हरवून जायचे का?

ये, चांदण्यात थोडे हरवून जायचे का?
झाकोळल्या स्मृतींना उजळून घ्यायचे का?

मागे कधीतरी हे तारे मुठीत होते
साधेच बोलणेही तेव्हा सुनीत होते,
डोळ्यांत भावनांचे हळुवार गीत होते
त्या लोपल्या सुरांना मिळवून गायचे का?

स्पर्शात पारिजाताचा मुग्ध भास हळवा,
ती तरल स्पंदने अन् प्रत्येक श्वास हळवा,
होता परस्परांचा सहवास खास हळवा
तो काळ साद देतो, परतून जायचे का?

भावूक आर्जवांची होती सुरेल गाणी
लाडीक विभ्रमांची ती आगळी कहाणी,
आता उरे दुरावा, डोळ्यांत थेंब पाणी
हास्यात आसवांना बदलून द्यायचे का?

सुख पाहिले जरासे, मन मोहरून गेले
तेही क्षणांत दोघांना ठोकरून गेले
वाळूत बांधलेले घर ओसरून गेले
चल, शिंपले स्मृतींचे जमवून न्यायचे का?
--
क्रांति साडेकर
krantisadekar@gmail.com

10 comments:

सुहास October 20, 2011 1:43 PM  

क्रांतीताई, सुंदर कविता गं...आवडली !!

अमित गुहागरकर October 20, 2011 2:14 PM  

हळूवार आणि ग्गोड..!

तार्‍यांना मुठीत पकडण्याची कल्पनाही भन्नाट.

Suresh - सुरेश शिरोडकर October 20, 2011 2:54 PM  

सुंदर कविता
आवडली !!

विनायक पंडित October 20, 2011 7:54 PM  

हळूवार आणि भावूक! ये! या आवाहनानं मजा वाढतेय असं वाटलं! नेहेमीप्रमाणे सुंदर आणइ गेय आहे तुमची कविता! गाणं मस्तंच व्हावं!:)

mau October 20, 2011 9:55 PM  

किती सुंदर ,भावुक केली आहेस ग कविता..अप्रतिमच !!!

davbindu October 20, 2011 11:25 PM  

खुपच सुंदर झाली आहे कविता ....
एक छानसा क्षण ,तो गमावल्याच शल्य,आणि मग नवी उमेद....छानच ...!!!

अपर्णा October 21, 2011 10:01 PM  

क्रांतीताई शेवटचं कडवं खूप छान झालंय...

Nisha October 24, 2011 5:32 PM  

छान आहे कविता. आवडली. अभिनंदन. दीपावलीच्या अनेक शुभेच्छा

भानस October 26, 2011 4:45 PM  

खुपच सुंदर!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP