मनी माऊ

कुत्र्याचं पिल्लू पाळण्याची इच्छा नसलेलं मूल सापडणं कठीण आहे.आम्ही त्याला अपवाद कसे असणार? आम्ही म्हणजे मी आणि माझा धाकटा भाऊ पिंटू! कुत्रा का पाळावा, याची १०० कारणं आमच्यापाशी होती. कुत्रा का पाळायचा नाही याची १०१ कारणं आईपाशी होती. उदाहरणार्थ:

१. दिवसाकाठी चार-पाच वेळा त्याला शी-शू करायला बाहेर घेऊन जावं लागतं. कोण नेईल? सुरुवातीला उत्साह असतो. मुलं आनंदाने त्याला बाहेर नेऊन मिरवतात. कालांतराने ते काम आईवर येऊन पडतं. मग तिची स्थिती " माझं झालं थोडं नि व्याह्यानी धाडलं घोडं " अशी होते.

२. त्याच्या खाण्या-पिण्याची योग्य ती सोय. विशेषतः सामिष!

३. त्याचं वेळी-अवेळी भुंकणं. नव्हे केकाटणं.

इतरही अनेक बारीक-सारीक मुद्दे होते. पण ते जास्तीचं कारण होतं, "मला वाटतं म्हणून! " साहजिकच तिचं ऐकावं लागे. तरीही आम्ही हार मानली नव्हती. दर २-३ महिन्यांनी आम्हाला एखादं गोंडस पिल्लू दिसायचंच! आम्ही हट्ट करायचो. पिंट्या तर भोकाड पसरायचा. "अशाने मी कध्धीच जेवणार नाही", अशी धमकीही द्यायचा. पण तरीही आई बधायची नाही. ठाम राहायची तिच्या निर्णयावर. कुत्रा पाळायचा नाही म्हणजे नाही!

आईला प्राणी आवडत. पण ते लांबूनच! रस्यावरच्या कुत्र्यांना ती अधून-मधून खायला देत असे. उन्हाळ्यात त्यांच्यासाठी अंगणात पाणी ठेवत असे. पण तेवढंच! भूतदया या शब्दाच्या आवाक्यात येईल एवढंच! आम्ही तिला जंग जंग पछाडलं. बाबांनाही मस्का मारला. पण का कोण जाणे, एरवी आमच्या बाजूने किल्ला लढवणारे बाबाही अशा वेळी मूग गिळून बसायचे. "मला वाटतं म्हणून", हे कारण देऊन नवर्‍याला गप्प बसवण्याइतकी परिणामकारक बाळघुटी आई मला द्यायची विसरली आहे.

"गम्माडी गम्मत जम्माडी जम्मत, ये गं ये सांगते कानात" माझ्या तिसरी 'अ' वर्गातल्या मैत्रिणीने - छायाने- डोळे मिचकावत हे गाणं गात माझी उत्सुकता मधल्या सुटीपर्यंत ताणली. उत्सुकता शिगेला पोचली तेव्हा "इश्श गं बाई, किनई गं बाई", असं गात घरच्या भाटीला ३ पिल्लं झाल्याचं शुभवर्तमान माझ्या कानावर घातलं. नंतर वर्गात काय शिकवलं मला ओ का ठो पत्ता लागला नाही. शाळा सुटल्यावर मुद्दाम वाट वाकडी करून तिच्या घरी गेले. अडगळीच्या खोलीत कोपर्‍यात कोळशाच्या पोत्याशेजारी भाटी पांढर्‍याशुभ्र लोकरीचे ३ गुंडे कुशीत घेऊन निजली होती. माझा पाय तिथून निघेना!

संध्याकाळी पिंट्या शाळेतून येईतो कसाबसा धीर धरला. घरात काहीतरी कारण सांगून त्याला घेऊन छायाचं घर गाठलं. "जवळ जाऊ नका रे. बोचकारेल ती!" छायाच्या आईने सावध केलं. लोकरीचे गुंडे वेगवेगळे झाले होते. पिल्लं काय क्यूट दिसत होती! निर्मिती करतांना परमेश्वराच्या हातून चुकून बुक्का सांडून ओघळला होता तो नेमका एका पिल्लाच्या दोन कानांच्या मध्यभागी. दुसर्‍याची पाठ माखली होती. तिसर्‍याची शेपटी आणि एक पाय रंगले होते. अंगावरची बारीक नाजूक फर किंचित चमकत होती. बुक्क्यामुळे पांढरा रंग आणखीच खुलून दिसत होता. पिंट्याने अनिमिष नेत्रांनी ते दृश्य पाहिलं आणि तरातरा चालत वाटेत एक शब्दही न बोलता घरी थेट आई-बाबांसमोर जाऊन उभा राहिला. दोन्ही हात कमरेवर. विठोबासारखे! पण देहबोली मात्र तावातावाने वाद घालायची.

"कुत्रा नाही ना पाळायचा? आपण मांजर पाळू!"

आई-बाबा पहातच राहिले त्याच्या अवताराकडे!

"तिला दिवसातून चार-चार वेळा बाहेर फिरायला न्यावं लागत नाही. ती केकाटत पण नाही. मंजुळ आवाजात म्याव म्याव करते."

"बशीभर दूध दिलं की पुरतं तिला. हवं तर आम्हाला देऊ नकोस!" मीही पुस्ती जोडली.

एकही शब्द बोलायची आईला संधी न देता आम्ही धडाधडा सर्व मुद्दे खोडून काढले. कधी नव्हे ते बाबाही आमच्या मदतीला धावले. तेव्हा कुठे आई मांजर पाळायला तयार झाली. तरीही तिने ऐकवलंच, "दिवसातून दोन वेळा बशीभर दुधात पोळी कुस्करून देईन मी तिला. तरीही तिने दुधाच्या भांड्यात तोंड घातलं तर हातात असेल ते फेकून मारीन. तुम्ही म्हणाल, तिला उंदीर आवडतो खायला. वाढ तिला! जमणार नाही. हो. सांगून ठेवते."

काही दिवसांनी अत्यंत उत्साहाने छायाकडचं एक पिल्लू आम्ही घरी आणलं. छायाच्या आईलाही घाईच होती. ती तर तिन्ही पिल्लं द्यायला तयार होती. पिल्लाची बसायची जागा, त्यावर घडी करून ठेवलेलं रिकामं पोतं, जवळच दुधाची बशी वगैरे सोय लावली. आईची कुंकवाची डबी हाती लागली की मी कपाळावर मळवट भरायची. मनीच्या हाती काजळाची डबी लागली होती. तेवढं सोडलं तर ससाच! नाव ठेवलं मनी, पण हाक मारायला मनीमाऊ! ती चालते कशी, मान वळवते कशी, शेपटी ओढली तर फिस्कारते कशी, दबा धरून बसते कशी, अंग चाटून स्वच्छ ठेवते कशी, खाऊन झाल्यावर बशी चाटूनपुसून साफ साफ करते कशी, आम्हाला पाहून शेपटी उंचावते कशी सगळं कवतिक करून झालं. जांभई द्यायची तेव्हा तिची गुलाबी गुलाबी जीभ, बारीक तांदळाच्या कण्यांसारखे दात, चेहरा वर केल्यामुळे नीट दिसणार्‍या गुलाबी ओलसर नाकपुड्या सगळ्याच गोष्टींचं नवल वाटायचं. सारखी झोपलेलीच असायची. तिचे डोळे अंधारात चमकतात हे पाहण्यासाठी आम्ही टपून बसत असू. पोत्यावर नखं रोवून ती मागे खेचायची. बाबा म्हणायचे ती व्यायाम करते आहे! घरी आणल्यावर २-३ दिवस कावरीबावरी झाली होती. पण लगेच रूळली. मिश्या आहेत तरी ती मांजर कशी? बोका असायला हवा नं? या आमच्या मुलभूत शंकेचं हसं झालं. उलट, मिशांना हात लावायचा नाही अशी तंबी मिळाली.

"आई, आई, आपली मनी नं खूप स्वच्छ आहे बरं का! मागच्या अंगणात छोटा खड्डा करून त्यातच शी करते. नंतर त्यावर माती लोटते." आईने तिला हाकलून देऊ नये, ती आईच्या मनातून उतरू नये यासाठी आम्ही दोघंही झटायचो.

मांजर उंचावरून पडली तरी चार पायांवरच पडते हे ऐकून होतो.तिला मुद्दाम उचलून खाली पाडून पिंट्याने चेक केलं. वारंवार केलं. खुर्चीवर उभा राहून करायला लागला तसा आईने धपाटा घातला. हातून मांजर मेलं तर काशीला जाऊन सोन्याचं मांजर देवाला अर्पण करावं लागतं म्हणे! " पण मांजरीला तर नऊ जीव असतात नं ?" या माझ्या प्रश्नाला उत्तर म्हणून मलाही एक धपाटा मिळाला.


घरात मनीचा प्रवेश तर झाला. पण मूळची कुत्रा पाळण्याची हौस अपूरीच राहिली. दुधावरची तहान ताकावर भागवली गेली एवढंच! अधून-मधून मूळ इच्छा डोकं वर काढायचीच. ट्रेनिंग दिलं तर प्राणी आपण शिकवू ते शिकतात हे संदर्भरहित वाक्य आम्ही फारच मनावर घेतलं. बॅाल फेकून तिला आणायला सांगू लागलो. पण ती कसली येडपट! तिथे जाऊन एकटीच खेळत बसायची बॅालशी. घेऊन पळत नाही यायची. बॅाल उंच वर फेकला तर पकडायला उडी मारायची. पण लगेच कंटाळायची. स्वान्तः सुखाय खेळायची. आमच्याशी खेळायचं म्हणून नाही. उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं, धाव म्हटलं की धावायचं अशा साध्या साध्या सूचनाही तिला कळायच्या नाही. आपली मनी बथ्थड डोक्याची आहे यावर आमचं एकमत झालं होतं. Why cats do not fetch and dogs do? या विषयावर मोठं झालं की संशोधन करायचं हे आम्ही ठरवून टाकलं होतं.

नव्याची नवलाई संपली. आम्ही अभ्यास, परीक्षा, खेळ, स्पर्धा यात गुंतलो. मनीलाही कळलं, या घरात कुणाशी मैत्री केली तर फायद्याचं आहे ते! ती आईच्या पायात पायात घोटाळायची. आई स्वयंपाकघरात शिरली की ही उठलीच! रात्री आईच्या पायाशी अंगाचं मुटकुळं करून झोपायची. हाकललं तरी तेवढ्यापुरती जायची. पण परत यायची. Central Telegraph Office ची क्वार्टर्स म्हणजे बैठे कौलारू बंगलेच! ब्रिटीश अधिका-यांसाठी बांधलेल्या या क्वार्टर्समध्ये मोठ्या मोठ्या खोल्या होत्या. मागे-पुढे प्रशस्त अंगण! मागच्या अंगणात कोपर्‍यात नोकरांसाठी खोल्या. बंगल्याचा पुढचा भाग म्हणजे लांबलचक व्हरांडा. चार फूट उंचीपर्यंत भिंत. तिथून वर छतापर्यंत लाकडी तिरक्या पट्ट्या. त्यामुळे शंकरपाळ्यासारख्या छोट्या छोट्या अनेक खिडक्या तयार झाल्या होत्या. त्यातील एका फळीचा थोडा भाग कापून जरा मोठा शंकरपाळा केला होता. ती मनीची जाण्या-येण्याची सोय.

तिची जीवनशैली म्हणजे आजकाल मुलं म्हणतात तशी. खानेका, पीनेका, आराम करनेका, टेन्शन नही लेनेका, काम कुछ नही करनेका अशी! एवढ्या मोठ्या प्रशस्त घरात ही वाघाची मावशी राणीसारखी राहायची. आराम करून कंटाळा आला की अंगणात बागडणार्‍या चिमण्यांमागे आणि खारींमागे धावायची. व्हरांड्यात शांतपणे झोपलेली मनी चिमणीची चिवचिव ऐकून क्षणार्धात जागी व्हायची. दबा धरून बसायची. झटकन उडी मारून चिमणी पकडायची तेव्हा मनीच्या चपळाईचं कौतुक करावं की चिमणीने जीव गमावला याचं दुःख करावं कळत नसे. जीवो जीवस्य जीवनम्! हा धडा तेव्हाच शिकलो.

एकदा कुठून तरी तिने उंदराचं पिल्लू मारून आईसमोर आणून टाकलं. तेही स्वयंपाकघरात! केवढं हे धारिष्ट्य! आई जाम भडकली होती तिच्यावर. धावूनच गेली अंगावर. "उचल, उचल ते लवकर इथून. खबरदार पुन्हा असलं काही घरात आणशील तर!" शांतपणे आणि आज्ञाधारकपणे तिने ताबडतोब आपलं जेवण बाहेर अंगणात नेलं. इतके दिवस तूं मला खाऊ-पिऊ घातलस. आज मी तुला देते असं तिला म्हणायचं आहे. कृतज्ञता दाखवते आहे ती! अशी मखलाशी करायला गेलो तर आमच्याच नावाचा उध्दार झाला.

व्हरांड्यात आईने हौसेने सागवानी लाकडाचा इचका लावला होता. त्यावर पितळी फुलं होती. इचका म्हणजे बंगई! दुपारी त्यावर निवांत बसून भावगीतं गुणगुणत आई भाजी निवडायची, शेंगा सोलायची. एकदा कुठूनसा एक भलामोठा उंदीर व्हरांड्यात आला. गणपतीसमोरचा उंदीर सोडला तर बाकी सर्व उंदीर किळसवाणेच असतात. समस्त स्त्रीवर्ग माझ्या या मताशी निश्चित सहमत असेल! मी घाबरून टुण्णकन उडी मारून आईजवळ बंगईवर पोचले. आईनेही लगेच पाय वर घेतले. उंदीर पाहताच मनी त्याच्या अंगावर झेपावली. उंदीर त्याच्या जमातीतला थोराड बाप्या असावा. आकाराने जवळजवळ मनी एवढाच! या खेळात कसलेला होता. त्याच्या समोर आमची मनी तर दूधपिती बच्चीच होती. पळून न जाता त्याने असा काही रुद्रावतार धारण केला की मनी एक पाऊल मागे सरकली. पाठीची कमान झाली. कान पाडून मागे वळवले. लहान तोंडी मोठा घास घ्यायचा आपण प्रयत्न केला हे तिला कळून चुकलं. पण वेळ निघून गेली होती. दोघेही एकमेकांकडे मारक्या म्हशीसारखे पाहत होते. उंदराचे दात मनीच्या दातांपेक्षा मोठे दिसत होते, डोळे गच्च मिटून घ्यावेसे वाटत होते. पण पुढे काय होणार याची उत्सुकताही होतीच! उंदराशी असलेलं अंगभूत हाडवैर मनीला माघार घेऊ देत नव्हतं. एक मिनीट गेला, दोन मिनीट गेले, तीन मिनीट गेले..... कुणीही मागे सरकेना. मनी अडचणीत पाहून आईने हाताशी असलेली वाटी उंदराच्या दिशेने फेकून मारली. क्षणार्धात उंदीर गायब! मनी माझ्यासारखीच टुण्णकन उडी मारून आईजवळ! एका बाजूला मी आणि दूसर्‍या बाजूला मनी!! आजही तो प्रसंग आठवला की हसू फूटतं. आई माझ्यावर कितीही चिडली, ओरडली तरी अडचणीच्या वेळी ती नक्कीच धावून येईल याची खात्री या प्रकरणामुळे बळकट झाली.

दिसामाजी मनी मोठी होत होती. आम्हाला ती चिमुरडीच दिसत होती. पण तिच्या जमातीत ती वयात आलेली होती. रात्री बंगल्याच्या कौलांवरून बोक्याचं ढाल्या आवाजात हाका मारणं सुरू झालं. उनाड, हाताबाहेर गेलेल्या, ताळतंत्र सोडलेल्या, वयात आलेल्या मुलीसारखी मनी रात्री-अपरात्री बाहेर हिंडायला लागली. आई आता हिला शिक्षा करणार याची मला भिती वाटायची. संध्याकाळी खेळून परतायला आम्हाला जssरा उशीर झाला तर, "किती हा उशीर! दिवेलागण झाली कळत नाही का?" एवढं सगळं आईच्या एका हाकेत असायचं. आईला हे असं वागणं अजिबात खपायचं नाही हे मी तिला माझ्या परीने समजावून सांगायचा प्रयत्न केला. जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवत चार शब्द सूनावले. पण ती ऐकून न ऐकल्यासारखी करायची. मध्येच जांभई द्यायची. एकदा तर सरळ उठूनच गेली. मला काय! मी माझं कर्तव्य केलं. बोक्याची आलापी ऐकू यायला लागली की तिचा पाय घरात टिकायचा नाही. आईच्या चेहेर्‍यावर कधीही न दिसलेली चिंता आणि वेगळंच गांभीर्य दिसायला लागलं. आईच्या रागाचा पारा चढायला लागला की बाबा गालातल्या गालात का हसतात हे कळायचंच नाही. सकाळी तिच्या बशीत दूध ओततांना, "आलात बाईसाहेब शेण खाऊन?" असं दबक्या आवाजात बोललेलं पिंट्याने एकदा ऐकलं. झालं! बाबांपर्यंत बातमी पोचली. "बाबा बाबा, आपली मनी शेण खायला लागली आहे!" बाबा फस्सकन का हसले हे कळायचं वय नव्हतच आमचं!


हळूहळू मनीचं उंडारणं थांबलं. ती घरातच जास्त वेळ राहायला लागली. मूड गेल्यासारखी गप्प गप्प ! सुस्तावली. आधीच झोपाळू! बोक्याचं हाका मारणंही एकदाचं थांबलं. भांडण झालं असावं असा आम्ही अंदाज केला. विशेष म्हणजे जादू झाल्याप्रमाणे आईचं वागणं बदललं. काही फेकून मारणं आता पूर्णपणे थांबलं. दूधाची बशी तिसर्‍यादा भरू लागली. "तू जा गं तुझ्या जागी झोपायला! रात्री झोपेत पाय लागला म्हणजे?" म्हणू लागली. रागाची जागा आता काळजीने घेतली होती. हळूहळू मनीच्या हालचाली आणखीच मंदावल्या. चालतांना पोटाची झोळी होऊन घड्याळाच्या लंबकाप्रमाणे हेलकावे घेऊ लागली. तेव्हा कुठे माझी ट्यूब पेटली. "गम्माडी गम्मत जम्माडी जम्मत" गाणं गायची आता माझी पाळी होती.

मानवजातीतील स्त्री सोडली तर तमाम प्राणीवर्गातील स्त्रीजात आपलं बाळंतपण आपणच करते. मानवातही आदिवासी स्त्री हा सोहळा स्वतःच पार पाडते. एकटीच! पण तो अपवाद. पहिलटकरीण वगैरे चोचले फक्त मानवजातीतच! पण आमची मनी खरच अडली असावी. कारण केविलवाणी म्याव म्याव ऐकून आणि अवस्था पाहून आईने शेजारच्या क्वार्टर्समधल्या जाधवआजींना बोलावणं पाठवलं. मनी स्वतः भोवतीच गोल गोल फिरत होती. अतिशय महत्वाच्या प्रसंगी आधी हकालपट्टी होते ती मुलांची. त्यानुसार आम्हाला बाहेर काढण्यात आलं.

त्यानंतर थोड्याच वेळात मनीला तीन पिल्लं झाली. परमेश्वराने या वेळी जरा जास्तच धांदरटपणा केला होता. बुक्का जरा जास्तच सांडला होता. आमची मनी कशी पांढरी स्वच्छ होती. परमेश्वराने तीट चुकीच्या ठिकाणी आणि मोठीच लावली होती. तिला खुलून दिसायची. पण तिची पिल्लं पाहून आई आणि जाधवआजी खुदूखुदू हसत नाकं मुरडत बोक्यालाच दोष देत होत्या. 'भांडणार्‍या बोक्याशी याचा काय संबंध?' असा आमचा विचार! "सुटलीस गं बाई, तू आणि मीही!" असा आनंद आणि असं समाधान आईच्या चेहेर्‍यावर दिसलं. असाच आनंद आणि समाधान पुढे अनेक वर्षांनी मला तिच्या चेहेर्‍यावर दिसलं. मला मुलगा झाला तेव्हा! गम्माडी गम्मत जम्माडी जम्मत हे गाणं पाठ झालं होतं. पिल्लं पाहायला सारा वर्ग लोटला होता. भेटायला येणार्‍यांची एवढी गर्दी तर माझ्या जन्माच्या वेळी पण झाली नव्हती म्हणे!

अनेक वर्षानंतर माझी मुलं कुत्रा पाळायचा हट्ट करण्याएवढी मोठी झाली. मी मुलीच्या भूमिकेतून आईच्या भूमिकेत अलगद शिरले. मुद्दे तयार होतेच! चर्चेला दर दिवसा आड उधाण येऊ लागलं. "मला वाटतं म्हणून!" हे जास्तीचं कारण किती महत्वाचं आहे हे पटवून देण्यात माझी शक्ती खर्ची पडू लागली. बाळघुटी नव्हती ना मिळाली ती! मोठ्यांनी केलेल्या चुका पुढच्या पिढीला भोगाव्या लागतात त्या अशा!

एक दिवस मी मुलांना विचारलं, "काय करणार रे तुम्ही कुत्रा पाळून?"

हुरळून जात पुढची स्वप्न पहात लेक म्हणाली, "मला नं कुत्रा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडतो. तो सगळं ऐकतो. उठ म्हटलं की उठतो. बस म्हटलं की बसतो. बॅाल फेकला की आणून देतो."

"एवढंच नाही काही! आम्ही शाळेतून आलो की तो शेपटी हलवत आमच्याजवळ येईल. त्याच्या गळ्यात मी छानसा पट्टा बांधीन." बहिणीबरोबर स्वप्न पहात मुलगा म्हणाला.

मी म्हटलं,"हात्तिच्या! एवढंच ना, ही कामं तर मी नेहमीच करते. तुम्ही उठ म्हणालात की मी उठते. बस म्हणालात की बसते. पळ म्हणालात की पळत सूटते. तुम्ही शाळेतून आलात की मी माझी न दिसणारी शेपटी हलवत पळत येते दाराशी. झालं तर मग! पट्टा तेवढा बांध म्हणजे संपलं."
--
निशा पाटील
patil.nisha178@gmail.com

4 comments:

मीनल गद्रे. October 20, 2011 at 7:12 PM  

पिल्लांचे वर्णन आवडले.

क्रांति October 20, 2011 at 7:41 PM  

मनीमाऊ, तिच्या खोड्या, खेळ याचं वर्णन तर भारीच, पण सगळ्यात जास्त आवडलं ते शेवटचं 'पट्टा तेवढा बांध'
खूपच खुसखुशीत झालंय लिखाण.

Kanchan Karai October 22, 2011 at 11:21 AM  

हा, हा! मनीमाऊचा लेख वाचून माझ्या मोठ्या बहिणीच्या घरची मांजरं आठवली. कमीत कमी १०-१२ मांजरं होती तिच्याकडे. कितीही नाकारा पण घरात प्राणी पाळला की त्याचा लळा लागतोच. शेवट तर अगदी झकास. हे बाकी खरं पट्टा नसला तरी बाकी सर्व करतचं असतो आपण ;-))

Nisha October 24, 2011 at 4:01 PM  

धन्यवाद. प्राणी पाळला की लळा लागतोच! आपल्याला कितीही आवडलं तरी ती त्यांच्या स्वातंत्र्यावर गदाच असते. आपणही एकप्रकारच्या बंधनातच राहतो.त्यापेक्षा लांबूनच प्रेम करावं हे उत्तम! असा माझा विचार. अभिप्रायासाठी सर्वाचे आभार.

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP