्यावर कुठली रांग कुठे वळतेय याचा थोडासा उलगडा झाला. त्यातल्या त्यात पासबुकाची रांग आटोक्यातली वाटल्याने प्रथम तीच धरली. सुदैवाने चेकही तिथेच भरायचा होता. पाच मिनिटे झाली तरी काम फत्ते करून एकही व्यक्ती मागे आली नाही की रांगही तसूभरही पुढे सरकली नाही. म्हणून मीही डोकवेगिरीचा अवलंब करत अंदाज घेऊ लागले. पाहते तो काउंटरवर सामसूम. खुर्ची मालकाची वाट पाहत रिकामी. अरेच्या! हा काय प्रकार? इथे एसी असून जोरदार घुसमटायला लागलेले, गर्दीचा वाढता जोर आणि चक्क काउंटरचा कर्ताकरवीता गायब. माझ्या चेहर्‍यालवरचे प्रश्नचिन्हं पुढच्याने वाचले, "आहेत मॅडम, आलेच म्हणून गेल्यात. दहा मिनिटे झाली पण अजून..." तो असे म्हणतोय तोच मॅडम अवतरल्या.

बाविसचोवीसची मॅडम. केस मोकळे (केस बर्‍यापैकी लांब होते), मोठी उभी टिकली, भडक मेकअप, काळपट लालगडद लिपस्टिक, मोठ्या मण्यांच्या तीन माळा गळ्यात, दोन्ही हातात मोठी रुंद कडी, मोरपिशी पंजाबीवर फ्लोरोसंट कलरची ओढणी. एकंदरीत सगळाच प्रकार भसकन डोळ्यात घुसणारा. कोणीही काहीही घालावे, ज्याची त्याची मर्जी हे खरेच. तरीही प्रथमदर्शनीच आठी पडावी... मॅडम बसल्या तोच फोन वाजला. मॅडमने शेजारी बसलेल्या कलिगकडे तिरका कटाक्ष टाकताच त्याने तत्परतेने फोन उचलला. फोन बहुदा मॅडमचा असावा, मी पाचसहा फुटांवर असल्याने मला शब्द नीट कळले नाहीत पण काय तो निरोप घेऊन त्याने मॅडमला सांगितला. त्यावर मान उडवून "उद्या, उद्या" असे हातवारे तिने केले. निरोप पोचवला गेला.

संतुष्ट होऊन मॅडमने रांगेत उभ्या असलेल्या पहिल्याच माणसाकडची चार पासबुकं ओढली. चार बोटे नाचवत, "इतकी? काय तुम्ही पण..." अशा खुणा करत कीबोर्ड बडवला. इतके होईतो एकही शब्द तोंडातून बाहेर आला नव्हता. मी बुचकळ्यांत. ही मुकी आहे की काय? उगीच ही शंका मला छळू लागली. उपकार केल्यासारखी चारी पासबुकं भरून अक्षरश: त्याच्या अंगावर फेकली. त्याने गरीबासारखी गोळा करत थँक्स देत पळ काढला. अजून दोघे जण असेच उपकार घेऊन गेले.

माझ्या दोन नंबर पुढे एक बाई उभी होती. तिला बराच उशीर झाला असावा. हवालदिल झाली होती. एकदाचा तिचा नंबर आला. जवळपास पाचसहा पासबुकं आणि बरेच चेक्स असा मोठा ढीग तिने मॅडमसमोर ठेवला. तो पाहताच मॅडमच्या कपाळावरची शीर तडकली. हातवारे करून आविर्भावाने, "एकावेळी इतके आणलेस तू? वैताग आहेस अगदी..." तिला म्हणत कीबोर्ड चालू झाला. पहिले पासबुक अंगावर भिरकावले गेले. दुसरे प्रिंटर मध्ये घातले पण त्यावर काहीच उमटेना. बाहेर काढून पुन्हा प्रिंटर मध्ये ढकलले, पुन्हा तेच. शाई संपलीये की काय असे वाटून प्रिंटर उघडला पण तसा एकतर मेसेजही पॉप अप होत नव्हता आणि बहुतेक कार्टरेज नुकतेच बदलले असावे त्यामुळे पुन्हा एकदा पासबुकच ढकलायचा प्रयोग झाला. पण दोघेही अडून बसलेले. मॅडमने ते पुस्तक बाजूला टाकले व दुसरे आत ढकलले तर त्यावर पटापटा काळे उमटले. तोच ती बाई म्हणाली, " पोरांनी ज्यूस सांडवला होता त्यावर. " हे ऐकले मात्र मॅडमचे पित्त खवळले. चक्क कमरेवर हात ठेवून उठून उभी राहिली आणि डोळे गरागरा फिरवत त्या बाईला धारेवर धरले. "चूक झाली हो. कारटी ऐकत नाहीत नं. "असे म्हणत त्या बाई गयावया करू लागल्या. एकदाची त्यांची सारी पासबुके व चेक्स पार पडले. खाली मान घालून ती बाई गरीबासारखी निघून गेली.

अजूनही माझी शंका फिटलेली नव्हती. ही खरेच मुकी आहे की... ? जर मुकी असेल तर या इतक्या गडबडीच्या काउंटरवर हिला कशाला ठेवलेय तेही इतक्या प्रचंड गर्दीच्या वेळी. बरं हिचा एकंदरीत तोरा पाहता काहीतरी गडबड आहे हे मला जाणवत होते. तशातही मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे बँकेत जास्त करून इतर ऑफिसातले शिपाई, ड्रायव्हर, कामवाल्या बाया व पेन्शनर यांचाच जास्त भरणा होता. माझ्या लाइनीतील पुढची सगळी मंडळी हीच होती आणि बहुतेक ती नेहमीच येणारीही होती. मॅडमचा हा तोरा त्यांच्या अंगवळणी पडलेला होता.

मी आधीच ठरवले होते की हिने जर माझ्या अंगावर पासबुक फेकले तर मी तिला ते उचलून द्यायला लावणार व तक्रारही करणार. माझ्यामागे लाइन बरीच वाढली होती.बँकेत शिरायलाही जागा राहिली नव्हती. माझा नंबर येताच मी माझी दोन्ही पासबुकं तिच्या समोर धरली. तिरक्या नजरेने माझ्याकडे पाहत तिने नंबर टाईप केला. मी दोन वर्षाने पासबुक भरत असल्याने बर्या्च एंट्र्या बाकी होत्या. वैतागून तिने माझ्याकडे पाहिले पण काही हातवारे केले नाहीत. मीही मख्खासारखा चेहरा करून तिच्याकडे एकटक पाहतं होते. जर मी दोन वर्षे मायदेशात गेलेच नसेन तर एंट्र्या कश्या करून घेणार? माझी दोन्ही पासबुके प्रिंटून तिने प्रिंटरवर ठेवली. चेकच्या स्लिपवर शिक्का मारून तिचा काउंटर पार्ट पासबुकांवर ठेवला. काहीही भिरकावले मात्र नाही. मी ते उचलून लॉकरच्या दिशेने निघाले.

वाटेत मॅनेजरांची केबिन आहे. तिच्या बाहेर चेक्स व तस्तम गोष्टींवर शिक्के मारायला शिपाई बसलेला. त्याला नमस्कार केला आणि विचारले, "का हो, त्या मॅडम मुक्या आहेत का?" कानभर पसरेल इतके हसू व उतू चालालेले प्रेम त्याच्या चेहर्‍यावर पसरले.

"काहीतरीच काय? निशामॅडम ना? नाही हो. आज ना त्यांचे मौनव्रत आहे. नवरात्रसुरू आहे ना, म्हणून. पण सकाळपासून गर्दीने नुसता वात आणलाय. मॅडम तरी पण निभावताहेत."

(किती ते कौतुक, म्हणे मौनव्रत आहे. कमालच आहे. स्वत:च्या पोरीने घरी मौनव्रत घेतले असते तर तिचे इतके कौतुक केले असते का यांनी?) उघडपणे- " वा! वा! मौनव्रत आहे का? तेही ऑफिस ड्यूटीमध्ये? आणि अशा टेबलवर? छान हो छान. पण लोकांना त्रास होतोय त्याचा आणि त्या तुमच्या निशामॅडम डोळ्यांनी व हातवारे करून लोकांवर खेकसत आहेत, त्याही उगाचच, त्याचे काय?"

"काय मॅडम, काहीही. अहो लहान पोर आहे, चालायचेच. थोडे लाड होणारच की, काय?"

मॅनेजर आतून आम्हा दोघांकडे पाहत असावे. त्यांनी मला खुणेने आत यायला सांगितले. मी आत जाताच, "काय झाले? काही प्रॉब्लेम आहे का?" असे विचारले. मी माझा निषेध नोंदवला. निशामॅडमनी मौनव्रत धारण करण्याबद्दल माझा मुळीच आक्षेप नव्हता. त्यांच्या एकंदरीत वागणुकीचाच मला त्रास झालेला. 'ग्राहक देवो भव' ही तुमची टॅगलाइन आणि नेमके त्यालाच ही ट्रिटमेंट. मॅनेजरांनी लगेच गुळमुळीतपणा सुरू केला. "अहो तसे नाही. नवरात्र वर्षातून एकदाच असते. त्यातून हौसेने निशाने मौनव्रत ठेवलेय. सांभाळून घ्या. तुमचे कुठले काम अडलेय का? द्या मी करवून घेतो."

"अहो पण मग त्यापेक्षा तुम्ही आजचा दिवस दुसर्‍या कोणाला तरी तिथे बसवायचे आणि निशामॅडमला खाली लोन डिपार्टमेंटला पाठवायचे ना! कस्टमरला निष्कारण ताप कशाला?"

आता सौजन्य जाऊन मॅनेजर ही थोडे तडकल्यासारखे दिसू लागलेले. "बरं बरं मी पाहतो. तुम्हाला अजून काही काम आहे का? नसेल तर मला कामे आहेत. " म्हणजे यांना कामं आणि मी रिकामटेकडी. थोडक्यात हा मला, 'फूटा इथून' चा इशारा होता. निशामॅडमच्या मिरवण्याला या सगळ्यांची फूस होतीच.

मला लॉकरही उघडायचा होता. रजिस्टर मध्ये सही केली व उभी राहिले. लॉकरचे काम पाहणारे सद्गृहस्थ लगेच उद्गारले, "उतरा तुम्ही, मी येतो." मी मान डोलवली व खाली गेले. दहा मिनिटे होऊन गेली तरी कोणी आले नाही म्हणून पुन्हा वर चढून आले. मला आलेली पाहताच तेच गृहस्थ थोडे ओरडूनच म्हणाले, "मी म्हणालो ना तुम्ही उतरा, मग पुन्हा कशाला वर आलात? चला." तरातरा जीना उतरून गेले. लॉकर उघडला व निघाले वर जायला तोच मी त्यांच्याकडे स्टूल मागितले. त्या आधी मी स्टूल आहे का ते शोधले होते. पण एकतर मोठ्या शिड्या किंवा एकदम छोटी प्लॅस्टिकची डुगडुगणारी स्टूले होती. मध्यम उंचीचे काहीच नव्हते. खुर्चीही नव्हती. मी शोधाशोध करून झाली आहे हे त्यांनी पाहून झाल्याने, "पाहा जरा इथेतिथे. सापडेल तुम्हाला." असे त्यांना म्हणता आले नाही. "मी वरून पाठवतो शिपायाबरोबर." असे म्हणून ते निघून गेले. पाच सात मिनिटे झाली. कोणीच आले नाही. लॉकर उघडा सोडून मला जाता येईना. शेवटी दोन छोटी स्टूले एकावर एक ठेवून कसरत करत मी कसेबसे काम आटोपले व वर येऊन त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिले. "स्टूलाचे काय झाले?" "मी शिपायाला सांगितले होते. त्याने दिले नाही का तुम्हाला? अरे xxx कुठे तडमडलास? एक काम करायला नको याला. मॅडम आत्ताचे तुमचे काम झालेय ना. पुढच्या वेळी स्टूल देण्याची व्यवस्था करतो." असे म्हणून त्यांनी रजिस्टर मध्ये जे डोळे घातले ते वरच केले नाहीत.

मी पुन्हा मॅनेजरसमोर.... "खाली स्टूल नाही. कशावर चढून लॉकर उघडायचा? माझे सोडा, उद्या माझी सत्तरीच्या पुढची आई-बाबा आले की मग ते कसे उघडतील लॉकर अशी कसरत करत? तसे करताना ते पडले तर कोण जबाबदार? आणि त्यांचे हाल तुमच्यामुळे का म्हणून व्हावेत? इतक्या चिंचोळ्या जागेत शिड्या पोचत नाहीत हे माहिती आहे ना तुम्हाला? मग तिथे जवळपास शंभर लॉकर असतील. त्या सगळ्यांनी ही अशीच सर्कस नेहमी करायची का? कधीपासून मी खाली वाट पाहत होते पण कोणीही येऊन स्टूल दिले नाही की ते नाहीये असेही सांगितले नाही. याचा अर्थ काय? तुम्हाला वेळ नाही आणि मला काम नाही असा समज झालाय का तुमचा? "

"अहो तुमचे काम झालेय ना आत्ताचे. मग झाले तर. होते कधी अशी गडबड. कामाच्या घाईत विसरले असतील ते. तुमचे आईवडील आले ना तर मी स्वत: त्यांना स्टूल देईन. काळजी करू नका. या आता." मनातल्या मनात त्यांनी मला दिलेल्या शिव्या मुखवट्याआडूनही दिसत होत्या.

बँक एकच पण दोन निरनिराळ्या शाखांमध्ये इतकी दोन टोकांची वर्तणूक! एकीत, ’ग्राहक म्हणजे राजा’ इतके सहकार्य. अतिशय आपुलकीने कामे करतात की कौतुक केल्यावाचून राहवत नाही. ज्येष्ठ नागरिकांची तर खास काळजी. अगदी रजिस्टर समोर आणून सह्या घेतलेल्या पाहिल्यात मी. आणि त्याच बँकेचीच हीही एक शाखा. प्रत्येकजण उर्मट. लॉकरवाले, एफ् डी डिपार्टमेंट तर विचारूच नका. काहीही विचारले की लगेच उडवाउडवी सुरू. ओळखीतल्या बर्‍याच लोकांनी त्यांचे अनुभव ऐकवले होतेच. दिवसातून खूप पासबुके, चेक्स भरले जात असतील. काम खूप पडत असेल. मान्य. पण याचा अर्थ तुम्ही उपकार करता आहात का लोकांवर? पगार मिळतोय ना? आणि नसेल झेपत तर सोडून द्या नं. गोड बोलणे दूरच पण निदान हडतुड करू नका. लेखी तक्रार करायची इच्छा असूनही माझा नाईलाज होता. लगेचच उडायचे होते. पाठपुरावा करणे शक्य नव्हते.

ज्यांचा सतत जनतेशी संपर्क येत असतो त्यांनी कसे वागावे व कसे वागू नये याचे नियम काटेकोर पाळायलाच हवेत. नुसत्याच मोठ्या मोठ्या जाहिराती करायच्या. सौजन्य फक्त एका सप्ताहापुरते वागवून उरलेले ५१ आठवडे ही मनमानी....
--
भाग्यश्री सरदेसाई
shree_279@yahoo.com

4 comments:

davbindu October 21, 2011 at 12:45 AM  

श्री ताई,काहीतरीच मौनव्रत म्हणे,न बोलता खेकसण्याच व्रत .... बहुतांशी सरकारी बैंक मध्ये सौजन्याची अशीच एशी तैशी झाल्याच चित्र बघायला मिळते ...(निदान आमच्या इथल्या शाखांत तरी)..कधी कधी खूप संताप येतो ह्याचा ...उलट बर्याचश्या खाजगी बँकात चार्जेस वैगेरे जास्त असले तरी चांगली 'ट्रीटमेंट' मिळते ....

Kanchan Karai October 22, 2011 at 1:37 PM  

बहुतांश बॅंकामधे हल्ली हेच पहायला मिळतं. खरं आहे. जणू काही आपल्याला खातं उघडायला देऊन त्यांनीच आपल्यावर उपकार केलेले असतात. मला हाच अनुभव वीज केंद्रामधे, एमटीएनएल मधे आला आहे. मी मराठीत बोलले तर केवढा अपराध घडला.

कालचीच गोष्ट - काळा घोडासमोरच्या वेस्टसाईडमधल्या कॉपी शॉपमधे गेले होते. ऑर्डर दिली तर अर्धा तास पत्ताच नाही. वर येऊन उद्धटपणे सांगितलं की "एकच पीस होता, तो आम्ही पार्सल आत्ताच दिला. पाहिजे तर पैसे परत देतो." एक कानाखाली ठेवून द्यावीशी वाटत होती.

सध्या आईच्या इथे सोसायटीच्या कमीटीने सौजन्याची ऐशी तैशी करून ठेवली आहे. उद्धटपणा्सुद्धा परवडेल अशाप्रकारचे सभ्यतेला धरून नसलेले शब्दप्रयोग खुशाल मिटींगमधे करतात. काय म्हणशील याला?

भानस October 26, 2011 at 4:55 PM  

देवेन, कांचन अनेक धन्यवाद!

विनायक पंडित October 26, 2011 at 8:30 PM  

अगदी योग्य प्रतिक्रिया आहे तुमची! कामापेक्षा एकमेकातलं नातं सांभाळायचं आणि काम हाच देव पेक्षा अनेक(इनोवेटीव मार्गांनी(?))द्येव द्येवच करत रहायचं हाच खाक्या आहे सेवाउद्योगांमधे! देवधर्माच्या बाबतीत आपण (कलेक्टिव्हली म्हणून आपण) पार मध्ययुगात पोचलो आहोत! संपूर्ण संगणकीकरणाला पूर्ण वाव आहे भारतात, भले मग पुढच्या पिढ्या काम नाही म्हणून रडू देत! असो! आभार! शुभेच्छा!

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP