धारा ३०२

"इंडियन पीनल कोड च्या धारा ३०२ अन्वये आपल्यावर कु. जाई गजानन सरकार हिच्या खुनाचा, सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दखल करण्यात आलेला आहे. सदर आरोप आपल्याला मंजूर आहे का?..."

भरगच्च न्यायालयात नीरव शांतता पसरली. अगदी मुंगीच्या पायातील घुंगरांचा पण स्पष्ट आवाज येइल इतकी नीरव शांतता!

आरोपी गजानन महादेव सरकार. वय वर्षं ४८. गजाननाच्या डोळ्यात पाणी तरळले. गुन्ह्याच्या शिक्षेच्या भयाने नाही, त्याने केलेल्या कृत्याच्या पश्चात्तापाने नाही, फक्त आठवणींनी... आठवणी ज्या त्याने जोजवून ठेवल्या होत्या त्याच्या लाडक्या लेकीच्या...एकुलत्या एका लाडक्या लेकीच्या... ती लेक जिला त्यान जपलं होतं तळहातावरील फोडा प्रमाणे... वाढवलं होतं तिची आई आणि बाप होवून..

जाई ...स्व. जाई गजानन सरकार .... वय वर्षं २३ ... त्या दिवशी संताप अनावर झाला ... क्षणभरापूर्वी होती ... मग नव्हती .. संपली... कायमची...!

सहन होत नाही कल्पना ..जाई तू नाहीस.... खरच नाहीस...?

का केलस असं तू जाई? का? का? का ? ....

अग आता इच्छाच नाही उरली बघ कशाकशाची... येतोय बेटा तुला भेटायला ... लवकरच मी पण ...

मूक रुदन करत गजानन मनातल्या मनात म्हणत होता जणू....

२० मे १९८६ ...डॉक्टर कोठेकरान्चं हॉस्पिटल ...

सौ रमा गजानन सरकार प्रसूति गृहाच्या प्रसूति कक्षात दखल झालेली होती. बाहेर गजानन अस्वस्थपणे येरझारया घालत होता. सुटका सुखरूप व्हावी म्हणून चालता चालता मनातल्या मनात अथर्वशीर्ष पठण सुरूच होतं.

टयांहाऽ टयांहाऽ ... बारीक़ चिरकासा आवाज, मग नर्सची लगबग ... आतबाहेर ... धावपळ... गजाननची उत्सुकता शिगेला पोहोचलेली ...

मुलगी झाली ... गजानन च्या चेहेर्‍यावर असीम आनंद...

थोड्या वेळा नंतर नॉर्मली डिलिवर्ड बेबी आणि रमा प्रसूति कक्षाबाहेर आणल्या गेल्यात... लगेच स्पेशल रूम मधे .....

बघ लबाड कशी हसते आहे ....ओळखायाला लागली आहे बाबाला तिच्या ...

गजाननला उगीच मूठ भर मासं चढलं ....

गजानन एका खाजगी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर ... हुशार असल्याने भराभर प्रमोशन मिळालीत ..व्यसन फक्त कामाचं ... प्रचंड तणावाखाली पण सतत उत्कृष्ट काम करत करत आज कंपनीचा एक महत्वाचा घटक झालेला ...

इतका व्यस्त आणि ताणा खाली असायचा ... पण लहानग्या जाईला बघितलं की त्याचा ताण... थकवा कुठल्या कुठे पळून जायचा...

हळूहळू जाई मोठी होवू लागली ...तिच्या बाललीला मधे दोघेही दंग होवून जात. शाळेत जायला होती नुकतीच जाई .... शाळेची परीक्षा होती ... आणि नेमकं त्याच वेळी सासुबाईना अ‍ॅटॅक आला ... काही उपचार व्हायच्या आतच सगळ संपलं. मग तिकडे जावचं लागलं... जाईला परीक्षेला बसताच आलं नाही... परीक्षा बुडाली.

तिकडून परत आल्यावर शाळेत गेली तो दिवस नेमका निकालाचा ... सगळ्या मुलांना निकालाचा कागद मिळाला... पण परीक्षेला बसलीच नव्हती त्यामुळे जाईला निकालाचा कागद दिलाच नाही तिच्या मॅडम नी... कोण गोंधळ घातला होता तिने रडून रडून ... त्या कागदासाठी.. दुसर्‍या दिवशी रजा घेवून गजानन तिच्या शाळेत गेला .... तिच्या मॅडमला भेटून त्याने एक कोरी मार्कशीट घेतली ..शून्य गुण भरलेली .... काय खुश झाली होती ती....

जाई हळूहळू वाढत होती ... नावा प्रमाणेच नाजुक आणि सुन्दर ... चेहरा बोलका ...त्यात डोळे हे तर फारच बोलके .... तारुण्यात पदार्पण करणारी जाई बघून जाणार्या येणार्‍याच्या काळजाचा ठोका चुकत असे...

जाई १० वी ला होती. १० वी ची परीक्षा आटोपली ...पेपर छान गेले होते ... अचानक रमाची तब्येत बिघडली ... धावपळ झाली ..तपासण्या केल्या ...आणि हिमोग्लोबिन निघालं फ़क्त ३% ... सगळे हादरले .... आणखी तपासण्या केल्या...

निदान झालं...Acute Myloid Leukemia चं.

काही उपचार व्हायच्या आतच गजानन आणि जाईला सोडून रमा अनंताच्या प्रवासाला निघून गेली...

विस्कटलेला गजानन सावरल्या सारखा दाखवित होता ... दु:खाच्या डोंगराआडून आशेचे किरण शोधत होता.... जाईच्या मामा ने खूप साथ दिली ... खूप समजावून सांगायचा तो जाई ला ...कधी येउन, राहून ... तर कधी फ़ोन वर बोलून.... जसं जमेल तसं...

जाई आता १२ वी ला होती ... कामात लक्ष देत देत गजानन जाई वर विशेष लक्ष देत होताच ... तिला काय हवंय... वेळो वेळी काळजी घेत होताच ... तिच्या आवडी निवडी विशेष जपत होता ...तिच्या परिक्षेच्या वेळी विशेष सुटी घेवून १० दिवस गजानन पूर्ण वेळ तिच्या सोबत होता... परीक्षा छान झालीच आणि पेपर छान गेले... निकालाचे टेंशन नव्हतेच ... अपेक्षेप्रमाणे बोर्डातुन दुसरी आणि मुलीं मधे पहिली आली होती जाई...

गजाननच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले ... रमाच्या फोटो समोर उभे राहून मूक रुदन सुरु होतं बाप लेकीचं...
जाईला इंजीनियरिंगला प्रवेश मिळाला. लांब दूरच्या गावाला... काळजचा हा तुकडा आता इतक्या दूर जाणार म्हणून गजानन हवालदिल झाला होता... आता वर्ष वर्ष लाडूबाई दिसणार नाही ... आतून कासाविस झाला होता तो... पण छातीवर धोंडा ठेवून त्यान निर्णय घेतला .... जाई ची अ‍ॅडमिशन झाली आणि तिला सहजच हॉस्टेल पण मिळालं.

कॉलेजच वातावरण एकदम मस्त.... सगळ कसं नविन नविन . बंदिस्त पाखराला मिळालं एक मुक्त वातावरण ... जात्याच हुशार असलेली जाई .... इकडे फुलू लागली ...

जाईला मोबाइल घेवून दिला . सकाळ संध्याकाळ गजानन तिच्याशी बोलायचा. दुधाची तहान ताकावर भागवयाचा. सगलं ठीकठाक आहे असे ऐकून हळूवार निश्वास सोडायचा.

रॅगिंग... इंट्रो.... फ्रेशर्स डे... सीनियर्सचा रिस्पेक्ट.... अरे बाप रे हे सुद्धा पैलू असतात तर... काही पर्याय नाही ह्यातून सुटण्याचा... असो... आली या भोगासी... आपण पण सीनियर्स होणारच की पुढच्याच वर्षी... मग बघून घेवू एकेकाला ....

आज उभं राहून राहून पाय कसे मोडकळीला आले होते. रूम वर जावून पडून रहावसं वाटत होते. मेस वर जेवण करून झप झप पावलं टाकत जाई रूम कड़े जात होती. बघते तर काय रूम समोर ही गर्दी. थर्ड सेमच्या मुली त्यांच्या विंग मधे गोळा झालेल्या... तिच्या पार्टनर ला झापत होत्या...

ए जादा स्मार्ट बनतेस काय? जास्तीच शहाणी दिसतेस...चल वाक गुढघ्यात. लवकर ...टाइम पास नाही करायचा... नाईट ड्रेस मधली सावनी रडकुंडीला आली होती ...खाली वाकताच तिच्या टॉपच्या V मधून एकीने तार आत टाकली ... सावनी कळवळली..

जाई ला राहवेना ..अन् काही बोलता पण येईना...

तितक्यात आवाज आला ... "ए, मॅडम आल्या".... एका क्षणात सगळा चिवचिवाट थांबला. क्षणभरात सगळ्या अंतर्धान पावल्या अन् "कसला गोंधळ करते गं?" असं म्हणत मॅडम त्या दोघींवरच रागावल्या वरून ....
सावनीची तब्येत बिघडली. ती आठवडा भरासाठी सुटीवर गावाकडे निघून गेली. आज जाई रूम वर एकटीच होती. सबमिशनचं काम पूर्ण करत बसली होती... नुकताच बाबाचा फोन येवून गेला होता... तीन एक्सपेरिमेंट लिहून झाले... रात्रीचे साडे अकरा वाजत आले होते... मॅडम चा राउंड होवून गेला होता... सगळ्या जणी झोपी गेलेल्या...सगळं कसं शांत शांत होतं...

दारावर 'टक टक' आवाज झाला... जाई चा थरकाप उडाला. कोण असेल इतक्या उशिरा? ... पाय जडशीळ झालेत ... उठावसचं वाटेना ... दारावरची टक टक वाढली...एका लयीत... नाईलाजाने जड पावलांनी जाई उठली. दार उघडलं . दारात फिफ्थ सेमची ताई उभी होती... काहीच बोलली नाही... अक्ख कोरिडोर रिकामं होतं . सगले लाइट्स बंद... तिने आत येऊन दाराला कड़ी घातली ...

"काय गं काय सुरु आहे तुझं?" ऐसपैस बसत ताईन विचारलं.

चाचरत चाचरत जाई बोलली, "सबमिशन आहे मॅम...."

"हं हं ठीक आहे ..आटप लवकर."

"ए मी आज इकडेच झोपणार आहे हं ... तुझी पार्टनर नाहीये ना ... चल आटप लवकर आणि मालव दिवा .." तशी पण जाईला झोप आलीच होती. थोडसं आवरून तिने दिवा मालवला. ..आणि जाई पण झोपी गेली ...

अर्धवट झोपेत जाईला हालचाल जाणवली. नको तिथे नको ते स्पर्श ... जाई वैतागली ... जाई कातावली ... अणि मग जाई हरली....

आताशा जाई ताईची 'ख़ास' म्हणून ओळखली जावू लागली.सीनियर्स पण तिला टरकुन असत. वर्ष उलटलं. सुट्टीत घरी आलेली जाई हरवल्या हरवल्या सारखी वाटत होती. गजाननला वाटले की आईची आठवण येत असेल. कोमेजली बिचारी. तिच्यासाठी काय काय करायचे ते करून बघितले ... पण जाईचा अनुत्साह काही निघेच ना.

सुट्टी संपताच तिची कळी खुलली. हॉस्टेलला परत जायच्या नुसत्या कल्पनेनेच ...

बघता बघता ४ वर्षं होत आलीत ..दर वेळेच्या सुटीमधे जाईचा अलिप्त पणा वाढतच गेला ...
कॅम्पस इंटरव्यूमधे तिचे सिलेक्शन झालं मुंबईला एका कंपनी मधे ...ताईच्याच कंपनी मधे ...आणि आता ती चक्क ताईच्याच बरोबर तिच्या फ्लॅटमधे राहू लागली.

गजानन पण आताशा थकत चालला होता. वय फार नसलं तरी दगदग सहन नव्हती होत त्याला. मुलीचे दोनाचे चार झालेत की बरं अस वाटायला लागलं होतं त्याला ...त्याने मित्रांमधे विषय काढला ...

"अरे माझ्या बहिणीचा मुलगा आहे ..स्टेट्स ला असतो."

गजानन पण आनंदला. त्याने उत्साहाने जाईचा फोटो, पत्रिका दिली मित्राला. योगयोग पण कसा ..पहिल्याच स्थळाला पत्रिका जुळाली...फोटो आवडला ... पुढच्या कार्यक्रमाकरिता पसंती आली ....

गजाननने उत्साहाने जाईला बोलावून घेतले अर्जंट मधे ... जाई आली... पण फण फण करतच... बाबाच्या समाधानासाठी आणि पाहुण्यांच्या समोर तमाशा नको, म्हणून तिने सगळे सोपस्कार करवून घेतले .... मग तिने गजानन ला सांगितले ...बाबा हे लग्न होणार नाही...

गजानन हादरला .... समजावून सांगू लागला ...चिडला... तापला... रागावला ...अणि रागाच्या भरात कपाटामधुन बारा बोर चं पिस्तूल घेवून आला ....

बोल करणार की नाही? स्वताच्याच कनपटी वर नळी ठेवत तो म्हणू लागला...

इतक्यात एक झटका देत जाई पुढे आली. त्याचं पिस्तूल हिसकलं आणि स्वत:च्या कनपटीवर ठेवून घोडा दाबला... एक भयानक आवाज मग एक किंकाळी अन् मग सगळी शांतता...!

गजानन वेड्यागत झाला ... बरळू लागला .... मी मारलंय माझ्या लेकीला ... फाशी द्या हो, मला फाशी द्या ....

मग पुढचे सोपस्कार पार पडले ...... गजानन ... मात्र एकदम मुका झाला .... नेहमीकरताच....
--
सुनिल जोशी
starsvj63@gmail.com

8 comments:

Anonymous,  October 21, 2011 at 6:46 AM  

सुंदर कथा ...छान जमली आहे काका ..

Niranjan October 21, 2011 at 7:31 AM  

सुंदर कथा. कथेचा वेग शेवटापर्यंत कायम ठेवला. मस्त लिहिलि आहे.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) October 21, 2011 at 12:21 PM  

सुनीलजी, कथेची ओघवती शैली मला आवडली. लग्नाच्या विषयात जाईचं मनोगत थोडं जास्त व्यक्त व्हायला हवं होतं, असं मला वाटतं. कॉलेजमधलं रॅगिंग हा म्हटलं तर चेष्टेचा आणि म्हटलं तर खूप गंभीर विषय आहे. कित्येक जाईंचं आयुष्य अशा रॅगिंग्मुळे बदलून गेलं असेल, कुणास ठाऊक!

SUNIL JOSHI October 23, 2011 at 9:46 PM  

धन्यवाद मित्रांनो, आपल्या अभिप्राय आणि सुचनांबद्दल, आपले अभिप्राय नक्कीच मला मदत करतील अजुन सुधारणे साठी...

सुधीर कांदळकर,  October 25, 2011 at 6:31 AM  

छान.

Unknown October 27, 2011 at 8:46 AM  

छान जमलीय कथा !

Aniket October 27, 2011 at 1:57 PM  

Man sunna karanari kahani ! Dolyatun Pani ale.

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP