म्हणींच्या राज्यात

पूर्वापार चालत आलेल्या म्हणींची मजाच काही और असते! अनेकदा त्यांच्यामागे असलेले संदर्भ कालौघात मिटले तरी प्रत्येक म्हणीमागे दडलेले व्यावहारिक शहाणपण, अनुभव व त्यातून मिळणारे ज्ञान हे खणखणीत असते. पंचतंत्र, जातक कथा, रामायण - महाभारत यांसारख्या कथांमधून या म्हणी तर दिसतातच; शिवाय अनेक लोककथा - काव्यांच्या स्वरूपांत त्यांचे जतन झालेले आढळून येते.

असे म्हणतात की एखाद्या देशात प्रचलित असलेल्या म्हणींवरून त्या देशातील लोकांची प्रतिभा, वाक्चातुर्य व व्यवहाराची पडताळणी करता येते. त्यानुसार पाहावयास गेले तर भारतातील विविध भाषांमधील म्हणींचा समृद्ध खजिना येथील लोकांची विलक्षण प्रतिभा, चातुर्य व स्वभाव-विशेषांची ओळख करून देतो असेच म्हणावे लागेल.

आधुनिक युगात म्हणींचा वापर शहरी संभाषणात कदाचित मोठ्या प्रमाणावर होत नसेल. परंतु आजही ग्रामीण भारतात या म्हणी संभाषणात, व्यवहारात सतत डोकावताना दिसतात. गावाकडची दोन माणसे गप्पागोष्टी करत बसली असतील तर त्यांच्या गावगप्पा अवश्य ऐका. तुम्हाला दोन-तीन तरी इरसाल, अस्सल, झणझणीत म्हणी ऐकायला मिळणारच याची खात्री!

महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, कोंकण, घाटावरच्या अनेक म्हणी आज आंतरजालाच्या कृपेने आपल्याला एकत्रित स्वरूपात वाचावयास मिळतात. त्यांच्या 'उद्बोधकते'वर झडलेल्या महान चर्चाही आपण वाचतच असतो. परंतु महाराष्ट्राबाहेर अशा कितीतरी म्हणी आहेत ज्यांचे मराठी स्वरूप आपल्याही माहितीचे आहे! परवा असेच एक म्हणींचे पुस्तक चाळताना वेगवेगळ्या भारतीय भाषांमधील समानार्थी म्हणींचा शोध लागला. भाषा बदलल्या, प्रांत बदलला, संस्कृती - आचार - विचार बदलले तरी मनुष्याचा स्वभाव बदलत नाही. त्याच्या वृत्ती बदलत नाहीत! त्यांच्यामागचे मर्म तेच राहते. भारताच्या विविध प्रांतांमध्ये डोकावून बघितलेत तर अशा बर्‍याचशा म्हणी तुम्हाला सामायिक अर्थाच्या दिसतील.

उदाहरणार्थ हिंदी भाषेतील ही म्हण पाहा ना! म्हण आहे,''मरें भैस में बहुत घी''. म्हणजे मेलेल्या म्हशीला किती दूध यायचं, त्यापासून किती तूप लोणी बनायचं याबद्दल तिचं बेफाटगुणगान. भले ती म्हैस जिवंत असताना तिला कधी प्रेमाने चारा खाऊ घातला नसेल. पण ती मेल्यावर तिच्या गुणांची तोंड फाटेस्तोवर स्तुती करायची. बुंदेलखंडी भाषेत या म्हणीशी साधर्म्य दाखवणारी ''मरे पूत की बडी आँखे'' अशी म्हण प्रचलित आहे. तिचाही अर्थ असा की जोवर एखादी व्यक्ती जिवंत असते तोवर तिची कदर नसते. परंतु तीच व्यक्ती मेल्यावर तिच्या महानतेचे पोवाडे गायले जातात. याच म्हणीचे आणखी एक रूप म्हणजे, ''मरे बाबा की पस्सों सी आँखे''. इथला 'पस्सों' म्हणजे मराठीतील पसा किंवा ओंजळ!

महाराष्ट्रात ''कोठे राजा भोज आणि कोठे गंगू तेली'' ही म्हण आजही लोकप्रिय आहे. गमतीची गोष्ट की हीच म्हण भारतात इतर अनेक भाषांत अगदी त्याच प्रकारे आढळते. जसे, हिंदीत, 'कहाँ राजा भोज, कहाँ गंगू तेली' तर भोजपुरीत 'कहाँ राजा भोज, कहाँ भोजवा / लखुआ तेली', गुजरातीत 'क्यां गंगाशाह, क्यां गंगा तेली', बंगालीत 'कोथाय राजा भोज, कोथाय गंगाराम तेली', राजस्थानी भाषेत 'कठै राजा भोज, कठै गांगलो तेली', बुंदेलखंडात 'कां राजा भोज, कां डूंठा तेली' अशी या म्हणीची विविध रूपे पाहावयास - ऐकावयास मिळतात.

त्याच प्रकारे आणखी एक म्हण: ''नाचता येईना, अंगण वाकडे.... स्वैपाक करता येईना, ओली लाकडे. '' बंगालीत हीच म्हण 'नाचते न जानले, उठानेर दोष' म्हणून प्रचलित आहे. गुजराती मंडळी ह्या म्हणीला 'नाचतां नहीं आवडे तो के आंगणुं बांकुं' अशा प्रकारे वापरतात.

'महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती' हे वचन तर प्रत्येक मराठी माणसाला ठाऊक आहे. मोठ्या लोकांवरच कायम संकटे येतात अशा अर्थाच्या म्हणी इतर भाषांतदेखील दिसून येतात. 'बडे गाछेई झड लागे' अशी म्हण बंगालीत प्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ: मोठ्या वृक्षांनाच वादळ सतावते. (लहान झाडाझुडुपांची वादळात तितकी हानी होत नाही.) बुंदेलखंडी भाषेत हीच म्हण 'बडेई रूख पै गाज गिरत', म्हणजे मोठ्या वृक्षावरच वीज कोसळते, या अर्थाने दिसून येते.

गावांगावांमधून पोटदुखीवर रामबाण उपाय म्हणजे ओवा. त्यावरही एक म्हण प्रचलित आहे, ''ज्याचे पोट दुखेल तोच ओवा मागेल.'' म्हणजे आपण होऊन कोणी चवीला तिखट लागणारा, जिभेला मिरमिरणारा ओवा मागायला वा खायला जाणार नाही. ही म्हण हिंदीत 'जिसका पेट दर्द करता है वहीं अजवाइन खोजता है' म्हणून प्रसिद्ध आहे. आणि बंगालीत तिचे रूप, 'जार माथा मांगे सेई चून खोजे'. म्हणजेच, ज्याचे डोके फुटेल तोच चुना शोधेल.

प्रत्येक म्हणीच्या मागे असणार्‍या उगम कथा बदलतील, पात्रे बदलतील. पण त्यांतून लखलखणारे अस्सल शहाणपण मात्र अनुकरणीय ठरेल. अनेक तपे लोटली तरी त्या म्हणी आजच्या काळालाही तितक्याच लागू आहेत.

खालची ही गोष्ट व म्हण वाचून तुम्हाला सध्याच्या कोणत्या घोटाळ्याची आठवण होते का, पहा बघू!

"आँधर सौंटा" म्हणजेच अधिकारी पदाला अयोग्य व्यक्तीच्या हाती अधिकार देण्याचे फळही वाईटच मिळते!

त्याची गोष्ट ही अशी:

एका गावात एका माणसाने गावातील आंधळ्या व्यक्तींना भोजन द्यायचे ठरविले. त्याप्रमाणे त्याने सर्व आंधळ्यांना गोळा करून भोजनासाठी पंगतीत बसायला सांगितले. आता त्या माणसाची चलाखी बघा बरं का! त्याला मनातून खरेच त्या आंधळ्यांना भोजन देण्याची अजिबात इच्छा नव्हती. मात्र त्यातून मिळणारे श्रेय,नाव व फुकटची प्रसिद्धी हवी होती. मग त्याने एक युक्ती केली. पंगतीत बसलेल्या पहिल्या आंधळ्याच्या पुढे मिष्टान्नाने भरलेले ताट ठेवले. आंधळ्याने ताट चाचपून पाहिले. आपल्यासमोर ठेवलेले ताट पदार्थांनी भरलेले आहे हे चाचपडून पाहिल्यावर तो निश्चिंत झाला व मागे रेलून बसला. त्या चलाख माणसाने तेच ताट उचलून दुसर्‍या आंधळ्याच्या समोर ठेवले. तोही ताट चाचपडून निश्चिंत झाला. अशा पद्धतीने त्या चलाख इसमाने एकच ताट सर्व आंधळ्यांच्या समोर फिरवले. मग तो सार्‍या अंधांना उद्देशून जोरात म्हणाला, "बंधूंनो, सर्वांना भोजन वाढले आहे. तेव्हा देवाची प्रार्थना करून भोजनाला सुरुवात करा!" परंतु कोणाच अंधाच्या पुढे भोजनाचे ताट नव्हते. प्रत्येकाला वाटले की माझे ताट शेजारच्या व्यक्तीनेच पळवले. झाले! ते एकमेकांवर दोषारोप करू लागले, की तूच माझे ताट चोरलेस! करता करता त्यांच्यात भांडणे लागली आणि एकमेकांची सोट्याने यथेच्छ धुलाई करून ते सारे अंध न जेवताच, भुकेल्या पोटी, जखमी होऊन परत गेले!!

एखाद्या कामात मूर्खपणे अडथळा बनून हटवादीपणा करणार्‍यांसाठी हिंदी भाषेत एक म्हण आहे, 'जो बोले सो घी को जाय'. त्या म्हणीमागे एक मजेशीर कथा सांगतात.

एकदा चार मूर्खांनी एका झाडाखाली एकत्र स्वयंपाक बनवायचे ठरविले. पण स्वयंपाकासाठी लागणारे तूप कोणी आणायचे यावरून त्यांच्यात भांडाभांडी सुरू झाली. शेवटी चौघांनी ठरविले की मौन पाळायचे. आणि त्यांच्यातील जो पहिल्यांदा मौन तोडेल त्यानेच तूप आणायला बाजारात जायचे! आता चौघेही चुपचाप.... आपापसांत काहीही न बोलता, हूं की चू न करता तसेच भुकेल्या पोटी कोण पहिल्यांदा मौन तोडतोय याची वाट बघत रस्त्याच्या कडेला बसून राहिले. बघता बघता रात्र झाली. गस्तीवर असणार्‍या पहारेकर्‍याने त्यांना हटकले. पण चौघांपैकी कोणीच मौन सोडायला तयार नव्हते. शेवटी पहारेकरी त्यांना कोतवालाकडे घेऊन गेला. कोतवालाने त्यांना जाब विचारला तरी कोणी बोलायला तयार होईना! कोतवालाला वाटले की चौघेही त्याचा अपमान करत आहेत. त्याने चारही मूर्खांना चाबकाचे फटके ओढायची शिक्षा फर्मावली. एका मूर्खाला शेवटी तो मार सहन होईना, आणि तो वेदनेने कळवळून जोरात ओरडला, "अयाईगं!" त्याबरोबर बाकीचे तिघे जोरात ओरडले, "आता तूच तूप आणायचेस!!"

म्हणींचे जे रांगडेपण आहे, त्यांच्यात त्या त्या गोष्टीला कोणताही मुलामा न देता, लोकलज्जेचा कसलाही मुलाहिजा न ठेवता थोडक्यात लोकांपुढे ठेवायचे जे कसब आहे, जो रोखठोकपणा आहे तो शब्दालंकारांनी नटलेल्या लांबलचक, पल्लेदार साहित्यात क्वचितच आढळेल! त्यांच्यात लोकरंजनाबरोबरच उपहास आहे, अनुभवातून आलेले शहाणपण आहे, उद्बोधकता आहे आणि त्यांचा जो गंध आहे तोही मिरमिरणारा.... नाकाला झोंबणारा, डोळ्यांत पाणी आणणारा!

खास ग्रामीण शैलीतील "पुरुष वो ही, जो एक दंता होई", या म्हणीच्या उत्पत्तीची कथा काहीशी अशीच आहे.
खूप खूप वर्षांपूर्वी एकदा एका वृद्ध विधुराला सेवानिवृत्त झाल्यावर आपल्या एकटेपणाचा खूप कंटाळा आला. घरी तो एकटाच होता. त्याने लग्न करायचे ठरविले. मध्यस्थाला खूप पैसे देऊ केले आणि आपल्यासाठी सुस्वरूप वधू शोधायला सांगितले. मध्यस्थाने सांगितल्याप्रमाणे लग्न जुळवून आणले. विवाह समारंभ आटोपून स्वगृही परत येताना त्या वृद्धाला आपल्या नववधूशी बोलण्याची इच्छा झाली. पण त्याला भीती वाटत होती, की वधू आपल्या म्हातारपणाची थट्टा करेल! म्हणून मग त्याने घोड्यावर स्वार होऊन तिच्या डोलीच्या चारही बाजूंना जोषात फेर्‍या मारल्या आणि वधूच्या जवळ येऊन म्हणाला, "पुरुष वो ही, जो एक दंता होई." (म्हणजे ज्याच्या तोंडात एकच दात, तोच पुरुष!) कारण त्या वृद्धाच्या तोंडात फक्त एकच दात शिल्लक होता. त्यावर त्याच्या बायकोने डोलीचा पडदा बाजूला सारून मुखावरचा घुंगट दूर केला आणि म्हणाली, "नारी रूपवती वो ही, जाँके मुँह में दंत न होई"!! (ज्या स्त्रीच्या मुखात एकही दात नाही, तीच नारी रूपवती होय!) .... याचे कारण??? ती 'नववधू' त्या वृद्धापेक्षाही म्हातारी होती आणि तिच्या तोंडात एकही दात शिल्लक नव्हता!!!

ऐतिहासिक घटना, प्रसंगांचे पडसादही काही म्हणींमध्ये दिसून येतात. ज्या घटना पुढे लोकोक्तीच्या स्वरूपात जनमानसात टिकून राहतात. बुंदेलखंडात ही एक म्हण प्रचलित आहे: 'घर के जान बराते गये, आलीपुरा कठवा में दये' या म्हणीचा संबंध भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्थानिकांच्या अजब अनागोंदीच्या राज्यकारभाराशी आहे. म्हणीनुसार कोणी एक सद्गृहस्थ वर्‍हाडी म्हणून एका वरातीत सामील होण्यासाठी रवाना झाले आणि त्यांची रवानगी मात्र झाली आलीपुराच्या कोठडीत! त्यांची कसलीही चौकशी न करता त्यांना कोठडीत डांबण्यात आले. इथे आलीपुरा हे नाव प्रतीक रूपाने वापरण्यात आले असले तरी म्हणीमुळे ते जनमानसात अमर झाले आहे.

तीच गोष्ट रिन्द नदी व फतेहचंद सेठची! एकदा शहाजहान बादशहा आग्र्याहून फतेहपूरला जात होते. वाटेत म्हणे रिन्द रिन्द नामक एक नदी लागायची. तर फतेहचंद सेठ नावाच्या व्यक्तीने बादशहाचा मार्ग सुकर व्हावा म्हणून त्या नदीवर पूल बांधायचे ठरविले. पूल तर बांधून झाला, मात्र मुसळधार पावसामुळे तो पूल कोसळला. त्यावेळी फतेहचंदने प्रतिज्ञा केली की काहीही होवो, पूल पुन्हा बांधायला लागला तरी चालेल, पण तो बांधेन तरच नावाचा फतेहचंद! आणि त्याने खरोखरी बादशहाच्या आगमनाअगोदर तो पूल पुनश्च बांधला. तेव्हापासून एक म्हण रूढ झाली, 'कै रिन्द रिन्द ही नहीं, कै फतेहचंद ही नहीं|' आणि आजही ही म्हण वापरण्यात येते.

समाजाची नैतिक जडणघडण, मानसिकता, स्थित्यंतरे, विचारधारा, आचार-व्यवहार या सर्वांचे प्रतिध्वनी आपल्याला म्हणींच्या रूपातून अभ्यासण्यास मिळतात. त्याचबरोबर त्यांची भाषा, शब्द, शैली हेही समाजाच्या वेगवेगळ्या पैलूंचे दर्शन देतात. म्हणी व त्यांमागील कथा हे एका प्रकारे कष्टकरी, श्रमिक जनतेने रचलेले साहित्य ग्रंथच होत. त्यांच्या रूपाने आपल्याला त्या त्या समाजाचे, व्यक्तींचे अनुभव संक्षिप्त रूपात ज्ञात होतात. हा त्यांच्या अनुभवांचा इतिहासच म्हणा ना! आणि त्या अनुभवाचे सौंदर्य वादातीत आहे.
--
अरुंधती कुलकर्णी
iravatik@gmail.com

6 comments:

क्रांति October 20, 2011 at 7:50 PM  

छानच आहे लेख. म्हणी आणि त्यांच्या मागच्या कथा आवडल्या. मराठीतल्या म्हणी आणि त्यामागील कथा डॉ. सरोजिनी बाबर आणि शांताबाई शेळके यांनी संपादित केलेल्या 'एक होता राजा' या ग्रंथात वाचल्या होत्या, त्यांची आठवण झाली.

Anonymous,  October 21, 2011 at 1:27 AM  

छान लिहल आहे,एकूणच हे म्हणी-पुराण आवडलं... :)

Meenal Gadre. October 22, 2011 at 7:36 AM  

एकही कथा माहित नव्हती.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) October 22, 2011 at 1:09 PM  

मीनलशी सहमत म्हणींशी संबंधित एकही कथा माहित नव्हती. शिवाय एकच म्हण विविध भाषांमधे कशी बोलली जाते, तेही माहित नव्हतं. म्हणीसारख्या गोष्टी एका वाक्यात बरंच काही सांगून जातात. म्हणींच्या सर्वच कथा रंजक आहेत.

अमित गुहागरकर October 24, 2011 at 1:20 PM  

लेख उत्तम..! या लेखातील दोनेक म्हणी सोडल्या तर इतर म्हणी मी प्रथमच ऐकतोय.

Dhananjay Jog, B'lore,  November 26, 2011 at 3:58 PM  

मोगरा फुलला ई दीपावली अंकातील "म्हणींच्या राज्यात.." हा आपला लेख खूपच आवडला. इतक्या विविध म्हणी एकाच ठिकाणी आढळणारा हा लेख खरोखरीच संग्राह्य आहे.आपली भाषाही ओघवती असून मार्मिकतेने आपण जे लेखन केलंय ते कौतुकास्पद !
आपणांस हार्दिक शुभेच्छा

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP