बंड्या, बकुळी आणि एक 'रटाळ' लवस्टोरी..!

"जानू, किती वेळ मी तुझी इथे वाट पाहतेय." अंगात रंगबिरंगी फुलं असलेला शर्ट आणि पायात तंग जीन्स घातलेल्या बंड्याला पाहताच बकुळी आपल्या नाजुक बोटांनी हातातील फुलाची पाकळी खुडत बोलली.

"फार उशीर झाला का गं मला यायला?" बंड्या आपले दोन्ही हात खिशात टाकून जीन्स थोडी वर करत बोलला.

"तू आला नसतास तर तुझी वाट पाहण्यात माझे अखेरचे श्वासही मी या इथेच घेतले असते." बकुळी एका हाताचं बोट बंड्याकडे रोखून दूसर्‍या हातानं मेकअपनं बरबटलेलं आपलं थोबाड लपवित म्हणाली.

"पण हे राजसा तुझ्या उशीरा येण्याचं प्रयोजन तरी मला कळू दे." बकुळी संगीत नाटकातील नटीला शोभेलसा अभिनय करत म्हणाली.

"तुला माहीतच आहे. आमच्या घरात आई-बाबांच्यात नेहमी शीतयुद्ध सुरू असतं. पण आज त्यातला शीतपणा संपला आणि अचानक युद्धाला तोंड फुटलं." 'अचानक' हा शब्द उच्चारताना बंड्यापण अचानक बाकावरून उठून उभा राहीला.

"म्हणजे झालं तरी काय इतकं?" हनुवटीवर तर्जनी टेकीत बकुळी म्हणाली.

"आई मला इतकचं म्हणाली, चक्कीवर गहू कोण टाकणार, तुझा बाप? बस्स...! बाबांनी ते ऐकलं आणि शिव्यांचं 'दळण'वळण सुरू झालं." बंड्याने घरातलं भांडण असं चव्हाट्यावर आणलं.

"पण तुझ्या आई-बाबांच्या भांडणाचा आणि तुझ्या उशीरा येण्याचा काय संबंध?" उभ्या असलेल्या बंड्याकडे पाहत बकुळी बोलली.

"अगं भांडताना माझ्या उजव्या पायातली चप्पल आईच्या हातात आणि डाव्या पायातली बाबांच्या हातात होती." बंड्या आपल्या पायातील चपला अनुक्रमे उजव्या आणि डाव्या हातात घेवून साभिनय म्हणाला.

"मग रे काय झालं?" बंड्या बाबुराव अर्नाळकरांची एखादी रहस्यकथा ऐकवित असावा, अशी समजूत करून बकुळीच्या चेहर्‍यावरील उत्कंठा वाढली.

"मग...! मी आमच्या माळ्यावर चढण्यासाठी असलेल्या शिडीच्या सगळ्यात वरच्या टोकाच्या पायरीवर चढलो आणि तिथूनच आईबाबांना म्हणालो, जर तुम्हा दोघांच्या भांडणात माझ्या तळपादरक्षक चपलांचे बंद तुटले तर चपला तर नवीन येतील पण त्या घालण्यासाठी पाय मात्र शाबुत राहणार नाहीत." बंड्या त्वेषाने की काय म्हणतात ना, तसा म्हणत होता.

"अगंबाई..! खरं की काय? मग रे, मग रे!" बकुळीचा उत्साह ओसंडत होता.

"मग काय? माझी तंगडे तोडून घेण्याची 'लंगडी' धमकी ऐकताच आईबाबांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याच रागात त्यांनी आपापल्या हातातील माझ्याच चपला माझ्याच दिशेने भिरकावल्या. मी 'चपळा'ईने तो मार चुकवला." बंड्या आपली चिमुकली छाती जमेल तितकी फुगवून म्हणाला.

"माझ्यासाठी तू चपलांचा मार चुकवलास? हाऊ रोमँटीक..!" जणूकाही बंड्याने दुसर्‍या महायुद्धातील हिटलरच्या विमानांनी टाकलेला बॉम्बच चुकवला असावा, अशी बकुळीची धारणा झाली असावी. तसा मुद्राभिनय करत ती म्हणाली.

"प्रिये अगं तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो. अगदी आकाशातील चंद्र-तारे तोडून आणून तुझ्या मोकळ्या केसांत माळू शकतो. पण नंतर जेव्हा विचार करतो, तेव्हा मला नासावाल्यांची कीव येते. तुझ्या प्रेमाखातर प्यार की निशानी म्हणून ताजमहाल बांधण्याचा माझा मानस आहे. बस्स..! देवाकृपेने एकदा कर्ज मंजूर होऊ दे." बंड्या पोटतिडीकीने बोलत होता.

"इतकं प्रेम करतोस तू माझ्यावर?" बकुळी.

"जानू , तुम मेरे ख्वाबोंमे रहती हो. तुम मेरे खयालो में रहती हो. तुम मेरे साँसोमे रहती हो." बंड्या शाहरूख खानसारखा दोन हात हवेत पसरवून बोलला.

"नह्ही..!" बकुळी हिंदी चित्रपटातील नटीसारखी आपली मान बंड्याच्या विरूद्ध दिशेस फिरवून आणि आपल्या एका हाताची पालथी मुठ कपाळावर टेकवून दूसरा हात बंड्याकडे रोखून एकदम हेमा मालीनीच्या संवादफेकीतील ढंगात म्हणाली. "तुम्हे किसीने गलत पता बताया है. मै तो सरपंच के घर के पडोस में रहती हूँ."

"मग माझ्या क्‌ क्‌ क्‌ क्‌ क्‌ काळजात कोण राहतं?" बंड्याला जुही ऐवजी शाहरूख 'चावला' होता.

"ए ऑप्शन दे ना." असं म्हणून बकुळी आपली बत्तीशी दाखवत खिदळली.

"तुझे दात हिर्‍याहून चमकदार आहेत." बंड्या बकुळीची दंतपंक्ती पाहत म्हणाला.

"तुझे दातसुद्धा सोन्याहून पिवळे आहेत." असं म्हणून बकुळीने पुन्हा आपल्याकडे बत्तीस दात आहेत, हे शाबीत केलं.

बकुळीच्या या उत्तराने बंड्यातल्या शाहरूखचं रूपांतर अमरीश पुरीत होईल की काय? याची भीती वाटू लागली.

"वेडे तुझ्या शिवाय का कुणी आहे या काळजात! ऐक... ऐक... या हृदयातील प्रत्येक स्पंदनातून फक्त तुझचं नाव ऐकू येतयं." असं म्हणून बंड्याने बकुळीला आपल्या जवळ ओढलं.

"तुझ्या हृदयाने जागा बदलली की काय? उजव्या बाजूला दर सेकंदाने आवाज येतोय." बकुळीने नवाच शोध लावला.

"अगं घड्याळ आहे ते. पट्टा तुटलाय म्हणून खिशात ठेवला होतं." बंड्या आपल्या शर्टाच्या उजवीकडील खिशातून घड्याळ काढून दाखवत म्हणाला. "ये अशी.. डावीकडे ऐक."

बकुळीने बंड्याच्या डावीकडील छातीवर कान ठेवला आणि काय आश्चर्य..! तिला त्यातून चक्क बकुळी (बकुळी...बकुळी) हे तिचे नाव आणि 'कंसातले' एको ऐकू आले. पण बिच्चारीला हे कोण सांगणार की तिला त्या एकोमिश्रीत हाका 'छातीधारक' बंड्याच मारत होता म्हणून.

"ऐकल्यास ना..!"

"हम्म!"

"मग आता आमच्या गालावर तुमच्या नाजूक गुलाबी ओठांकरवी चुंबनाचा वर्षाव करा बरे." बंड्या आपला एक गाल पुढे करत म्हणाला.

बकुळीनं आपलं तोंड बंड्याच्या गालाजवळ नेलं आणि आपली जीभ बाहेर काढून ती बंड्याचे गाल चाटू लागली.

बंड्याचे गाल जेव्हा बरेचसे ओलसर झाले तेव्हा हळूहळू बंड्याने आपले डोळे उघडले आणि तो एकदम 'चाट' पडला.

बंड्याच्याच घरात पाळलेलं लहान मांजर आपल्या लपलपत्या जीभेने बंड्याचं गाल चाटत होतं.

*****

"हायला त्या शालूनं मला येडं केलयं यार. ज्याम लाईन देते मला ती." गज्या आपल्या हातातील सिगरेट पेटवत म्हणाला.

"जसजशी ती मोठी होत चाललीय, तिचे कपडे मात्र छोटे-छोटे होत चाललेत." शंकर्‍याचं निरिक्षण कमालीचं होतं.

"ए गपे. साला, तिच्यावर डोळा ठेवायचा नाय कुणीपण." शंकर्‍याच्या डोक्यात टपली मारत गज्या बोलला.

"गज्या, अरे काय ही अभद्र भाषा.! अरे प्रेम म्हणजे एक सुखद भावना आहे रे. इतकं चांगलं गोंडस नाव असताना 'लाईन' म्हणून तू प्रेमाला हिणवतोयस." बंड्या आपल्या नाकावरील घसरलेला जाड भिंगांचा चष्मा डोळ्यांकडे सरकवत म्हणाला.

"लेका तरी मी सांगत होतो, खांडेकर जास्त वाचत जावू नकोस." गज्या नाकाने धूर काढत म्हणाला.

"तुला कळणारच नाही प्रेमाचं महात्म्य." बंड्या गज्याकडे एक कुत्सित कटाक्ष टाकत म्हणाला.

"याचा सरळ अर्थ असा होतो की, बंडोपंत प्रेमात पडले." शंकर्‍या गज्याच्या बोटांच्या कैचीतील सिगरेट घेवून आपल्या बोटांच्या कैचीत पकडीत म्हणाला.

"कोण आहे ती गुलछबू?" गज्या पाठीमागल्या दगडाला रेलून बसत म्हणाला.

खरतरं 'गुलछबू' या विशेषणाने बंड्याला गज्याचा विलक्षण राग आला होता, परंतु त्याने तो महत्प्रयासानं तिथचं दाबून टाकला.

"बकुळी" बंड्या जणू ऐश्वर्या रायचं नाव घ्यावं इतक्या हळूवारपणे म्हणाला.

"बकुळी..!" रेलून बसलेला असताना अचानक आश्चर्यचकीत झालेल्या गज्याचा आणि नाकातून धूर काढण्याचा सराव करत असतानाच अचानक 'कानातून' धुर बाहेर पडत असलेल्या शंकर्‍या चा कोरस.

"होय. बकुळी" असं म्हणून बंड्याने शंकर्याणच्या हातातून सिगारेट जवळजवळ हिसकावून तिचा लांब झुरका मारला आणि सहन न झाल्याने खोकू लागला.

"लेका एवढ्याशा सिगरेटीनं तुला खोकला आला. मग हुक्का कसा ओढायचास तू?" सिगरेटी फुंकण्यात माहीर असलेला गज्या बोलला.

"हुक्का ओढताना तो हुक्काबुक्का होईल." शंकर्‍याच्या या फालतू कोटीवर गज्या आणि शंकर्‍याने विचकत एकमेकांना टाळ्या दिल्या.

"अरे ती सिगरेटच्या धुरासारखी गोरीपान अन् तू सिगरेटच्या राखेसारखा काळा." हुक्क्यावरून बंड्याच्या उडवलेल्या खिल्लीमुळे चेहरा पाडून बसलेल्या बंड्याला चिडवत गज्या म्हणाला.

"काल ती माझ्या स्वप्नातदेखील आली होती." बंड्या आपल्या पायाच्या अंगठ्याने माती उकरत म्हणाला.

"तो बात यहाँ तक पहुंच गयी है|" शंकर्याप 'जानी'फेम राजकुमारसारखा घोगर्‍या आवाजात म्हणाला.

"मग काय काय केलसं स्वप्नात?" गज्या आपल्या वाट्याला आलेल्या सिगरेटीचा एक झुरका मारत म्हणाला.

या प्रश्नाला काय उत्तर द्यावं हे बंड्याला सुचलं नाही, कारण स्वप्नातला तो गोड प्रसंग वास्तवात किती किळसवाणा होता? हे यांना सांगून बंड्याला पुन्हा आपली फजिती करून घ्यायची नव्हती.

"तिला तू तसं विचारलस?" शंकर्‍याने मुद्द्यालाच हात घातला.

"नाही रे. अजून धीर झालेला नाही." चष्म्याच्या काचा पुशीत बंड्या.

"काळजी नसावी बालका. काही दिवसांवर व्हॅलेंटाईन डे येऊन ठेपलाय. त्यादिवशी जो मुलगा आपल्या आवडत्या मुलीसमोर आपल्या प्रेमाचा प्रस्ताव ठेवतो, तो प्रस्ताव नामंजूर करण्याची गुस्ताखी ती मुलगी कदापि करीत नाही, असे दस्तुरखुद्द संत व्हॅलेंटाईन महाराज म्हणतात." गज्याच्या पाठीमागे उभं राहून शंकर्‍याने उरलीसुरली सिगरेट फुंकली आणि तोंडावाटे धूर काढून धुराचं वलय निर्माण केलं, तेव्हा गज्या साक्षात संत व्हॅलेंटाईन वाटत होता.

"...आणि एकदा का पोरगी पटली की, या व्हॅलेंटाईन महाराजाला बियरचा अभिषेक कर. बोला व्हॅलेंटाईन महाराज की....." इति शंकर्‍या.

"जय हो... जय हो....!" बंड्याने शंकर्‍याच्या जयजयकाराला साथ दिली.

*****

प्रेमाच्या वाटेवर गडद अंधारात चाचपडत चालणार्‍याला एखाद्याने अचानक हॅलोजनचा प्रकाश दाखवावा, तसा 'गज्या' बंड्याला हॅलोजनसम भासला. कधी एकदाचा व्हॅलेंटाईन डे उजाडतोय, असं बंड्याला झालं होतं. एकीकडे बंड्याच्या आरशासमोर उभं राहून बकुळीला प्रपोज करण्याच्या तालमी सुरूच होत्या.

... आणि एकदाचा तो दिवस उजाडला. बंड्या आदल्या रात्री झोपला नव्हताच म्हणा. भल्या पहाटे उठून प्रातर्विधी उरकून बंड्याने आपल्या आत्तेभावाच्या लग्नात शिवलेले नवे कपडे घातले. आदल्या दिवशी खरेदी केलेल्या गुलाबाच्या फुलावर पाण्याचे शिंतोडे मारून त्यास 'ताजे' केले आणि शिपायांच्याही कितीतरी आधी तो कॉलेजात पोचला.

पण सबंध दिवसात एकदाही बकुळीला आपली 'दिल की बात' बोलण्यासाठी एकांत त्याला मिळाला नाही. गुलाबाचं फूल सुकत चाललं होतं. संध्याकाळी कॉलेज सुटलं तेव्हा त्याने तिला फारशी रहदारी नसलेल्या रस्त्यात गाठलं.

"बकुळी, मी काही बोललो तर रागावणार नाहीस ना?" हातातील गुलाबाचं फूल आपल्या पाठीमागे लपवित बंड्या म्हणाला.

"असं का बोलतोएस बंड्या? बोलून तर बघ. रागवायचं की नाही ते मी नंतर ठरवेन ना?" बकुळी शांतपणे म्हणाली.

"तुला माहीतीये आज व्हॅलेन्टाईन डे आहे." बंड्या.

"हो माहितीये. कॉलेजात काय असंख्य डे साजरे करतात. त्यात काय?"

"काही नाही. म्हणजे त्‌ त्‌ त्‌ त्‌ तो.. तो.. तो.. आपला गज्या आहे ना गज्या. तो.... तो म्हणाला की, आजच्या दिवशी जर एखादा मुलगा आपल्या आवडत्या मुलीला प्रपोज करेल त्याला ती मुलगी नकार देणार नाही." बंड्या पटापट बोलून मोकळा झाला.

"म्हणजे तू मला प्रपोज करणारेस! सुकळीच्या, कधी आपलं थोबाड आरशात पाहीलयसं का? हे, हे केस. ही काय हेअरस्टाईल म्हणावी! असं वाटतं डोक्यावर तेलाची अख्खी बाटली रिकामी केलीय आणि त्यावर रोडरोलर फिरवून केसांना चपचपीत बसवलयं. आणि हा हा चष्मा. अहाहा..! त्या चष्म्यातून तुझे डोळे बघ बटाट्यापेक्षाही मोठ्ठाले दिसताहेत. घुबडाने पाहिले तर तेपण घाबरेल. रंग तर काय वर्णावा..! रंगपेटीतले सगळे रंग एकत्र केल्यावर जो रंग तयार होईल तो रंगपण फिका रे तुझ्यापुढे. नुसतचं मेलं ते गबाळं दिसणं! त्या पुस्तकांच्या अडगळीत बसलेल्या पुस्तकी किड्या मीच काय, जगातली कुठलीच मुलगी तुझ्यासारख्या बावळट दिसणार्‍या मुलाच्या प्रेमात पडणार नाही." बकुळीने बंड्याच्या शरीराचा एक्स-रे काढला.

आपल्या अवयवांची होणारी 'अवयवहेलना' बंड्या खाली मान घालून निमूट सहन करत होता.

"पण माझं ऐकून..." बंड्या काही बोलू पाहत होता.

"आता जाणारेस की माझ्या चपलांचा नंबर गालावर छापून हवाय तुझ्या." बकुळी आपली चप्पल काढत म्हणाली.

"जातोय. पण एक बरं झालं, तू हे सिद्ध केलसं की, हे प्रेमबिम सारं झूट आहे. केवळ कवीकल्पना..! नाहीतर मी उगाच कवटाळत बसलो असतो त्या प्रेमाच्या भ्रामक व्याख्यांना. ह्या चेहर्‍यावचं मटेरियल तेवढं देखणं पाहीजे बस्स..! मग बघा तुमच्यावर प्रेमाची खैरात होते की नाही ते! मला आता कळून चुकलयं, प्रेम माणसाच्या दिसण्यावर केलं जातं, त्याच्या असण्यावर नाही. तू माझे डोळे उघडलेस. त्याबद्दल मी तुझा ऋणी आहे. गुड बाय." असं म्हणून बंड्याने आपल्या हातातील गुलाबाचं फुल दूर कुठेतरी भिरकावून दिलं आणि तो चालू लागला.

बकुळी अजुनही त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत होती.

*****

बकुळीच्या त्या खोचक शब्दांचा बंड्याच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. सर्वप्रथम त्याने वाचन संपूर्णतः बंद केले. कॉलेजात तर फक्त एक मांसल शरीर जाई. मन कुठं भरकटत होतं? कळायला मार्ग नव्हता. त्याची अन्नावरची वासना उडाली. त्याचा परिणाम त्याच्या तब्बेतीवर दिसू लागला. कॉलेज सुटल्यावर एकटाच दूर रानात जाऊन कुठल्यातरी कातळावर बराच वेळ नुसताच खिन्न बसून राही. या जगाच्या गर्दीत असून नसल्यासारखा..!

एके दिवशी गज्या, शंकर्‍याने धीर करून बंड्याची ही गंभीर अवस्था बकुळीला सांगितली. या गोष्टीचे बकुळीला फार वाईट वाटले. आपण इतक्या वाईट का वागलो? असं म्हणून ती स्वतःलाच दोष देत राहीली. तिला त्या घटनेचा प्रचंड मनस्ताप झाला. कसं कुणास ठाऊक? पण कालांतराने तिला वाटू लागलं की, बंड्याचं आपल्यावर खरं प्रेम आहे अगदी जिवापाड. आपण उगाच खुळ्यासारखं वागून त्याच्या भावनांशी खेळलो.

काही दिवसांनी बंड्याचा वाढदिवस आला. त्यादिवशी बकुळीने बंड्याच्या घरी जाऊन त्याला चकचकीत कागदात गुंडाळलेलं एक पुस्तक भेट म्हणून दिलं. बंड्याने ती भेट तिथचं टेबलावर ठेवली पण ती उघडून पाहण्याची तसदी मात्र घेतली नाही. दिवस भकास भकास जात होते. नुसतेच जात होते. बंड्याच्या जीवनात काही नवं घडत नव्हतं. बकुळी बंड्याशी बोलायचा पुष्कळ प्रयत्न करी पण तो तुरळक शब्दांपलीकडे उत्तर देण्याची तसदी घेत नव्हता. काही दिवसांनी उरला-सुरला संवादही खुंटला.

पाहता पाहता दोन वर्षे उलटली.

एके सकाळी बंड्याला डोळ्यांवर कसलातरी तीव्र प्रकाश पडल्यामुळे जाग आली. सूर्याची किरणे टेबलावरील त्या चमचमत्या कागदावर पडून तिथून ती थेट बंड्याच्या डोळ्यांवर परावर्तित झाली होती. बंड्याने भेटीवरील तो चमचमता कागद काढून टाकला. आत खांडेकरांचं एक पुस्तक होतं. सहज त्यानं ते चाळलं. पुस्तक चाळत असतानाच त्या पुस्तकातून कागदाचा एक लहानसा तुकडा जमिनीकडे झेपावला. बंड्याने तो उचलला आणि त्यातील मजकूर वाचल्यावर त्याची झोप खाडकन उडाली. आपण स्वप्न तर पाहत नाही ना म्हणून, तो स्वतःला चिमटे काढू लागला.

कागदावरील मजकूर होता:
बंड्या माझंही तुझ्यावर नितांत प्रेम आहे. मला कधी-कधीच अंतर देऊ नकोस.
तुझी आणि फक्त तुझीच,
बकुळी
.

स्वर्ग फक्त दोन बोटंच उरलेलं असावं, अशा स्वर्गीय आनंदात लगेचच बंड्याने बकुळीचा शोध घेतला. पण त्याला ती भेटली नाही. काही महीन्यांपूर्वीच तिचं लग्न झाल्याचं त्याला कळलं. तो प्रचंड निराश झाला. ते पुस्तक उशीरा वाचल्याचा त्याला पश्चाताप झाला. बकुळीविना आता तर त्याला हे जगणंच नकोसं वाटू लागलं.

...आणि एके दिवशी बंड्या फिनेल पिऊन बेशुद्ध पडल्यामुळे त्याला हॉस्पिटलात दाखल करण्यात आले. फिनेलचा दर्जा साधारण असल्यामुळे तो बचावला खरा पण प्रेमाची लढाई मात्र तो हरला होता.

आजही बकुळीने दिलेले ते पुस्तक बंड्याकडे आहे आणि त्यातील तो कागदही.

(तळटीप: वरील कथा संपूर्णपणे काल्पनिक आणि अक्षरश: रटाळ आहे. ही कथा वाचताना वाचकांना 'कंटाळा' नामक आवडती गोष्ट आली असल्यास त्याला लेखक जबाबदार राहणार नाही. कारण लेखकाने मोठ्या चतूराईने शिर्षकातच कथा रटाळ असल्याचं नमूद केलयं. परीक्षकांनी कथेतील बारिक-सारीक गोष्टींकडे कानाडोळा करणे अपेक्षित आहे. लेखक त्या सगळ्या गोष्टी जाणून आहे. उदा. बंड्याच्या वाढदिवशी बकुळीने दिलेलं ते पुस्तक तब्बल दोन वर्ष त्याच टेबलवर पडून कसं राहीलं? इ. इ. )
--
अमित गुहागरकर
amit.guhagarkar@gmail.com

9 comments:

मंदार जोशी October 20, 2011 at 2:46 PM  

अम्या, अप्रतीम आहे :)

क्रांति October 20, 2011 at 6:31 PM  

हसून हसून पुरेवाट झाली! काय भारी प्रेमकहाणी आहे! भन्नाट एकदम.

SUNIL JOSHI October 20, 2011 at 10:24 PM  

सुंदर प्रेमकहाणी... रटाळ ..कोण म्हणतोय ....
मस्त आहे अमित ... वाह वाह ....

Anonymous,  October 20, 2011 at 10:43 PM  

एकदम धमाल झालीये स्टोरी ... :)

Kanchan Karai (Mogaraafulalaa) October 21, 2011 at 12:32 PM  

अमितजी, खूप इंटरेस्टींग रटाळ स्टोरी आहे बरं का! जाम आवडली. तळटीपसुद्धा आवडली. बंड्याचं स्वप्न म्हणजे जुन्या हिंदी-मराठी चित्रपटात जशा प्रकरे संवाद बोलले जात तसं वाटलं. अगदी मजेशीर.

सुधीर कांदळकर,  October 25, 2011 at 6:53 AM  

सुरुवातीचे संवाद झकास. मस्त कथा.

Mr. Shantaram Khamkar October 28, 2011 at 11:46 AM  

तु म्हणतोस तितकी रटाळ नाहीये.. ;)

मस्त !!

Anonymous,  October 28, 2011 at 1:57 PM  

aare khup khup mast story aahe....!!

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP