स्पर्श

'आता कुठे बारा वर्षांची तर होतेय. इतकी काय घाई आहे तिला मोबाईल घेऊन द्यायची? '

'अगं, पण जग कुठे चाललंय पाहतेस नं? शिवाय आपल्या आय. टी मधल्या नोकऱ्या. किती बिझी असतो आपणही? ही कुठे अडकली, मुंबईत काय झालं तर निदान संपर्कात तर राहता येईल न? '

'अरे पण तिचं वय? '

'वय-बिय काही नाही. बदलते वक्त के साथ बदलो असं लग्नाआधी कोण म्हणायचं? ' हे संभाषण आता आपलं सासूबाईपासून वेगळा संसार थाटण्याकडे वळणार असं दिसताच शीतलने आवरतं घेतलं.. 'बरं बघूया', असं समीरला म्हणताना तिला एकदम सानियाचं बाळरुप आठवलं.

खरं तर लग्न झाल्या झाल्या दोघांच्या घरच्या सल्ल्याला न जुमानता चांगली पाच वर्षे थांबून मग जेव्हा मूल व्हायचा निर्णय घेतला तेव्हा निर्सगाने आणखी दोन वर्षे त्यांना थांबायला लावलं त्यावेळीच सगळं सोडून घरी बसायचं असं शीतलने ठरवलं होतं. पण जेव्हा तेव्हा आपल्या लॅपटॉपपुढे बसायची सवय म्हणा किंवा आधीच मोठं कर्ज काढून घर घेतल्याचा खर्चाचा बोजा आता एक बाळ घरात आल्यावर आणखी वाढणार म्हणून म्हणा, बाळंतपणाची रजा थोडी थोडी करून नऊ महिने वाढवून शेवटी सानियाला पाळणाघरात ठेवायचा निर्णय घेतला गेलाच.

कामावरचा 'तो' दिवस शीतलला पाळणाघरात वारंवार केलेल्या फोनखेरीज आणखी काही केल्याचं आठवतही नसेल. हळूहळू जसजसे महिने उलटत गेले तसं शीतलपेक्षा सानियालाच पाळणाघराची सवय झाली. तिथल्या काकी खरंच खूप जीव लावायचा. तरीही घरी परत आल्यावर मात्र आई आई करणाऱ्या सानियाशी खेळताना, तिचा अभ्यास घेताना शीतलचा दिवसभराचा शीण कुठे पळून गेला तेच कळायचं नाही. समीरही जमेल तेव्हा लवकर ऑफिसातून येऊन माय-लेकींबरोबर वेळ द्यायचा. महिन्यातले इयर एंडिंगचे दिवस सोडले तर इतर दिवशी त्याला ते जमायचंही. एक मनाला लागलेली थोडी टोचणी सोडली तर सगळं काही नियमितपणे सुरू होतं.

सानियाच्या जन्माआधी टीम-मेंबर म्हणून काम करणाऱ्या शीतलच्या ऑफिसमधल्या जबाबदाऱ्याही आता वाढायला सुरुवात झाली होती. सुरुवातीपासून इतरांना मदत करायचा तिचा गुण हेरून टीम-लीडचं काम तर तिच्याकडे आलं होतंच. हळूहळू जास्तीत जास्त प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे टास्क्स तिच्याकडे यायला लागले होते. मनातून ती या प्रगतीबद्दल सुखावत होती आणि एकीकडे कामाच्या जागचा संध्याकाळचा एक-एक तास वाढत होता.

समीरचंही काही वेगळं विश्व नव्हतं. तोही ऑफिशियली प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून बढती मिळाल्यापासून घरी आल्यावरही कुठच्या दुसऱ्या देशातल्या वेळेप्रमाणे कॉन्फ़रन्स कॉल्स, सकाळी लवकर उठून घरुनच प्रेझेंटेशनची तयारी या आणि अशा न संपणाऱ्या कारणांमुळे कायम कामाला जुंपला गेलेला असे. त्याला एक काय ती रविवारची सकाळ थोडी-फार मिळायची त्यात अख्खा आठवड्याचं साचलेलं ऐकायचं की राहिलेली झोप पुरी करायची या द्विधा मनस्थितीत समोरच्याने बोललेलं कळायचं तरी का देव जाणे. नुसतं हम्म, अच्छा, असं का यातले सुचतील ते शब्द टाकून तो मोकळा व्हायचा.

शीतल आणि समीर असे कामात आकंठ बुडल्याने, संध्याकाळी सानियाबरोबर वेळ द्यायचा म्हणून स्वयंपाक-पाणी करणाऱ्या रखमाला आता मी येईपर्यंत थांबशील का म्हणून विचारलं गेलं. तिला घरचे पाश नव्हते आणि सानियाही तशी काही उपद्रवी कार्टी नव्हती म्हणून बाईंची अडचण समजून ती समजुतीने थांबायची. घरात असेपर्यंत जमेल ती कामं उरकत बाईंना आल्या आल्या काही करायला लागू नये म्हणून हात चालवायची. बाई आपल्याला नोकरांसारखं वागवत नाहीत ही भावना तर होतीच.

पण कुठेतरी काहीतरी कमी जाणवायला लागली होती. आई घरी उशीरा येते हे आतापर्यंत सानियाच्या अंगवळणी पडलं होतं. त्यामुळे शाळेतून घरी आल्यावर आपला अभ्यास करून ती सरळ टी. व्ही. नाहीतर गेम्समध्ये रमायला लागली. आतापर्यंत शाळेतला पहिला नंबर तिने सोडला नव्हता म्हणून तिच्या अभ्यास सोडून इतर गोष्टींवर घरातले तिला कुणी आधीपासूनच काही बोलत नसत. आई आली की, 'सानू बेटा, चल पटकन जेवूया', असं म्हणताच ताडकन उठून तिच्याबरोबर जेवायला यायची आणि नेमकं त्याचवेळी आईच्याही नंतर थांबलेल्या कुणा कलिगचा ऑफिसमधून फोन आला की तिचं ते कंटाळवाणं बोलणं ऐकत जेवून उठून गेलं तरी आईला पत्ताच नसायचा. मग नंतर तर तिने सरळ रखमाला मला खूप भूक लागलीय असं सांगून आधी जेवायला सुरुवात केली. शीतलला वाटलं आपण लेट येतो म्हणून पोर कशाला उपाशी ठेवा. तिने रोज आल्यावर सानू नीट जेवलीय याची चौकशी करायला सुरुवात केली.

समीरला खरं तर आपल्याला अनेक शंका विचारून माहिती करून घेणाऱ्या लेकीबरोबर रात्री काहीतरी गोड खात बाल्कनीत बसून गप्पा मारायला खूप आवडायचं. पण त्याच्या कामाचं रूटीन पाहून सानियानेच बाल्कनीत बसायचा त्यांचा शिरस्ता मोडून टाकला. ती सरळ आपल्या पांघरुणात शिरून आवडीचं पुस्तक वाचत बसे. आजकाल या पुस्तकांतील पात्रांशीच तिच्या काल्पनिक गप्पा रंगत. आणि ती तन्मयतेने वाचतेय असं आपल्या मनाचं समाधान करून समीर पुन्हा आपलं लॅपटॉपमध्ये डोकं घाले. रात्रीची जेवणं होताना आणि जेवणं झाल्यावर या तिघांच्या किलबिलीने इतरवेळी गजबजणारं घर आताशा पिलं उडाली की रिकामी झालेल्या घरट्याप्रमाणे शांत होऊन गेलं. रखमाचे 'निघते बाई' हे अंतिम वाक्य.

असं असलं तरी रात्री झोपताना एकमेकांशी बोलण्याची सवय शीतल आणि समीरमध्ये कायम होती. दोघं एकाच क्षेत्रातली असल्याने आपण खूप बोलू शकतो हे त्यांना वाटे आणि त्यात काही चूक नव्हतं. फक्त आपण आजकाल फक्त एकमेकांच्या डेड-लाइन्स, ऑफिस पॉलिटिक्स, अप्रेजल, टेक्नॉलॉजी याच विषयांवर बोलतो हे मात्र त्यांच्या लक्षात येत नसत. अर्धाएक तास किंवा काहीवेळा त्यापेक्षा कमी वेळ बोलता बोलता एकजण हूं हूं करत झोपला की दुसराही झोपून जाई आणि मग सकाळची तारेवर कसरत करता करता काल आपण काही बोललो होतो याची आठवणही येणार नाही इतक्या चपळाईने दिवसाची कामं त्या दोघांचा कब्जा घेई. गाण्याच्या क्लाससाठी निघून गेलेली सानू दोघांच्या दृष्टीने काहीतरी शिकतेय, आपण तिच्यासाठी म्हणून हा सगळा रामरगाडा चालवतोय. ती पुढे जावी हेच आपल्या मनात आहे म्हणून स्वतःची समजूत मनातल्या मनात कधीतरी काढली जाई इतकंच.

त्यातच सानियाचा बारावा वाढदिवस आला. नेमका रविवार असल्याने यावेळी तिच्यासाठी सुटी काढली नाही याचा सल नव्हता.

'सानिया, चल पार्टीसाठी चायना गार्डनमध्ये जाऊया. येताना फ्लोट खाऊया. यावेळी तुझ्यासाठी मस्त ब्रॅंडेड जीन्स घ्यायची अगदी तुझ्या आवडीच्या स्टाइलसकट', बोलताना खूप एक्साइट झालेल्या समीरला सानियाचा थंड चेहरा पाहून, कागदावर छान दिसलेल्या प्रोजेक्ट प्लॅनला टीम-मेंबरनी डेड लाइनची तारीख पाहून दिलेला प्रतिसाद आठवला. आता थोडं टीम स्पिरिट वर आणलं पाहिजे... 'गाइज, ऑन अवर लास्ट असाईनमेंट विथ द सेम क्लायंट.... ' मनात आलेलं वाक्य पाहून तो दचकलाच... बापरे... 'ओके बेटा, बरं मग तू सांग. काय करायचं यावेळी.. मस्त रविवार पण आहे.. बोल. ' 'बाबा, मला सेलफोन हवाय. वर्गात सगळ्यांकडे आहे.. ' तिला काही उत्तर द्यायच्या आत शीतलला आपल्याला विचारायला हवं हे लक्षात घेऊन समीर शब्दांची जुळवाजुळव करत बसला. अर्थात अप्रेजलला टीम-मेंबरना हाताळायची सवय झालेल्या समीरला सानियाला पार्टीसाठी पटवणं फार कठीण नव्हतं. टोलवाटोलवी हा प्रोजेक्ट मॅनेजरचा गूण घरच्या प्रोजेक्ट्ससाठी पण कामाला येतो हे त्याला माहीतही होतं.

शेवटी पार्टी करून, फ्लोट खाऊन परत येताना चौपाटीवर फिरून घरी येईपर्यंत सानिया गाडीत झोपूनही गेली होती. त्यानंतर मग रात्री शीतलबरोबर वरचा संवाद रंगला होता.

खरं म्हणजे आता सेलफोनला वयाची अट आणि आर्थिक अडचण ही दोन्ही कारणं राहिली नाहीत हे शीतललाही कळत होतं पण तरी शाळेपासून लेकीच्या हातात तो यावा असं तिला मनापासून वाटत नव्हतं.. पण कसंतरी करून समीरने तिला पटवलंच... हो म्हणायच्या ऐवजी "प्रोजेक्ट मॅनेजर कुठला" असं ती त्याला म्हणाली तेव्हा तोच जास्त हसला होता. बाकी काही नाही पण अचानक संपर्क साधायला सेलफोन हवा या एकाच कारणावर दोघांचं एकमत झालं होतं. शिवाय तू संध्याकाळी लवकर येत नाहीस त्यावेळी एखादा गमतीशीर मेसेज पाठवून तिचा मूड बनवू शकशील, तुमचं कम्युनिकेशन वाढेल, आई-मुलींमध्ये कसं मैत्रीचं नातं हवं, असली मुलामा देणारी कारणंही समीरने दिली होतीच.

सेलफोन आल्यामुळे सानियाला घरात संध्याकाळी एकटं असतानाचा वेळ आता थोडा बरा जायला लागला. शिवाय आईपण सारखे सारखे मेसेजेस करायची. बाबाही कधीकधी तिचा जुना काढलेला फोटो किंवा एखाद्या पुस्तकातलं छान वाक्य पाठवायचा. आई-बाबांशी पुन्हा एकदा मैत्री वाढत होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळेत मैत्रिणींमध्ये उगीच थोडा खाली गेलेला तिचा भाव पुन्हा एकदा जैसे थे वर आला होता. आता कसं सगळ्यांशी टेक्नॉलॉजीने बोलता येऊ लागलं. आधी तसंही घरचा फोन होता पण आता टाईमपास एसेमेस.. शुभेच्छा सगळं मोबाईलवर. आणि मधल्या सुट्टीत त्याबद्दलची चर्चा. शाळेत अर्थात फोन वापरायला बंदी होती. पण व्हायब्रेटमोडमध्ये असलं की कुणाला कळतंय.

आताच दिवाळीची सुट्टी संपली होती आणि शाळेच्या स्नेहसंमेलनाची तयारी सुरू झाली होती. बाईंनी सुरेल आवाज असलेल्या सानियाला गायनात निवडलं होतं. त्यासाठी रोज शाळा सुटल्यावर एक तास सराव असे. तीन राउंडमधून एकामागे एक बाद होणारे स्पर्धक पाहून सानियाला थोडं टेन्शन आलं होतं. पण तिसऱ्या राउंडला जे तीन विद्यार्थी उरले त्यात सानियाचा नंबर होता. आई-बाबाला ही बातमी तिने शाळेतूनच एसेमेस करून दिली. आई-बाबांचं जवळजवळ लगेच "कॉंगो सानू" आलं आणि तिला हसू आलं. आता आई-बाबा इथे हवे होते असं तिला वाटलं. पण आज घरी गेल्यावर बोलू असा विचार करून ती मैत्रिणींच्या गप्पांमध्ये सहभागी झाली. त्या शुक्रवारी नेमकं रिलीजमुळे बाबाला ऑफिसमध्येच राहावं लागलं आणि आईलाही एका कलिगला लवकर घरी जायचं होतं म्हणून नेहमीपेक्षा उशीर होणार होता.

आई-बाबा सारखे तिला चिअर-अप करणारे मेसेज पाठवत होते आणि तितकीच सानिया अस्वस्थ होत होती. खरं तर इतकी आनंदाची बातमी असूनही तिला जेवावंसं पण वाटत नव्हतं. रखमाला बेबीचं काहीतरी बिनसलंय कळत होतं पण काय करायचं हे न सुचल्याने ती आपली कामं आवरत होती. कंटाळून सानिया आपल्या रूममध्ये जाऊन पडली आणि शीतल घरात शिरली. 'आज बेबीचं चित्त ठिकाणावर नाही' हे रखमाचं वाक्य तिच्या डोक्यात शिरलं पण आठवडाभरच्या कामाच्या कटकटीने दमलेल्या तिला हा विषय सुरू करायचा नव्हता. शिवाय आज समीरही येणार नव्हता. सानियाच्या दरवाज्याचं दार थोडं ढकलून पाहिलं तर ती बिछान्यावर झोपलेली दिसली म्हणून तिला उगाच उठवायलाही तिला जीवावर आलं. गाण्याच्या क्लाससाठी सकाळी उठायचं असतं रोज... झोपूदे... असं मनातल्या मनात म्हणून तिनं आपलं पान घेतलं. चार घास घशाखाली गेल्यावर झोपेने तिचाही ताबा घेतला.

समीरचा शनिवारही ऑफिसमध्ये जाणार होता म्हणून सानियाला तिचे शनिवारचे सगळे क्लासेस इ. ला न्यायची जबाबदारी शीतलवरच होती. त्या सगळ्या गडबडीत गाण्याच्या स्पर्धेचा विषय राहूनच गेला. रविवारी सकाळी समीर आल्यानंतर मग खास मटणाचा बेत आणि मग लगेच येणाऱ्या सोमवारची तयारी करणाऱ्या आपल्या आई-बाबांकडे पाहून त्यांच्याशी काही बोलायचा सानियाचा मूड गेला. पुढच्या शुक्रवारी संध्याकाळच्या कार्यक्रमात तिचं गाणं होतं. हा आठवडा तयारीसाठीचा शेवटचा आठवडा होता.

खरं तर गाणं हा सानियाचा प्राण होता. गाणं आवडतं म्हणून कारेकरबाईंच्या सकाळच्या बॅचला जायचा शिरस्ता तिने आजतागायत कधीच मोडला नव्हता. बाईंबरोबर "सा" लावला की कसं प्रसन्न वाटे. वेगवगळे राग समजावून सांगायची त्यांची हातोटी तिला फार आवडे. त्यांनी शिकवलेल्या सुरांचा पगडा इतका जबरदस्त असे की संध्याकाळी पुन्हा घरी रियाजाला बस म्हणून सांगायला कुणी नसे तरी तिची ती तानपुरा लावून बसे आणि सकाळची उजळणी करी.
हा आठवडा मात्र ती सकाळी घराबाहेर पडे पण बाईंकडे जायच्या ऐवजी एका बागेत जाऊन नुसती बसून राही आणि आई-बाबा कामावर जायच्या वेळेच्या हिशेबाने ते गेले की घरी परते. संध्याकाळी सरावासाठी पण ती थांबत नसे. बाईंनी याबद्दल विचारलं तर माझ्या गाण्याच्या बाई माझी स्पेशल प्रॅक्टिस घेताहेत म्हणून चक्क थाप मारली होती.

"hey how is practice " शेवटी गुरुवारी आईचा एसेमेस आला तेव्हा निदान तिला हे माहीत आहे असं वाटून सानियाला थोडं बरं वाटलं. बाबाने तर अख्खा आठवड्यात तिचं गाणं या विषयावर चकार शब्द काढला नव्हता.

"ya ok" बस आईला इतकंच रिप्लाय करून सानिया मात्र सेलवर चक्क एक गेम खेळत बसली.

शेवटी शुक्रवार उजाडला. आज संध्याकाळी आई-बाबा आपला कार्यक्रम पाहायला येणार नाहीत याची तिला जवळजवळ खात्रीच होती. गायचाही तिचा बिलकुल मूड नव्हता.

"Sanu, I am into middle of a work problem" असा आईचा दुपारी आलेला संदेश पाहून सानियाचा उरलासुरला उत्साहही गळाला होता.

पूर्ण आठवडा मूड ठीक नसलेल्या आपल्या मैत्रिणीचं आज काहीतरी जास्त बिनसलंय हे तिच्याबरोबर शाळेत कायम असणाऱ्या अर्चनानं ताडलं होतं. पण तरी तिला सरळ विचारून तिला वाईट वाटावं असंही तिला वाटत नव्हतं. शिवाय वाढदिवसाच्या गिफ्टचा विषय निघाला होता तेव्हा पटकन सानिया म्हणाली होती तेही तिच्या लक्षात होतं... "मोबाईल न घेऊन सांगतात कुणाला? त्यांना माझ्याशी बोलायला वेळ कुठे आहे? " हे असं याआधी कधी ती आपल्या आई-बाबांबद्दल बोलली नव्हती. त्यामुळे उगाच जखमेवर मीठ नको म्हणून ती दुसऱ्याच कुठल्या विषयावर आणि कार्यक्रमांबद्दल तिच्याबरोबर बोलून तिचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत होती.

सानियाला मात्र आजूबाजूला बाकीचे पालक पाहून कसंतरी व्हायला लागलं. शेवटी तिने आईला सरळ बाथरुममध्ये जाऊन फोन लावला तर नुसती रिंग वाजत राहिली. सानियाचे डोळे पाण्याने भरले. तरी तिने घाईघाईत "aai, where are you? " असा मेसेजही करून ठेवला. कॉल आणि मेसेज दोन्हींपैकी एकाचं तरी उत्तर येईल म्हणून थोडावेळ बाथरुममध्येच ती थांबली.

अखेर पाच-दहा मिनिटांनी अर्चनाच्या हाकेने तिला फोन बॅगमध्ये ठेवून बाहेर यावंच लागलं. गाण्यासाठी निवडलेल्या तीन स्पर्धकांनी स्टेजमागे यावे असा इशारा माइकवरून देण्यात आला होता. अर्चनाला सानियाचा पडलेला चेहरा पाहवेना. काय करायचं तेही कळत नव्हतं.

आता निर्धाराने स्टेजमागे जायचंच नाही असा निर्णय घेऊन सानिया गर्दीत जायला लागली. इतका वेळ आपल्या बरोबर असलेली सानिया कुठे दिसत नाही म्हणून अर्चनाने थोडंफार शोधलं पण ती दिसतच नाही हे पाहून शेवटचा पर्याय म्हणून गाण्याच्या बाईंनाच सांगायला ती सरळ शिक्षक उभे होते तिथं गेली. बाईंना खरं म्हणजे जास्त काही सांगावं लागलंच नाही. सानियाचा मूड जसा तिच्या प्रिय मैत्रिणीने ओळखला होता तसंच आपल्या लाडक्या विद्यार्थिनीचं काय चाललंय हे बाईंच्याही नजरेत आलं होतं. म्हणून जास्त चर्चा न करता त्यांनी हॉलमध्ये सानियाला शोधलंच. "चल, मी तिला समजावते", असं म्हणून बाईंनी सानियाला शोधून स्टेजमागे नेलंही.

बाईंबरोबर खोटं बोलायची ही पहिलीच वेळ. सानियाला तर रडूच कोसळलं. बाईही कावऱ्या-बावऱ्या झाल्या. तिला एका खुर्चीत बसवून कुणाला तरी पाणी आणायला त्यांनी पाठवलं आणि शब्दांची जुळवाजुळव करू लागल्या. सानियाचं इतके दिवसाचं साचलेपण तिच्या नाका-डोळ्यावाटे सतत वाहू लागलं. नाकाचा शेंडा लाल, कानाच्या पाळ्या लाल, आणि सारखी मुसमुसणाऱ्या तिला बाईंना पाहावंत नव्हतं. इवल्याश्या वयात किती हा कोंडमारा असं त्यांच्या मनात येतंय तोच सानियाची आई शीतल अर्चनाबरोबर धावत धावत तिथे आली.

आईला बघून सानिया आईकडे झेपावली. तिचे पटापट मुके घेत आईच्याही डोळ्यांना धारा लागल्या. तिला घट्ट जवळ घेत आजूबाजूच्यांची पर्वा न करता शीतलने चक्क सानियाची काही न विचारता माफी मागितली. बाई सानियाला शोधायला गेल्या तेव्हा अर्चनाने सानियाच्या आईला पुन्हा फोन लावला होता आणि परिस्थितीची कल्पना दिली होती.



'पिलू, आईने तुझ्याकडे किती दिवस पाहिलंच नाही नं? इतके दिवस फक्त एसेमेसवरुनच तुझी खबरबात घेत राहिले आणि तुला प्रत्यक्ष जवळ घ्यायला मात्र मला वेळच मिळाला नाही नं? एकदाही घरी तुझं गाणं गाऊन घेतलं नाही... इतकं छान स्पर्धेत गाणारं माझं पिलू पण माझ्यासाठी मात्र मागच्या बाकावर उभं करून ठेवलेल्या मुलासारखं मी तुला शिक्षा दिली... माफ कर गं मला राणी प्लीज.... "

आईला अचानक पाहून आणि त्याहीपेक्षा गेले कित्येक दिवस हरवलेला तिचा स्पर्श मिळताच सर्व काही मिळाल्यासारखे वाटणाऱ्या सानियाला स्पर्धेआधीच पदक जिंकल्याचा आनंद झाला होता. अजूनही तिचे डोळे भरून येत होते पण ते आपल्या आईला कंफेस करताना पाहून.

या सर्व ताणाताणीत या स्पर्धेत जरी तिची चुरशी झाली नाही तरी यापुढच्या प्रत्येक वाटचालीत तिची आई तिच्याबरोबर प्रत्यक्ष असणार होती हे समाधान खूप होतं आणि अती कामाने यंत्र झालेल्या शीतल आणि समीरसाठी मात्र नियतीने काही कठोर घडण्याच्या आत घेतलेल्या छोट्या परीक्षेतच शंभर टक्क्यांनी उत्तीर्ण व्हायचं होतं.... एका छोट्या यंत्रापेक्षा स्पर्शाची ताकत त्यांना या प्रसंगातून पुरेपूर कळली होती.
--
अपर्णा संखे-पालवे
aparna.blogspot@gmail.com

21 comments:

Suhas Diwakar Zele October 20, 2011 at 11:25 AM  

अपर्णा, लहान मुलीचे भावविश्व समर्पक शब्दात मांडलंस. खरंच, ही सध्याची वस्तुस्थिती आहे आणि ही बदलायला हवी...नाही तर कठीण आहे... :(

सुंदर कथा गं..!!

THEPROPHET October 20, 2011 at 5:04 PM  

भावूक आणि हृदयस्पर्शी! सुंदर..

क्रांति October 20, 2011 at 6:20 PM  

आत कुठंतरी कळ यावी, असं त्या चिमुरडीच्या भावविश्वाचं वर्णन केलंस अपर्णा. आजकाल मुलांना मागतील ते घेऊन दिलं की आपलं कर्तव्य संपलं, आणि मुलंही खूश असं जे समीकरण झालं आहे, त्याला तडा देणारा आणि थोडक्यात खूप काही शिकवणारा शेवट खूप आवडला.

Meenal Gadre. October 20, 2011 at 7:10 PM  

मस्त कथा! आजच्या जगात वास्तववादी आहे.

विनायक पंडित October 20, 2011 at 7:39 PM  

:( अपर्णा खूपच भावली कथा! भयंकर आहे सगळं असं वाटत असतानाच स्पर्शाचा उल्लेख आला आणि जीव एकदम भांड्यात पडला! ओघवती आहे कथा.स्पर्शासारखी एरवी अगदी कॉमन आणि सहज उपलब्ध असणारी गोष्टं माणूस कधीकधी एकदम साफ विसरून जातो नं! शेवट अप्रतिम झालाय! :)

Anonymous,  October 20, 2011 at 10:13 PM  

सुंदर,ओघवत आणि वास्तववादी...

SUNIL JOSHI October 20, 2011 at 10:37 PM  

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात किती दूर होत चाललो आहे आपण .... एक ह्रदय विदारक वास्तव ...

कृष्यणकुमार प्रधान October 21, 2011 at 12:06 PM  

mulaamchyaa maanasshaastrachaa sakhol abhyas krun hee ktha lihili se disate. haaleche paalak hyaapaasun kaahee dhaDaa gheteel kaa?

Kanchan Karai (Mogaraafulalaa) October 21, 2011 at 12:17 PM  

अपर्णा, खूप हळूवार विषयाला हात घातलास गं. आपल्याच कामाच्या नादात, कधी अहंकारात आपण जवळच्या व्यक्तींना गमावून बसतो. मग कितीही जवळ येण्याचा प्रयत्न केला तरी केवळ बोलणं जमत नाही म्हणून कायमचा दुरावा निर्माण होतो. सतत कामात गर्क असणार्‍या आईवडिलांनी आपल्या मुलांच्याही गरजा समजून घ्यायला हव्यात. एखाद्या महागड्या गिफ्टपेक्षा आईवडिलांचा सहवास मुलांसाठी लाख मोलाचा असतो.

SUNIL JOSHI October 21, 2011 at 2:47 PM  

माझी प्रतिक्रिया ह्या काही कवितेत मांडण्याचा हा एक प्रयत्न.....


मला मोकळ व्ह्यायचं आहे.......
बाबा मला काही सांगायचयं
मला खुप खुप बोलायाचयं
आजकाल निवांत वेळच नसतो
बाबा माझा सदा थकलेलाच दिसतो

लहानशी होते ना मी बाबा
तेव्हा किती लाड करायचे माझे...
शब्द तोंडातून निघायचाच अवकाश
काय हवय ते हजर असायचं समोर

आता अपेक्षा वाढल्या आहेत की काय माझ्या
परवडत नसतील ना बहुधा खिशाला तुमच्या
आजकाल मी ऐकत नाही का तुमचं
की कळत नाही तुम्हा मन हो आमचं?

आठवतात हो बाबा मला ते ही दिवस
गमती जमती आणि त्रासांचे ते दिवस
पण त्यात कसा बाबा एक आनंद होता
हरवून गेलाय आता तो शोधू कसा त्याला

आठवतयं का बाबा तुम्हाला ती एक गंमत
वयात येत होते तेव्हाची माझी ती फरफट
पहिल्यांदाच बघा मला तो त्रास झाला
अन् नेमकी आई आणी आजी नव्हत्या घराला
किती घेतलीत माझी काळजी तेव्हा तुम्ही माझी
समजावताना झाला होतात तुम्हीच आई आणी आजी

मी पण आता आधी सारखी राहिलीच नाही
आणी तुम्हालाही तेव्हा सारखा वेळच नाही

लहानशी होते बाबा, आठवतयं ना तुम्हाला
सायकल वर डबलसिट शाळेत सोडायचा मला
चार चाकी आज उभी आहे दिमाखात दारी
संवादहिनतेचा पण शाप घेउन आली आहे भारी

मला बघा वाटतं असं असं असं
तुम्हाला आणि नेमकं तसं तसं तसं
अश्या अश्या अन तश्या तश्या च्या गलक्यात बारे
हरवून बसलोय बघा सगळे आपण स्वतःलाच सारे

आता मला वाटतयं नको काही काही
पण माझ्या साठी थोड़ा वेळ काढणार की नाही
खरचं बाबा खरचं मला काही सांगायचं आहे
संवाद साधून तुमच्याशी मोकळ व्ह्यायचं आहे
संवाद साधून तुमच्याशी मला मोकळ व्ह्यायचं आहे

सुनील जोशी

अपर्णा October 21, 2011 at 9:48 PM  
This comment has been removed by the author.
अपर्णा October 21, 2011 at 9:54 PM  

सगळ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार...कथा लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे आणि मुळात हा एक तसा गंभीर विषय असल्याने थोडं सोपं करून लिहायला बर होईल म्हणून कथारूपाने वाचकांसमोर आणला...

वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये एका सर्वेबद्दल आलं होतं, ज्यात ज्या मुलांचे पालक त्यांच्याशी आधुनिक gadgets वापरून बोलतात त्यांचं स्पर्धा,परीक्षामधल यश आणि जे प्रत्यक्ष संवाद साधून बोलतात त्याचं यश यातले आकडे याबद्दल लिहिलं होतं..त्यांनी आई मुलीचा संवाद विशेष करून टीनएजर मुली याबद्दलही त्यात विस्तृत लिहिलं होतं.. त्यावरून हा विषय मनात घर करून राहिला आणि शेवटी एका कथेद्वारे साकारला...त्यातलं जोडप तर माझ्याच घरात आहे असं म्हणेन...मला छोटी मुलं आहेत पण त्यांच्याही गरजा आहेत हे सारखं जाणवत त्यामुळे थोड्या मोठ्या मुलीचं भावविश्व उलगडता आलं..

सुनील, आपल्या कवितेबद्दल आभार...सुहास, विद्याधर, क्रांतीताई, मीनल, विनायकजी, देवेन, बाबा, कांचन आपण आवर्जून लिहिलत आणि खूप उत्साह वाढवलात त्याबद्दल खूप खूप आभार पुन्हा एकदा...

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...

Kedar Bobde October 23, 2011 at 8:57 PM  

This is awesome..I would rate this as no one no offence to any one but something like this we are all are facing...eye opener

अमित गुहागरकर October 24, 2011 at 10:54 AM  

सुंदर भावस्पर्शी कथा..!

सुधीर कांदळकर,  October 25, 2011 at 6:12 AM  

मस्त. सद्यस्थितीवर झगझगीत प्रकाशझोत. प्रोजेक्ट मॅनेजमेंट करणार्‍या आईबाबांना स्वतःच्या आयुष्याचे schedule नीट plan करता येऊ नये आणि आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या stakeholder ला आवश्यक ती स्पेस देता येऊ नये हे दुर्दैव. मला कंपनीने जेव्हा मोबाईल दिला तेव्हा मी तो घरी जातांना बंद करून कार्यालयातल्याच खणात टाकून जात असे. फक्त कारखान्यात फिरतांना कार्यालयीन वेळेतच त्याचा उपयोग होत असे.

Nisha October 26, 2011 at 3:12 PM  

सुंदर कथा. एक साधा स्पर्श अनेक आधुनिक उपकरणांना पुरून उरतो. मानसशास्त्राची चांगली जाण आहे. अभिनंदन. दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा!

भानस October 26, 2011 at 4:37 PM  

अपर्णा,कथा भावस्पर्शी झालीये गं!आवडली!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Unknown October 27, 2011 at 8:43 AM  

वस्तुस्थिती आणि विचारसारणी या दोन्ही बाबींवर प्रकाशझोत टाकणारी हृदयस्पर्शी कथा

अपर्णा November 4, 2011 at 12:30 AM  

केदार, अमित, सुधीरजी, निशा, श्री ताई, प्रथमेश आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप आभारी....

Anonymous,  November 4, 2011 at 6:47 PM  

Vachtana dolyat pani kadhi aal kalalach nahi...
Apratim... :)

vidhya,  December 10, 2011 at 2:25 PM  

khupch chhan ani rudaysparshi katha aahe!!!!!!!!!

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP