जनगणना - १,१७,६७,९५,९४३ अधिक १

एका कोंकणी माणसाने तेलगूत अनुवाद केलेला संस्कृतमधला असा एक हिब्रू श्लोक आहे की,
"माजलेला ढग गडगडत राहतो, जोपर्यंत तो पर्वताला धडकत नाही.
माजलेला झेंडा फडफडत राहतो, जोपर्यंत तो पावसाला धडकत नाही. आणि...
माजलेला माणुस बडबडत राहतो, जोपर्यंत तो पुणेकराला धडकत नाही."

विक्रमादित्य अंबिलढगे असाच एक माजलेला ढग होता, जो पुण्यातल्या पर्वताला धडकला आणि हवेतच विरुन गेला. तो असाच एक माजलेला झेंडा होता, जो पुणेरी पावसात फाटून गेला. शेवटी पुण्यात पाऊल टाकताना कोणाच्याही जिवाचा थरकाप होतो, ते उगीच नाही!

अंबिलढगे पेशाने शाळामास्तर. गाढवाचं पिल्लू लहानपणी कमालीचं गोंडस दिसतं आणि जरा मोठं झाल्यावर लाथा झाडायला लागतं, असंच ह्या अंबिलढगेचं झालेलं. हेडमास्तरांना सुरवातीला अगदी चुणचुणीत वाटणा-या ह्या अंबिलढगेनी नंतर नंतर असे काही कामचुकार रंग दाखवले की हेडामास्तराचे डोळे पांढरेच झाले. खरं तर हेडमास्तर त्याला उगाचच घाबरायचे. "गंजलेला पत्रा आणि माजलेला कुत्रा यापासुन दूरच राहवं", असं काहीतरी म्हणायचे ते.

अर्थात मास्तर व्हायची अंबिलढगेची लायकी नसली, तरी पात्रता नक्कीच होती. तो पात्र असण्याची ५-६ कारणे पुढीलप्रमाणे:

१. अंबिलढगेला दया, माया, प्रेम, क्षमा, करूणा, सहानुभूती, जिव्हाळा, आपुलकी ह्या असल्या कुठल्याही भावनेनी स्पर्श केला नव्हता. त्यामुळे मेंढपाळाने जसं जीवाला त्रास करून न घेता कितीही शेळ्या हाकाव्यात तशी तो कितीही पोरं शिकवू शकत होता... सर्व शिक्षा अभियान अंबिलढगे कोळून प्यायला होता. (सर्व मुलं शिक्षा केली की सरळ होतात असे त्याचे अभियान होते.)

२. तो मराठी सोडून कोणताही विषय शिकवू शकत असे. (‘शिकवू शकत असे’ असे म्हणणे चुकीचे ठरेल. मराठी सोडून कोणत्याही विषयाचा तास घेऊ शकत असे, असे म्हणणे रास्त होईल. आणि खर तर पूर्वी तो मराठीचाही तास घ्यायचा पण एकदा हेडमस्तरांनी त्याला "अरे गनु, मानसातला न म्हन रे" असं म्हनताणा ऐकलं. त्याचं व्याक्रनाचं ज्ञाण बघुन ते णतमस्तक झाले आणि मराठी भाषा एका महान मराठी शिक्षकाला पारखी झाली. (पारखी झाली म्हणजे काय ते अंबिलढगेच जास्त छान सांगू शकेल. ‘लग्नानंतर ती आईच्या वेड्या मायेला पारखी झाली’, ह्या वाक्याचा अर्थ त्याने, मायाच्या आईने तिचं लग्न गुजराथी माणासाशी लावुन दिल्यामुळे लग्नानंतर ती ‘माया वेडे’ ची ‘माया पारखी’ झाली, असा काढला होता. हे हेडमस्तरांनी ऐकलं असतं तर त्यांना वेड लागलं असतं... आणि मग विक्रमादित्य हेडमास्तर झाला असता. पण असे होणे नव्हते, त्यामुळे शाळा एका महान हेडमास्तरला अंबिलढगे झाली.)

३. मान इकडे-तिकडे न वळवता, एकाच वेळेस अंबिलढगे आख्या वर्गाकडे पाहु शकत असे. मास्तरचं लक्ष नाही असं पाहुन वर्गातला कोणताही उर्मट कार्टा काहीही खोड्या करुच शकत नसे, कारण मास्तर आपल्याकडेच बघतोय ह्याची प्रत्येक मुलाला खात्री असायची. (तिरळेपणा म्हणजे काही दोष नव्हे आणि तो दोष असेलच तर पहाणार्‍याचा आहे, कारण पहाणार्‍याला तो तिरळा दिसतोय, त्याला नाही. त्याला तर सरळच दिसतंय, म्हणजे पाहणारेच तिरळे... - असं अंबिलढगे म्हणायचा.)

४. अंबिलढगेची शाळेत पडेल ते काम करायची तयारी असायची. (अर्थात, तो कामाची नुसती तयारीच करतो, प्रत्यक्षात ते काम करतच नाही, हे हेडमास्तरांच्या बर्‍याच उशीरा लक्षात आलं.)

उपकंस- (एखादी गोष्ट जमणार नसेल तर त्याला स्पष्टपणे 'नाही' म्हणणं ही कला आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त कला ’हो’ म्हणुन ते काम न करण्यात आहे, असा कलाकार अंबिलढगेचा सिद्धांतच होता.)

५. त्याचा मामा संस्थेच्या समितीवर संचालक होता. (मामा म्हणजे मानलेल्या आईचा आडनाव बंधू.)

६. भाग्य एकेकाचं! (सदरचं भाग्य हे अंबिलढगेचं सौभाग्य नसुन विद्यार्थी आणि हेडमास्तर यांचं दुर्भाग्य ह्या अर्थाने घेण्यात यावं....)

अंबिलढगे कामचुकार होता हा हेडमास्तरांचा प्रॉब्लेम नव्हताच, पण त्याचं काम दुसर्‍याच कोणीतरी केल्यानंतरही, ‘ते कसां वाईट झालंय आणि आपण केलं असतं तर कसं चोख झालं असतं’, ह्याच्या फुशारक्या तो इतक्या मारायचा की हेडमास्तरांना त्याच्या गळ्यात शाळेची घंटा बांधुन त्याला नदीत ढकलून द्यावं, असं वाटायचं. पण आंबिलढगेविषयीच्या द्वेषानी भरलेल्या मनाच्या फळ्यावर संयमाचा बोळा फिरवुन ते खडू गिळुन गप्प राहायचे. पण त्या दिवशी तर कहरच झाला. आधीच निवडणूक आयोगानी लादलेल्या जनगणनेच्या कामाने ते त्रस्त होते. कसल्याही मोबदल्याशिवाय, उन्हातान्हात, दारोदारी "माहितीची भीक वाढा", अशा विनवण्या करत फिरुन त्यांना विलक्षण निराशा आली होती आणि त्यात अंबिलढगे त्यांच्या काळ्या नशिबाच्या फळ्यावर अकलेचा गिरगोटकाला गिरवत बसला होता. पहिल्यांदाच त्यांचा तोल सुटला आणि त्यांनी सरळ अंबिलढगेला आव्हानच दिलं.

"वर्गाबाहेर बसून भाषण देणं सोपं आहे. इतका स्वतःबद्दल गर्व असेल तर मी पत्ता देतो; तिथं जाऊन जनगणनेची माहिती गोळा करुन या. तसंही तुमच्या वाटणीची जनगणनेची काम दुसर्‍यांनीच केलीत. निदान एका वाड्यात तरी जाऊन या. माहिती काढून यशस्वी परत आलात तर उपमुख्याध्यापक करेन. पण तसेच आलात तर नोकरी गेली म्हणून समजा! "

खरं तर अंबिलढगेला या कामाचादेखील कंटाळा आला होता पण हेडमास्तरांची ही ऑफर त्याला एकदम आकर्षक वाटली आणि तो तयार झाला. तोपर्यंत त्याला माहित नव्हतं की हेडमास्तरांनी दिलेला पत्ता हा पुण्यातल्या एका वाड्याचा आहे.

(ह्या वाड्याचा आणि जनगणेच्या कामाचा काही एक संबंध नव्हता. पण ४७ वर्षांपुर्वी हेडमास्तरांना इथे एक अविस्मरणीय वाईट अनुभव आला होता आणि काट्यानं काटा काढावा असं ठरवून मास्तरांनी अंबिलढगेचा काट्यानं गळा कापला.)

दिलेल्या पत्त्यावर अंबिलढगे पोहचला आणि वाड्याच्या दारातच त्याचा कचरा झाला कारण तिथे एका पुणेरी पाटीने त्याचं स्वागत केलं...

आपली पायधूळ आमच्या वाड्यात झाडण्यापूर्वी हे वाचा:



  • फिरते विक्रेते, वर्गणी/मदत मागणारे, रस्ता चुकलेले, पत्ता विचारणारे, चोर, भामटे, राजकारणी, मोलकरणी, बोहारणी, भिकारी, डोंबारी, नातेवाईक, पोस्टमन, सेल्समन, मुंग्या/झुरळं आणि रातकिडे यांना आत येण्यास सक्त मनाई.
  • फक्त पार्कींगसाठी वाड्यात आल्यास वाहनाची आणि वाहन चालकाची हवा काढून घेतली जाईल.
  • पूर्वपरवानगीशिवाय आत येऊ नये. फक्त परवानगीसाठी आत येऊ नये. (अपमान करुन बाहेर हाकलण्यात येईल.)
  • ह्यानंतरही आत येण्यास आपण लायक असल्यास / येण्याची गरज पडल्यास / आत येऊ शकल्यास, गाडी आत आणू नये, पाणी मागू नये, पावलांचा आवाज करु नये, माज करु नये, वाड्याच्या आवारात बसू नये, कामाशिवाय उभं राहू नये, गुटखा खाऊ नये, विनाकारण हसू नये, अवांतर गप्पा मारु नये, घंटी वाजवू नये, अंग खाजवू...

  • (याच्यापुढेदेखील नियम लिहले होते पण इतकेच नियम वाचून अंबिलढगेच्या जीवाचा इतकाच संताप संताप झाला की तो पुढचे नियम न वाचताच आत शिरला. आजपर्यंत त्याने बायको, हेडमास्तर किंवा विद्यार्थ्यांचे पालक यांचंदेखील कधी ऐकून घेतलं नव्हतं आणि इथे हा एवढा अपमान?)

    अंबिलढगेने पहिलाच बंद दरवजा ठोठावला. आतून अस्मानी कुचेष्टेनी भरलेला माणूसघाणा आवाज आला.

    आवाज: बाहेर जा.... बाहेरचा सूचना फलक वाचा आणि मग बाहेरच रहा.
    अंबिलढगे: दार उघडा.
    आवाज: तुम्ही बहिरे आहात का अशिक्षित? की बाहेरचा फलक वाचूनही तुम्हाला आत यायचंय?
    अंबिलढगे: आधी दार उघडा, मग सांगतो.
    आवाज: आतूनच) अच्छा! म्हणजे तुम्ही ऐकू शकता, वाचू शकत नाही. कोण आपण ?
    अंबिलढगे: मी विक्रमादित्य...
    आवाज: मग हट्ट सोडू नका आणि तिकडे जंगलात जा वेताळाची गोष्ट ऐकायला... इथे माणसं राहतात.

    (काहीही भांडण / वैर / राग नसताना, कारण नसताना, संबंध नसताना समोरच्या माणसाला उगाचच कोणी इतकं टाकून बोलू शकतं ह्यावर अंबिलढगेचा विश्वासच बसला नसता. कुठे ती आपली शाळेतली शान आणि कुठे हा घोर अपमान! हा अपमान विसरुन, "मी ब्रह्म आहे" या चालीवर अंबिलढगे म्हणाला...)

    अंबिलढगे: मी विक्रमादित्य अंबिलढगे.
    आवाज: मग अंबिलओढ्यात जा.

    (हे टोनिंग इतकं घाणेरडं होतं की खरा ब्रह्म्देव ज्या कमळावर बसतो त्या कमळाच्या पाकळ्याही कोमेजून गेल्या असत्या आणि ब्रह्मदेवाने आपली चारही तोंड झाकून घेतली असती. असो!)

    अंबिलढगे: अंबिलओढा? काय बोलताय तुम्ही?
    आवाज: तुम्हाला अंबिलओढा माहित नाही?? म्हणजे तुम्ही पुण्याचे नाही. तरीच दुपारी ह्या भागात आलात. पत्ता तपासून पहा जरा.

    (खरं तर अंबिलओढा माहित असायला तो काही नायगरा धबधबा नव्हता, पण आतला माणूस जिथं कारणाशिवायही हिडीसफिडीस करत होता, तिथं ह्यावेळेस निदान त्याच्याकडे कारण तरी होतं.)

    अंबिलढगे: माझा पत्ता बरोबर आहे. तुमच्या वाळीत टाकलेल्या लोकांच्या यादीत मी नाही. दार उघडा.
    आवाज: संध्याकाळी या. मी गाढ झोपलोय.
    अंबिलढगे: हे सरकारी काम आहे. तुम्ही सरकारी कामात अडथळे आणताय.
    आवाज: मी माझ्या गादीवर झोपून सरकारच्या कामात अडथळे आणतोय? सरकारने स्वतःच्या गादीवर झोपावं.... माझ्या गादीवर झोपायचं काय कारण?

    (आतला डॅम्बिस माणूस टक्क जागा होता, काही झोपला वगैरे नव्हता, त्यामुळे अंबिलढगे जरा वैतागलाच. थोडा वेळ तो तिथंच दार वाजवत उभा राहिला. पण दार उघडलंच नाही म्हणून दुसर्‍या दरवाज्याकडे निघाला आणि त्या क्षणीच दार उघडलं. म्हणजे आतला माणूस दरवाज्याच्या फटीला डोळे लावून बाहेरची गंमत बघत बसला होता. सुमारे ७० वर्षांचे एक अण्णा नामक आजोबा बाहेर आले.)

    अण्णा: ओ सरकार, थांबा! या इकडे. आता आमच्या झोपेत अडथळा आणलाच आहात तर बोला.
    अंबिलढगे: मी जणगनणेच्या कामासाठी आलोय.
    अण्णा: कसलं काम??
    अंबिलढगे: ज-ण-ग-न-णा!
    अण्णा: तुम्हाला ज-न-ग-ण-ना म्हणायचंय का ?
    अंबिलढगे: तेच ते...
    अण्णा: असं कसं? खून आणि खूण एकच काय ?
    अंबिलढगे: ओ काका... तुमचा मराठीचा तास नंतर घ्या. ही माहिती भरुन द्या आधी. नाव सांगा....

    अण्णा अचानक बेंबीच्या देठापासून केकाटले... "वासूनानाऽऽऽऽ !"

    अंबिलढगे: अहो ओरडताय काय ? मी बहिरा नाही.

    (अचानक पलिकडच्या घरातून "काय आहे?" असा कुचेष्टेने भरलेल्या, अण्ण्णांच्या माणूसघाण्या आवाजाला भेदून जाणारा तुच्छतेनी भरलेला एक माणूसद्वेष्टा आवाज आला.)

    अण्णा: गिर्‍हाईक!!
    वासूनाना: थांबवून ठेवा..... मी आलोच चहा घेऊन!

    (न, ण चा घोळ, वासूनाना, गिर्‍हाईक हे सगळं अंबिलढगेच्या डोक्यावरुन गेलं. अर्थात त्याला काही देणं-घेणंही नव्हतं. त्यामुळे त्याने आपलं संभाषण पुढे चालू ठेवलं.)

    अंबिलढगे: घ्या हा फॉर्म आणि ही माहिती भरुन द्या.
    अण्णा: थांबा. आपण जरा बसून बोलू.

    (इथे आल्यापासुन अंबिलढगेला पहिल्यांदाच बरं वाटलं. त्याला दिला गेलेला हा पहिला आदर होता. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. अण्णा अंबिलढगेच्या तोंडावर दार आपटून आत गेले आणि बराच वेळ आलेच नाहीत. अण्णा घर आवरुन मग आपल्याला आत घेतील असा अंबिलढगेचा अंदाज होता पण तो साफ चुकला. अण्णा बाहेर आले ते एका हातात एकच खुर्ची आणि दुसर्‍या हातात मक्याची दोन उकडलेली कणसं आणि एक रिकामा कप घेऊन. त्या दोन कणसांपैकी एकाला जोरदार साजूक तूप लावलेलं होतं. दरम्यान अण्णांच्याच वयाचे वासूनाना त्यांची खुर्ची आणि थर्मास घेऊन आले होते.)

    उपकंस आणि थोडं अवांतर- (पुणेकर चहासुद्धा विचारत नाहीत ही धादांत खोटी माहिती आहे. वासूनाना थर्मासमध्ये अण्णांसाठीसुद्धा चहा घेऊन आले होते. तो पावकप चहा त्यांनी अण्णांच्या कान तुटलेल्या रिकाम्या कपात ओतला. मग अण्णांनी त्यांना तूप न लावलेलं छोटसं बेबीकॉर्न दिलं... मग नानांनी खिशातुन एक छोटी डबी काढुन त्यातलं साजूक तूप आपल्या कणिसाला लावलं. असो.)

    मूळ कंस पुन्हा चालू - (आता वासूनाना, अण्णा दरवाज्यात बसून कणिस खात आणि अंबिलढगे उभा दात-ओठ खात असा तो संवाद पुन्हा चालू झाला...)

    अंबिलढगे: घ्या हा फॉर्म आणि माहिती भरुन द्या.
    अण्णा: काय आहे हे? वधूवर सूचक मंडळात नावनोंदणी करायचा अर्ज? थोडा उशीर झाला तुम्हाला....

    वासूनाना: ह्यॅ...ह्यॅ...ह्यॅ...

    अंबिलढगे: अहो काहीही काय ?. जणगनणेचा फॉर्म आहे.
    अण्णा: म्हणजे ज-न-ग-ण-ने चा फॉर्म आहे.
    अंबिलढगे: तेच ते... त्यानी काय उत्तरं बदलनार आहेत का तुमची?
    अण्णा: णक्कीच णाही बदलनार.

    वासूनाना: ह्यॅ...ह्यॅ...ह्यॅ...

    अण्णा: तुम्ही काय करता?
    अंबिलढगे: ते तुम्हाला काय करायचंय?
    अण्णा: व्वा.. हे बरं आहे... तुम्ही आम्हाला २३६ प्रश्न विचारणार आणि आम्ही काही विचारायचं नाही?
    अंबिलढगे: हे बघा उगाच वेळ वाया घालवू नका. पटकन उत्तर द्या, मी जातो.
    अण्णा: मी रिटायर्ड आहे.
    अंबिलढगे: मग ?
    अण्णा: मग काय? गेला तर गेला वेळ वाया. वेळ वाचवून राहिलेल्या वेळात मी काय वेताळाची गोष्ट ऐकू की काय, विक्रम??

    वासूनाना: ह्यॅ...ह्यॅ...ह्यॅ...

    (विक्रम-वेताळ ही असली कोटी अंबिलढगेच्या डोक्यावरुन गेली. पण अण्णांचा विनोद फुकट गेला नाही कारण वासूनानांनी दात काढले होते.)

    अंबिलढगे: तुमच्या प्रश्णाला उत्तर द्यायला मी बांधिल नाही. सहकार्य करा. जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे.
    अण्णा: तुम्हाला जणगनणा म्हणायचंय का ? तुम्ही चुकून जनगणना असं बरोबर म्हणालात.

    वासूनाना: ह्यॅ...ह्यॅ...ह्यॅ... ह्यॅ...ह्यॅ...ह्यॅ... ह्यॅ...ह्यॅ...ह्यॅ...

    (अण्णांच्या ह्या विनोदावर बेहद्द खुष झालेले वासूनाना इतके हसले की ते खुर्चीवरुन घसरलेच. मग अण्णांनी दिलेलं ते कणिस त्यांच्या हातातून खाली पडलं आणि वाया गेलं. मग त्याबदल्यात त्यांनी अण्णांचं लक्ष नाही असं पाहून त्यांना दिलेला पावकप चहा उचलून पिउन टाकला. अण्णा गिहाईकाशी बोलण्यात गुंतले होते... )

    अण्णा: ठीक आहे, देतो तुम्हाला उत्तरं पण आधी सांगा तरी की आपण कोण आहात? हल्ली खूप भामटे असे फिरतात आणि लुटतात हो....
    अंबिलढगे: मी तुम्हाला भामटा दिसतोय का ?
    अण्णा: समजा... मी हो म्हणालो तर काय पोलिसंच्या स्वाधीन व्हाल का? आणि दुसरं, जर भामटे भामट्यांसारखे दिसत असते तर त्याला जागेवरच ठोकला नसता का? तुम्हाला सांगतो, मागं असाच एक सभ्य दिसणारा भामटा...
    अंबिलढगे: बास...! मी शाळा शिक्षक आहे.
    अण्णा: तो पण असंच म्हणालेला की मी शिक्षक आहे.
    अंबिलढगे: कोण?
    अण्णा: तो भामटा.

    वासूनाना: - ह्यॅ...ह्यॅ...ह्यॅ...

    अंबिलढगे: तुम्ही अपमान करताय माझा. मी इथे फुकटात काम करतोय आणि तुम्ही काय हे भामटा-भामटा लावलय?
    अण्णा: फुकटात म्हणजे? आम्ही तुम्हाला दर प्रश्नामागे ५-५ रुपये द्यायचे की काय? म्हणजे एक तर आमची खाजगी माहिती तुम्हाला द्यायची आणि...
    अंबिलढगे: खाजगी महिती??
    अण्णा: हो मग! हे काय इथे आमचा पिनकोड विचारलाय की!

    वासूनाना: ह्यॅ...ह्यॅ...ह्यॅ...

    अंबिलढगे: पिनकोड?
    अण्णा: ...आणि हे बघा, चक्क बायकोचं नाव घ्यायला सांगितलय. बरं, नुसतंच घ्यायचंय की घास वैगेरे पण भरवायचा आहे?

    (आपण चुकून मेंटल हॉस्पीटलमध्ये आल्याची शंका अंबिलढगेच्या मनाला चाटून गेली. खरंच आपला पत्ता चुकला तर नसेल, असं त्याला (उभं) राहून राहून वाटायला लागलं, कारण शब्दाशब्दाला लाज काढणारा एक म्हातारा आणि वाक्यावाक्याला दात काढणारा दुसरा. त्याला हे काही बरोबर वाटेना, तरीही धीरानं टिकून तो बोलत राहिला....)

    अंबिलढगे: तुम्हाला नाव लिहायला सांगितलय, उखाणा घ्यायला नाही. खाजगी काय आहे यात ?
    अण्णा: वा रे वा! एखाद्याच्या घरात घुसून त्याला त्याच्या बायकोचं नाव, वय विचारणं हे खाजगी नाही? चला, तुम्ही सांगा तुमच्या बायकोचं नाव आणि वय.... उखाण्यात पण चालेल....
    अंबिलढगे: ओ काका, उगाच डोकं नका फिरवू... द्या पटकन १० मिनिटात फॉर्म भरुन किंवा काकूंना बोलवा....
    अण्णा: माझी काकू तर माझ्या लहानपणीच वारली ...
    अंबिलढगे: तुमची काकू नाही हो.... म्हणजे तुमच्या बायकोला बोलवा हो.... नाहीतर मी तुमची तक्रार करेन....
    अण्णा: तक्रार? का बरं? मी बायकोला बोलावलं नाही म्हणून? तिला बोलावयाचं असेल तर प्लॅन्चेट करावं लागेल. आत्मे येतात म्हणे प्लॅन्चेट करुन बोलावल्यावर. वासूनाना मी पाट आणतो, तुम्ही वाटी आणा. तसही तिने मरण्यापूर्वी माझी ‘बर्ड-वॉचिंग' ची दुर्बीण कुठे लपवून ठेवली आहे, ते विचारायचंच आहे मला......
    अंबिलढगे: बास झाली तुमची बडबड.... मी तक्रार करेन की तुम्ही माहिती देत नाही म्हणून...
    अण्णा: असं मी कधी म्हणालो?
    अंबिलढगे: मग द्या ना हा फॉर्म...
    अण्णा: घ्या.
    अंबिलढगे: अहो, म्हणजे भरुन द्या....
    अण्णा: तुम्हीच भरा, मी सांगतो...
    अंबिलढगे: अशी परवानगी नाही आम्हाला... खाडाखोड पण चालत नाही.
    अण्णा: मग खाडाखोड न करता भरा.

    वासूनाना: ह्यॅ...ह्यॅ...ह्यॅ... काय हो, तुम्हाला जनगणनेचं ट्रेनिंग देत नाहित का हो?

    (पहिल्यांदाच वासूनानांनी तोंडातुन दात सोडून शब्द काढले होते. जनगणनेच्या कामाचं ट्रेनिंग आपण टाळलं याचं अंबिलढगेला पहिल्यांदाच वाईट वाटलं.)

    अंबिलढगे: फॉर्म भरुन द्यायची आम्हाला परवानगी नाही.
    अण्णा: मग निरक्षरांचं काय करता तुम्ही? (अंबिलढगेनी कधी कामच न केल्यामुळे खरच निरक्षरांचं काय करतात हे त्याला ठाऊकच नव्हतं.)
    अंबिलढगे: तुम्ही निरिक्षर आहात का ?
    अण्णा: नाही. मी पीएचडी झालोय. ‘अंबिलओढ्यात पडणारं ढगांचं पाणी’ हा विषय घेऊन.

    वासूनाना: ह्यॅ...ह्यॅ...ह्यॅ...

    अण्णा: पण आज मला लिहीता वाचता येणार नाही.
    अंबिलढगे: का ?
    अण्णा: कारण माझा चष्मा दोरी बसवयला दुकानात टाकलाय. मिळेल महिन्यानी. तुम्ही विचारा काय काय हवीये माहिती?

    (पटापट प्रश्न संपवून काम संपवून टाकावं ह्या विचाराने अंबिलढगेनी प्रश्न वाचयला सुरवात केली. अंबिलढगेला कामाला लावणारा हा जगातला पहिला इसम होता.)

    अंबिलढगे: पूर्ण नाव, आईवडलांची पूर्ण नावे, पत्ता, जात, जन्मतारीख, जन्मस्थान, शिक्षण, व्यवसाय, घरातल्या वस्तू , वाहने, खोल्यांची संख्या, फोन, इंटरनेट, भ्रमणध्वनी.....
    अण्णा: जात?? ही जनगणना जातीनिहाय नाही, हे तुम्हाला सागितलं नाही का निवडणूक आयोगाने? जातीवरून कोणी हाक मारली तर कोर्टात केस दाखल होते आणि तुम्ही मला जात विचारताय?

    वासूनाना: तुम्हाला प्रश्नोत्तरांचं ट्रेनिंग देत नाहित का हो?

    अण्णा: अहो सरकार, जाती-विरहीत समाज घडविण्याची ही पहीली पायरी आहे. शेवटी माउंटबेटन देश सोडून जाताना जे म्हणत होता ते तुम्ही खरे करून दाखवित आहात. तुमचा दांभिकपणा बंद करा आता.

    (अंबिलढगेला माउंटबेटन कोण हे जसं कळालं नाही तसंच ते "दाम-भीकपणा" हा काय प्रकार आहे ते समजलं नाही. पण काहीतरी बंद करायचंय इतकच त्याला कळलं. ते मुळीच बंद न करता तो पुढे भांडायला लागला.)

    अंबिलढगे: कोण भीक मागतंय? द्यायची तर द्या माहिती, नाहीतर फाडून टाका हा फॉर्म..... माझं काही जात नाही.... मी काढलाय काय हा फॉर्म...? आणि कोन कुठला माउंटबेटन तुम्हाला कुठंतरी जाताना काहीतरी बोलला तर माझ्यावर कशाला चिडताय ?
    अण्णा: कोण कुठला माउंटबेटन?? शिक्षकच आहात ना तुम्ही ?
    वासूनाना: तुम्हाला इतिहासाचं ट्रेनिंग देत नाहित का हो?

    वासूनाना फक्त दातच काढत होते तेच बरं होतं. अंबिलढगेला आत्तापर्यंत कोणत्याही प्रश्नाचं उतर मिळालं नव्हतं. वर अपमानच जास्त. बरं, असंच काम न करता जावं तर हेडमास्तरांचं आव्हान... ! सगळी उत्तर ठोकून देऊ असा विचार करुन अंबिलढगे रागारागात परत निघाला.)

    अण्णा: ओ सरकार, कुठे निघालात? तुमच्या माहितीसाठी सांगतो, जनगणना प्रगणकाने खोटी माहिती लिहल्यास किंवा काम पूर्ण न केल्यास जनगणना अधिनियम १९४८ उपनियम २(ब) अन्वये फौजदारी गुन्हा दाखल केला जातो. दोषींना ३ वर्षांची कैद व १ हजार रुपये दंडाची कारवाई केली जाऊ शकते. तेंव्हा तुमची मनगणना बंद करा आणि जनगणना चालू करा.

    (ह्या धमकीने अंबिलढगे तर हदरुनच गेला. काम टाळल्यामुळे एकदा त्याला ३ दिवस बिनपगारी रजा आणि १०० रुपये दंड झाला होता. पण ३ वर्षांची कैद व १ हजार रुपये दंड हे ऐकुनच त्याला घाम फुटला आणि आपला शाळेतला माज किती बिनबुडाचा असतो हे त्याला समजलं आणि तो व्यथाच मांडायला लागला.)

    अंबिलढगे: साहेब, थोडं समजून घ्या हो... आमचं रोजचं काम सांभाळून आम्ही हे करतोय. सरकारचे नोकर आम्ही, ते जे सांगतील तसं करावं लागतं आम्हाला. जनगणना करणरे शिक्षक सुद्धा आपलीच माणसे असतात. त्यांना होणार त्रास कोणी समजूनच घेत नाहीत.
    अण्णा: खरं आहे मास्तर तुमचं..... मी वाचलंय पेपरात की खूप विचित्र अनुभव येतात तुम्हाला. लोक नीट बोलत नाहीत, साधं घरात सुद्धा बोलवत नाहीत, दहा मिनिटांच्या कामाला उगाचच तास-तास लावतात, चेष्टा करुन उगाचच हसतात. छे! काही कौतुकच नाही लोकांना... मध्ये तर मी पेपरात वाचलं की एक जनगणना प्रगणक माहीती घ्यायला एका घरी गेला. त्या घरामध्ये एकटी महिला होती. मी जणगणना कर्मचारी आहे असे सांगुनही तिने दार उघडले नाही. नंतर शेजारी कळले की तिचा नवरा घरी आल्यावर विशिष्ट तर्‍हेने दोनदा शिट्टी वाजवतो, मग नंतर ती दार उघडते. बोला आता ?
    वासूनाना: तुम्हाला शिट्टी वाजवायचं ट्रेनिंग देत नाहित का हो?

    (ह्या वेळेला लाज वासूनानांनी आणि दात अण्णांनी काढले होते. नक्की काय करावं ते अंबिलढगेला सुचत नव्हतं. तब्येत बरी नाही, पुन्हा येतो अशी थाप मारुन पळून जावं, असा विचार तो करायला लागला. 'जान सलामत तो नोकरी पचास!')

    अंबिलढगेनी "मी जातो" असं म्हणताच अण्णा एकदम पिसाळलेच.

    अण्णा: खबरदार इथून हललात तर...! ह्या वाड्यात भर दुपारी पाऊल टाकून परत जाणारी पावलं अजून उठायचीयेत.... अजिबात सोडाणार नाही तुम्हाला... मी म्हणत होतो की नंतर या, पण तुम्ही सरकारी कामाची धमकी दिलीत आणि मला गाढ झोपेतून उठवलंत... आता तुम्हाला हे काम पूर्ण करावंच लागेल.....

    अंबिलढगेला त्या दोन्ही म्हातार्‍यांच्या घार्‍या डोळ्यांत कुणालाही भिती वाटावी अशी एक वेडसर झाक दिसत होती. (‘घार्‍या डोळ्यांत’ ह्या शब्दांवरुन काहीही अर्थ काढू नये. घार्‍या म्हणजे घार जसं आपल्या सावजाकडे बघते तशा डोळ्यात असा त्याचा अर्थ आहे.) तर त्या घार्‍या डोळ्यांना घाबरुन तो तिथेच खिळून राहिला. त्याने खिशातून पेन काढलं आणि गुपचूप तो फॉर्म भरायला सुरूवात केली, ते सुद्धा अण्णांच्या कोणत्याही उत्तराला आक्षेप न घेता.... प्रश्नोत्तरं संपल्यानंतर दिसणारा अण्णांचा फॉर्म खालीलप्रमाणे:

    नाव: नावात काय आहे?
    सध्याचा पत्ता: इस्पीक गोटू
    कायमचा पत्ता: बदाम राजा
    लिंग: किलिंग
    जन्मतारीख: भाज्य १००, हार ६३ क्षेप ९०. मसावि १, अपवर्तन + उत्तरात येणार्‍या लब्धीला १० ने गुणावे /१०० भागिले ६३, लब्धि १ बाकी ३७; ६३ भागिले ३७, लब्धि १, बाकी २६ वगैरे करून मिळालेली संख्या
    जन्मठिकाण: ऑपरेशन टेबल
    राष्ट्रीयत्व: कदाशीव पेठीय
    जात: अजातशत्रू
    शैक्षणिक पात्रता: फुलपात्र
    कुटुंबप्रमुखांशी नाते: ना ते, ना हे, आहे ना ते
    घरातल्या सदस्यांची संख्या: १/२

    हा फॉर्म घेऊन अंबिलढगे जिवाच्या आकांताने पळत गेला. कुठे? - माहित नाही, कारण तो गावापर्यंत पोहचलाच नाही. सदरच्या फॉर्मचं अंबिलढगेनी काय केलं? - माहित नाही, कारण तो आयोगापर्यंत पोहचलाच नाही. जनगणनेचं पुढं काय झालं? तेही माहीत नाही.

    पण एक नक्की! जी काही भारताची लोकसंख्या असेल त्यात एक आकडा नक्कीच कमी असेल.... अण्णांचा नाही.... अंबिलढग्याचा...! कारण त्याने स्वतःचाच फॉर्म भरला नव्हता आणि तो ज्या मेंटल हॉस्पीटलमध्ये भरती झाला तिथली जनगणना आधीच झाली होती!
    --
    धुंद रवी
    dhundravi@gmail.com

    10 comments:

    Abhishek October 20, 2011 at 2:15 PM  

    भन्नाट .... आंबिलढगे साहेबांची व्यवस्थित वाटेला लावली हेडमास्टरांनी... आंबिलढगे, जिथे असतील तिथे बहुधा तो जनगणना की जनगनणा फोर्म फ्रेम करून लावला असेल..
    ललित-लेख छान झालाय!

    प्रतिक ठाकूर October 20, 2011 at 2:25 PM  

    हसून हसून आतड्याला पीळ पडलेत. ==)

    हा खरा खुरा दिवाळीचा फराळ. :)

    क्रांति October 20, 2011 at 7:23 PM  

    मला पण मेंटल हास्पिटलात टाकावं का, असा विचार घरची मंडळी करत आहेत! केव्हाची वेड्यासारखी हसत सुटलीये! कहर आहे कहर.

    सिद्धार्थ October 20, 2011 at 10:26 PM  

    प्रचंड, महाप्रचंड, अती महाप्रचंड...
    अशक्य वेडा हसतोय...

    Anonymous,  October 20, 2011 at 11:42 PM  

    कैच्याकै भन्नाट ... हास्याचा पूर आलाय नुसता ... खुपच भारी

    Suhas Diwakar Zele October 21, 2011 at 1:41 PM  

    _/\_ _/\_ _/\_

    त्रिवार सलाम...इथे आई म्हणतेय मला वेड लागलंय ;-)

    Kanchan Karai (Mogaraafulalaa) October 22, 2011 at 11:03 AM  

    ज ण ग न णा एकदम झक्कास! लेख प्रथम वाचला तेव्हाच खूप हसू फुटलं होतं. धुंद रवीच्या बेधुंद जगातला आणखी एक चमत्कार. दर दोन-तीन संवादांनंतर येणार वासूनानांचं ह्यॅ ह्यॅ ह्यॅ जबरदस्त!

    kash October 24, 2011 at 1:56 PM  

    maja ali .... dhamal ... khup chhan... Dhanyawad..

    मंदार जोशी October 27, 2011 at 12:04 AM  

    अरे बाबा तुझ्यावर असं लिहायला बंदी घातली पाहीजे. हसून हसून आतडी बोंबलली तर कोण जबाबदार?

    धमाल रे भौ.

    Post a Comment

    शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
    मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

    Creative Commons License
    Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
    Based on a work at mfda2011.blogspot.com.

    Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


      © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

    Back to TOP