थवाळी (पातोळी / पानगी)

दिवाळीचा फाराळ म्हटलं की मुख्य करुन लाडु, चिवडा, चकल्या, करंज्या शंकरपाळ्या, अनारसं हेच पदार्थ चटक डोळ्या पुढे तरळतात. माझ्या लहानपणी आजी दिवाळीला थवाळ्या, रवोळी असले भन्नाट पदार्थ करायची. हल्ली तर हे पदार्थ ईतके दुर्मीळ झालेत की त्या जुन्या पीढी सोबत नामशेष झाले की काय अशी शंका यावी.

तसं आमचं गाव हे समुद्र किनार्‍यावर वसलेलं. पण तेव्हा शेती हाच मुख्य पारंपारीक उत्पन्नाचा स्त्रोत होता आणि त्यातही भातशेती हीच मुख्य. त्यामुळे तेव्हा महाग असलेले गहू, मैदा आदी सणासुदीलादेखील नसायचे. तांदुळ आणि त्याचं पीठ यावरच काय ते पदार्थ बेतलेले असत. त्यातलाच एक पदार्थ आज आपल्या सोबत शेअर करावासा वाटतोय. तर लागूया का तयारीला?

पदार्थाचं नाव आहे थवाळी (पातोळी/पानगी).

साहीत्य:

२ वाट्या तांदळाच पीठ.
१ काकडी
१/२ वाटी ओल्या नारळाचा चव.
तूप
गूळ चवी नुसार
मीठ चवी नुसार
केळीची, हळदीची पानं (ही अगदीच नाही मिळाली तर कर्दळीची नाही तर पळसाची सुकलेली सुद्धा चालतील.)

कृती:


सर्वप्रथम काकडी किसून घ्यावी. हलक्या हाताने दाब देऊन त्यातल पाणी वेगळं काढून घ्यावं.



एका भांड्यात तांदळाच पीठ, तुप, नारळचा चव, काकडी चव एकत्र करुन आधी कोरडंच एकत्र करुन घ्यावं.( गोड आवडणार्‍यांनी गुळ, तर न आवडणार्‍यांनी मीठ, चवीनुसार टाकावं.)


गरजे प्रमाणे पाणी /दूध टाकुन थुलथुलीत पीठ भीजवून घ्यावं. मी यात पीठ भिजवण्यासाठी काकडीचा रसच वापरला आहे.


फ्राइंग पॅन मध्ये केळीचं पान ठेवून त्यावर थोडसं मिश्रण टाकून हाताने पसरवून घ्यावं.




वरुन आणखी एक केळीचं पान ठेवून आणि झाकण ठेवून एक वाफ द्यावी.



२ मिनीटांनी झाकण काढून उलथण्याने थवाळी उलटावी. (वरुन पुन्हा झाकण ठेवण्याची गरज नाही. केवळ पान पुरेसं आहे.)




आवडी नुसार (गोड असल्यास) वरुन अस्स्ल साजूक तुपाची धार सोडून वा लोणच्या सोबत गरमागरम थवाळीचा आस्वाद घ्यावा.

टीप:
याच थवाळ्या जर वाफवून केल्या तर त्यास पानगी सुद्धा म्हणतात.
--
प्रतिक ठाकूर
pratst@gmail.com

10 comments:

mau October 20, 2011 at 1:40 PM  

मस्तच दिसतय..करुन बघीन..

Suhas Diwakar Zele October 20, 2011 at 1:56 PM  

मस्त रे... किती मोठी विशलिस्ट आहे पदार्थांची, त्यात अजुन एक ऍडवतो :) :)

क्रांति October 20, 2011 at 7:14 PM  

सही आहे ही पाकृ. करायलाच हवीय.

Anonymous,  October 21, 2011 at 1:25 AM  

आमच्याइथे गावी अजूनही करतात थवाळी/पानगी पण फक्त चुलीवरच...
फोटो बघून ती चव रेंगाळायला लागलीये जिभेवर... :)

Anonymous,  October 21, 2011 at 3:32 PM  

kup chan aahey

अपर्णा October 21, 2011 at 10:05 PM  

याला आम्ही पण "पानगी" म्हणतो..आजी खूप छान करायची, चुलीवरची...आई पण करते...मलापण शिकवली आहे..इथे नेहमी सुकी पळसाची पानं मायदेशातून येताना घेऊन येते...तितकी छान होत नाही..पण यात काकडीचा रस टाकतात हे नवीन....

Kanchan Karai (Mogaraafulalaa) October 24, 2011 at 8:18 PM  

आमच्याकडे याला पानगी म्हणतात. भन्नाट प्रकार असतो रे हा. लहानपणी किती वेळा खाल्ली असेल, त्याचा हिशोबच नाही. पण खूप दिवसांनी या पाककृतीमुळे आठवण झाली पुन्हा. प्रतिक, तुझे तर पाकृचे फोटो प्रत्येक स्टेपचे आहेत, त्यामुळे कळतानाही किती सोपं जातंय. अगदी नवशिक्या व्यक्तीलाही चट्कन कळेलसं.

भानोळी नवाचा पण एक प्रकार असतो, माहित आहे का? मी कोबीची भानोळी खाल्ली आहे, दोन-तीनदा.

प्रतिक ठाकूर October 25, 2011 at 2:41 PM  

हो कांचनताई मीही कोबोचीच भानोळी खाल्ली आहेत. माझी आजी नेहमी करायची.
माऊ,सुहास,क्रांतीताई,माधुर्य, दवबिंदू, (अज्ञात),अपर्णा आणि कांचन ताई तुम्हा सर्वांना ही पाककृती आवडल्याचा पाहून बर वाटलं. सावामचे आभार. :)

प्रमोद तांबे,  November 9, 2011 at 8:10 PM  

मस्तच दिसतय..एकदा करुन बघितलेच पाहिजे ! आता नक्कीच करीन व नंतरच सविस्तर अभिप्राय लिहीन.
प्रमोद तांबे,पुणे
०९.११.२०११

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP