खोताचो खेळ

गिरायकाची हजामत करता करता गंपुशेट घड्याळावर लक्ष ठेवून होते. सकाळी दुकान उघडायच्या आधी असलमकडून गावठी कोंबडी हलाल करून घराशी पाठवंन् दिलानी होती. बायलीक मस्त वडे-सागूती करुक सांगितलानी होती. येवडी हजामत झाली की मस्त घराशी जावन् कोंबडी हाणायची असे बेत त्यांच्या मनात सुरू होते. बाजूलाच मामाच्या हाटेलात नेहमीप्रमाणे गेंगण्या, बाबू तोडणकर आणि इतर रिकामटेकडी माणसा बसलेली होती. हजामत होताच गंपुशेट दुकानाला कडी लावून मामाच्या हाटेलात आले. ते बोलायला तोंड उघडणार तेवढ्यात पारा जवळून फाफ्या परब बोंबलला "खोत खपलो."

"केलानं काम बराबर. खोताक आजच गचकायचो होतो?" गंपुशेट उद्गारले.
"अरे आज आमवस्या. खोतानं काय मुहूर्त काढल्यान वर जावूक." मामाला तिथी आठवली.
"आमवास्येचो प्रश्न नाय रे." गंपुशेटला ताटातली वडे-सागूती कुणीतरी काढून घेतल्या सारखी वाटली. आत्ता खोताक पोचवायचो म्हणजे वडे-सागूतीचो आस्वाद घेऊचा नाय असा त्यांच्या मनात आला आणि घरी वडे-सागूती वाट बघते आहे हे चारचौघात सांगायची पण चोरी.

"मग काय झाला तुका?" मामांना अमावास्येच्या पुढे दुसरे काही महत्वाचे नव्हते.
"माका काय नाय झालो रे. पण आमावस्येक कोण हजामत करुक येत नाय म्हणून म्हटला आज जेवणानंतर जरा टेकीन. तर ह्यो खोत खपलो." गंपुशेटनी मामाच्या आमावस्येला साजेसे कारण दिलान.
"खोताकं अचानक काय झालो? कालचं बाबूक शिव्या घालीत होतो." गेंगण्यान् अधिक माहित पुरवलान.
"माज शिव्या घालीत होतो म्हणूनचं खपलो खोत." बेवडो बाबू तोडणकर स्वतः खोताच्या मृत्यूला कारणीभूत झालो.
"बाबू, मेल्या तू छेडला आसशील म्हातार्‍याक." मामा.
"मी नाय छेडला त्याक. मी फक्त हाक मारली खोताक." बाबू तोडणकरान आपली बाजू मांडलान.
"नुसती हाक नाय मारल्यान. ह्यो मेलो फुल्ल टाम् होतो. झेपा टाकीत जातं होतो. खोत दिसलो तर खोताकं त्याच्या झिलाच्या पुढयात विचारलंन् "काय खोतानू? आजकाल येत नाय पावशेर टाकूकं? झिलानं तुमचो साफ बंदोबस्त करून टाकलेलो दिसता." आता ह्यानं खोताकं झिलाच्या समोर खोटा पाडल्यावर खोत ह्यास शिव्या नाय घालील तर काय ह्याची आरती ओवालील?" गेंगण्यान पुरा डिटेल रिपोर्ट दिलान.
"केलानं काम बराबर. मग खोतानं तुझो अख्खो घराणा खाली उतरवलानं असेल." गंपुशेट उद्गारले.
"मग काय खोत शिव्या देणारं म्हणजे ऐकूक नको." मामा.
"खपलो तो आत्ता नाय शिव्या घालूक यायचो परत. त्याचो तोंड म्हणजे गटार." बाबू तोडणकरास् आदल्या दिवशीच्या शिव्या आठवल्या.
"तू मोठो आलोस सज्जन. तूजो पण तोंड उघडला की वास मारतोच." गेंगण्याची बाबुवर द्विअर्थी प्रतिक्रिया.
"मेल्या गेंगण्या, माझ्या वार्तेत पडू नकोस, बघलसं नां काल माज शिव्या घातल्यान तर आज खोत कसो गप झालो. तुज जायचोय खोताकं भेटूक?"

तेवढ्यात फाफ्या परब पण पोचलो मामाच्या हॉटेलात.

मामा: "काय रे? खोताकं काय झालो? अचानक कसो खपलो?"
"का मामा, खोताची काय उधारी बाकी होती काय तुझ्याकडे?" फाफ्या परबानं वाकड्यात शिरून गजालवाडीचो नाव राखलांनं.
"मामा ठेवतयं उधारी? मामा मूडद्याकडून पण वसुली करील." बाबू तोडणकर मामाचे गुण गायला.
"होय तर!!! तुझ्यासारखी जिती लोका चार आणे पण सोडीत नायत म्हणून तुमचा मुडदा कधी पडतो त्याची वाट बघूक लागते. वसुली करूक."
"अरे मरू दे रे तुमची वसुली. मेले जसे काय बंगले बांधनार हायत. फाफ्या काय झालो काय नक्की?" गेंगण्यान गाडी पुन्हा मूळ विषयावर घेतालन.
"अरे काय नाय, खोत अंगणात बसलेलो. सुकटा ठेवलेली सुकवूक, ती राखीत होतो. सुकटा जवळ कावळे आले ते हाकवायकं हात वर करून वराडलो आणि तसोच पडलो. कावळ्याच्या बरोबर खोताचो प्राणपाखरू पण उडालो."
"अरे रे. खोताचो मच्छीवर लयं जीव. सुकटा राखता राखता खपलो."
"सुकटात खोताचो जीव अडकून रवला असेल. म्हयनाभर सुकटाचो नाव पण काढूकं नको. नायतर खोत मानेवर बसलो म्हणून समजा."
"मग कधी उठवायचो खोताकं? काय ठरलो काय?" गंपुशेटना सुकटात काय पण इन्ट्रेस्ट नव्हता. त्यांका फक्त वडे-सागूती दिसत होती.

मामा: "मेल्या गंपू, त्यास खपून अर्धा तास पण नसेल झालो. तुज काय घाय लागलीय?"
फाफ्या परब: "काय नक्की म्हायत नाय पण खोताची चेडू मुंबैला असते ना ती आल्याशिवाय नाय. ती येल रात्रीपर्यंत."
गेंगण्या: "अरे देवा, एवढ्या उशिरा."
"मग काय झालो. तुज खै जायचो असा रात्रीस?" गंपूशेट रात्रीदेखील उरलेला रस्सा हाणता येईल ह्या विचाराने सुखावले होते.

गेंगण्या: "मज खै जावचो नसा पण आज आमवस्या नां? म्हणून संध्याकालच्या आत जावंन् लाकडा रचूक हवीत. काळोखात काय दिसेनासा होता."
"होय होय काळोखात काय दिसत नाय. पायाखालच्या दगड धोंड्याकं आडकून पडायचो माणूस." बाबू आणि गेंगण्याचो कधी नाय ते एकमत झालो.
"मेल्या गेंगण्या, तू पोर्णिमेच्या चांदण्यात पण दिसेनासाच असतोस." गेंगण्याच्या रंगावर गंपुशेटनीं शेरा मारला.
"आणि ह्यो बाबू दिवसापण झेपा टाकीत चालतो मग रात्री पडलो तर नवीन ता काय?" मामान् बाबूची बाटली काढलान्.

खोत खपल्याची खबर असली तरी नेहमीप्रमाणे सगळे एकमेकाचे पाय खेचूक लागले होते तितक्यात दुरून मास्तर येताना दिसले. खोताची नातवंडा शाळेत होतीत त्यामुळे मास्तरांक पण शाळेत बातमी पोचली म्हणून दुपारी जेवणाच्या सुट्टीत घरी जायचो सोडून मास्तर मामाच्या हाटेलात हजर झाले. तिथंन सगळी लोका मग खोताच्या घराशी गेलीत. खोताचो झिल बाह्यरच बसलो होतो. खोताची लेक लगेचच निघाली होती मुंबैवरून. वेळेचो हिशोब केलो तर सगळा आटपूक संध्याकाळ टळून जायत होती. खोताच्या घराशी जरा वेळ काढून सगळे आपापल्या घराशी गेले. रात्रीची ग्यारंटी नसल्याने गंपूशेटने घराशी जावन् मनसोक्त वडे-सागुती हाणलांनी आणि ताणून दिलान ती डायरेक्ट संध्याकाळी त्याचे डोळे उघडले. मग जरा च्या मारून गंपूशेट मामाच्या हाटेलात गेले. तिकडे बाकीची लोका आधीच जमली होती. मास्तर पण शाळा संपवन् पोचले होते. गेंगण्या आणि बाबू तोडणकर दोघा आधीच मसणात गेलेले लाकडा रचूक. काळोख पडू लागलो होतो. कधी नाय ते सगळी एकत्र जमली होती म्हणून खोताच्या घराकडे जाता जाता सगळे वाटेतल्या कदमांच्या गुत्त्यावर गेले. खोत पण ह्याच गुत्त्यावर यायचो. मामाच्या हाटेलानंतर गावातला दुसरो अड्डा म्हणजे कदमाचा गुत्ता. फरक इतकोच की मामाच्या हाटेलात सकाळपासून ते रात्री हाटेल बंद होयपर्यंत कोण ना कोण चकाट्या पिटीत बसलेलो असायचो पण कदमांचा अड्डा म्हणजे संध्याकाळ नंतर गजबजणारो ठिकाण. जाता जाता गेंगण्या आणि बाबू तोडणकर गुत्त्याला भेट देवन् आधीच फुल टाम होवून गेल्याची खबर कदमाकडून मंडळींना मिळाली.

आधीच आमावास्या आणि वर रात्रीचो मसणात जायचो त्यामुळे मंडळी जरा टरकूनच होती. खोताक पण नेमको अमावास्येकच टपकायचो होतो? ह्या विषयावर पुन्हा एकदा चर्चा झाली आणि मास्तरांसकट सगळ्या मंडळींनी आपल्या मनातील भीती चेपण्यासाठी खोताक शिव्या घालीत अर्धा-पाऊण तास बसून आपापल्या टाक्या फुल्ल केलांनी आणि मग सगळे तरतरीत होवून खोताच्या घराकडे जावक निघाले. तिकडे खोताच्या झिलाक् पण कुणीतरी काळोखात पावशेर आणून दिलान होती त्यामुळे मंडळी पोहोचेपर्यंत तो पण फुल्ल तयार होता. खोताच्या घराशी जावन बाकीची तयारी करेपर्यंत खोताची लेक पण मुंबैवरून आली. तीचो रडायचो भर ओसरल्यावर खोताक शेवटची आंघोळ घालून तिरडीवर बांधून खोताची शेवटची यात्रा कंदिलाच्या प्रकाशात स्मशानाच्या दिशेने निघाली. चार-दोन लोका सोडली तर बाकी सगळे कदमाकडे जावन आले होते. सगळे आपल्याच धुंदीत असल्याने आपल्या समोरचे लोकं ज्या दिशेला जातील तिकडे सगळे त्यांच्या मागून मागून जात होते. बराच वेळ चालून पण स्मशान आला नाय तेंव्हा एकान् निरखून आजूबाजूला बघितालान् तर आपण भलत्याच दिशेला आलोय याची त्याने सगळ्यांना जाणीव करून देलान. आधीच लोकांकं कधी एकदा खोताक पोचवन घराशी जातव असा झालेला त्यात रस्ता चुकल्याने मघाचोच खोतावरचो राग परत उफाळून आलो. मामा तर खोताच्या तिरडीजवळ जावन त्याक शिव्या घालू लागलो.

"अरे ए खोता, थेरड्या अजून तूज पोचवलो नाय आणि तू आत्ता पासून खेळ करूक लागलोस. मेल्या इथल्या इथे भगताक कोंबडो देवन तुजो बंदोबस्त करून टाकतंय."

गंपूशेटनी मामाक बाजूला घेवन् शांत केलांनी आणि सगळी लोका परत स्मशानाच्या दिशेने जायस लागली. संध्याकाळी लाकडा रचूक गेलेल्या गेंगण्या आणि बाबूचो कुठेच पत्ता नव्हता. मेल्यांनी लाकडातरी रचलांनी हायत की नुसतेच दारू ढोसून घराशी जावन् पडलेत याची चर्चा करीत सगळे स्मशानाच्या दिशेन जात होते.

इकडे गेंगण्या आणि बाबू गुत्त्यावर मजबूत ढोसून संध्याकाळीच मसणात गेलेले. बाबूक ढोसायची सवय असली तरी गेंगण्या काय कदमाचा रोजचो गिऱ्हाईक नव्हतो. गेंगण्यान् बाबूच्या जोडीनं ढोसालान खरी पण त्याला जरा जास्तीच झाली. त्यामुळे मसणात लाकडा रचता रचता गेंगण्या मध्येच तिथेच पडलो आणि नशेत तसोच पडून राह्यलो. आदल्या दिवशी खोताच्या शिव्या खाल्ल्यान म्हणून असेल पण बाबून् मात्र अगदी मनापासन् लाकडा रचायचो काम केलेलो. त्या नादात गेंगण्या आपल्या बरोबर होतो ह्या पण तो विसरून गेलो. सगळा काम झाल्यावर त्यास गेंगण्या आठवलो. तेंव्हा हाक मारून पण गेंगण्या आजुबाजूक कुठे दिसेना तेंव्हा बाबूस वाटलो की आमावास्येकं भिवन गेंगण्या पाटल्या पाटी पळून गेलो. मग गेंगण्याची गंमत उद्या मामाच्या हाटेलात तिखटमीठ लावन कशी सांगायची याचो विचार करीत बाबू तोडणकर खिशातली नेमीची बाटली तोंडाक लावन् गावकरी खोताकं घेवन् यायची वाट बसलो.

थोड्या वेळान खोताची अंतिमयात्रा मसणात येवन पोचली. खोताक् एकदाचो अग्नी देवन् लवकरात लवकर सटकूक् हवा म्हणून खोताला डायरेक्ट चितेवर ठेवायला म्हणून खांदेकरी पुढे सरकले आणि वाटेत पडलेल्या गेंगण्याक् अडखळून पुढचे दोघे सपशेल तोंडावर पडले. आत्ता बरोबर आलेले सगळेच टाम होते म्हटल्यावर पुढचे दोघे पडल्यानंतर पाठच्यांना पण काय आवरलो नाय. ते पण तिरडीसकट खोताक् घेवन आडवे झाले. त्या गडबडीत खोताचो मुडदो पण तिरडी सोडून बाजूस् जावन पडलो आणि बाबून रचलेली लाकडापण त्यांच्यापैकी एकाच्या धक्क्यान एका बाजून कोसळली. खांदेकऱ्यांच्या हातातले दोन कंदील पण फुटले आणि एकदम काळोख पसरला. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे सगळे एकदम हबकले. आधीच उशीर झालेलो. अमावास्येची काळीकुट्ट रात्र आणि वरतून डोळ्यावर आलेली नशा त्यामुळे सगळेच खोताक् पोचंवन् घरी जायच्या घाईत आणि त्यात ह्यो असो घोळ. त्या खांदेकऱ्यात मामा आणि मास्तर पण होते. मास्तर नेमके पडले ते बाबू तोडणकरच्या पायावर. मास्तर शरीराने तसे हट्टेकट्टे त्यामुळे मास्तर अंगावर पडल्यामुळे बेवड्या बाबू तोडणकराचो पाय चांगलोच मुरगळलो. तो बोंबलायस लागलो. सगळे परत एकदा शिव्या घालीत एकमेकांक सावरीत उठले. ह्या वेळी गंपूशेटचा पण पारा चढला होता.

"केलानं काम बराबर," गंपूशेट तणतणले. "अरे मेल्या खोता, मगाशी मामा तूज शिव्या घालीत होतो तेंव्हा मी त्यास शांत केलो. तर आत्ता तूच माझ्या जीवावर उठलोस?"
"बघलास नां गंपू. मेल्या मी मघाशीच तिथल्या तिथे खोताचो बंदोबस्त केलो असतो. तू मध्ये पडलास तर खोत उलटो तुझ्यावरच उलटलो." मामा.
"उलटणारच. उलट्या खोपडीचोच म्हातारो होतो तो. काल माका नाय नाय त्या शिव्या घातल्यान. त्या शिव्या घालून पोट भरला नाय तर आज मेल्यावर मास्तराक् फेकून मारल्यान माझ्या पायावर." बाबू विव्हळत बोललो. बाबूचो पाय एकदम ठणकू लागलो होतो. तसो पण तो टाम असलो की कसोबसो झेपा टाकीत चालायचो पण आता तर पाय मुरगळलो म्हणजे घरी परत जायस कोणचो तरी आधार घेवक हवो होतो.

"नायतर काय ओ गंपूशेट? तुम्हास लै पुळका आलेला मुडद्याचा. घ्या उचला आणि घाला चितेवर. आग लावन देवूया एकदाची. खपून एक दिवस पण नाही झाला तर थेरडा एवढ्या लीला दाखवतोय." आता मास्तर पण अध्ये पडले.
"बरोबर बोलताव मास्तर. चला आत्ता खोताच खेळ खतम करून टाकू." गंपूशेटनी दुजोरा दिला.

सगळे खोताला चितेवर ठेवण्यासाठी तिरडी उचलायला गेले पण पहातात तर तिरडीवरून खोताचा मुडदा गायब. आत्ता मात्र खोताचो झिल पण घाबरलो. मुडदा गायब झाला म्हटल्यावर सगळ्यांची बोबडी वळूक आलेली. म्हातारो खोत तिरसट होतो पण खपल्यावर इतके खेळ करील असा वाटला नव्हता. मास्तरांनी सगळ्यांना शांत करीत धीर दिला

मास्तर: "घाबरू नका. घाबरू नका. इथेच असेल. शोधा, शोधा पटापट."

सगळे लगेच इकडे तिकडे पाहू लागले. तेवढ्यात त्या काळोखात खाली पडलेलो गेंगणो फाफ्या परबाच्या नजरेस पडलो. त्यास् वाटलो खोताचो मुदडो म्हणून त्याने "खोत गावलो" "खोत गावलो" अशी बोंब मारल्यान आणि परत मुडदा खै जावक् नको म्हणून घट्ट धरून ठेवल्यान. मुडदा गावलो म्हटल्यावर लोकांच्या जीवात जीव आलो.

"गावलो? गावलो नां? पेटव. पेटव मेल्याला तिथल्या तिथे." मामा चांगलोच पिसाळलेलो होतो खोतावर.

"होय होय. आत्ता जास्ती वेळ काढीत बसू नका. उचला मुडद्याला आणि टाका लाकडात." बाबू आणि गंपूशेटने पण मामाला पाठींबा दिलानी. मग लगेच सगळ्यांनी मुडदा समजून गेंगण्याला चितेवर झोपवलांनी. बाकीच्या दोघा तिघांनी आजूबाजूची लाकडा गोळा करून मुडद्यावर रचूक सुरुवात केलांनी. खोत तसा अंगान किडकिडीतच होता आणि त्याला खपून काही तास उलटले होते त्यामुळे खोताचा मुडदा पण चांगलाच ताठरला होता. नशेत धुंद लोकांनी जसा गेंगण्याक मुडदा समजून चितेवर टाकलानी तसाच खोताच्या ताठारलेल्या मुडद्याकं लाकूड समजून चितेवर रचलांनी. सगळी लाकडा रचून झाल्यावर इतर विधी पटापट आटपून खोताच्या झिलान खोताच्या चितेस अग्नी दिलान.

खोताचो कारभार एकदाचो संपलो असा म्हणून लोका जरा आरामात उभी राह्यली. नाय म्हटला तरी आजवर इतको त्रास कधी झालेलो नव्हतो. खोतान् मात्र कमाल केल्यान. आधी रस्ता चुकवल्यान. मग लोकांक् पाडल्यान आणि वर सोताच गायब झालो. एक ना दोन खेळ केलान. शेवटी एकदाचो अग्नी लागलो खोताक्. सुटलो एकदाचे. असा विचार करीत मंडळी उभी होतीच तितक्यात अजून एक अघटीत घटना घडली. आगीच्या झळा लागताच चितेत टाकलेल्या गेंगण्याची नुसतीच उतरली नाय तर आजूबाजूला आग बघून चांगलीच तंतरली. गेंगण्यान् अंगात असेल नसेल तेवढो जोर काढून अंगावरची जळती लाकडा बाजूला उडवल्यान आणि बोंब ठोकून चितेच्या बाहेर उडी मारून केकाटीत तो तसोच सुसाट स्मशानाच्या बाहेर वाट फुटील तिकडे पळत गेलो आणि काळोखात नायसो झालो. खोताक् अग्नी देवून आधीच्या प्रसंगातून सावरलेली मंडळी जरा कुठे निवांत झाली होतीत नव्हतीत तोवर जळत्या चितेतून खोताचो मुडदो उडी टाकून बाहेर पळालो हे पाहून मात्र सगळ्यांचो संयम सुटलो. ते दृष्य पाहून जो तो असो काय हबकलो की बाहेर पडलेलो आपलो गेंगणो होतो असा विचार मामा आणि गंपूशेटच काय पण मास्तरांच्या पण डोक्यात नाय आलो. सगळ्यांका उघड्या डोळ्यान खोताचो भूत दिसलो होतो आणि खोताच्या झिलासकट एकजात जो तो भूत भूत असा बोंबलीत गावच्या दिशेने पळीत सुटलो.

क्षणभरात पुरा स्मशान रिकामा झाला आणि अमावास्येच्या त्या भयाण रात्री स्मशानात फक्त दोघं जण उरले. पहिलो म्हणजे सुजलेलो पाय हातात घेवन दातखिळी बसलेलो बाबू तोडणकर आणि दुसरो म्हणजे चितेत शांतपणे जळणारो खोत.
--
सिद्धार्थ
nasatiuthathev@gmail.com

15 comments:

Suhas Diwakar Zele October 20, 2011 at 12:47 PM  

हा हा हा .. प्रचंड भारी रे सिद्ध्या !!

THEPROPHET October 20, 2011 at 1:12 PM  

हाहाहा... लई भारी!

क्रांति October 20, 2011 at 6:38 PM  

भारी! काय जबरदस्त वातावरणनिर्मिती केलीय. आणि संवादही खास!

Anonymous,  October 20, 2011 at 10:49 PM  

सिद्ध्या, भारी रे...खूप मजा आली वाचतांना ... :)

Unknown October 21, 2011 at 12:35 AM  

हा हा हा! केलान काम बराबर! ब्येष्ट!

Kanchan Karai (Mogaraafulalaa) October 21, 2011 at 12:35 PM  

सिद्धार्थ, चांगली लिवलीस रे कथा. तुजा हा टॅलेंट माका म्हायित नव्हता रे! रातच्याला कथा वाचली नाय ता नशीब समज, नायतर आज काय मी हय कमेंट देऊक इली नसती. आमोशेच्या काळ्याकुट्ट रात्री प्रेत पोचवायचा म्हंजे काय गम्मत नाय मा!

अपर्णा October 21, 2011 at 9:50 PM  

पांडग्यासारखो तुझ्या खोताचो एक प्रयोग होऊन जाऊदेत सिद्धोबा...

तुजा हा टॅलेंट माका म्हायित नव्हता रे! +++++++++++

mau October 22, 2011 at 8:41 AM  

This is something !!!
Excellent ,Excellent and Excellent !!!!!!!!!!
सिद्धार्थ ,सगळा प्रसंग डोळ्यासमोर आला.
जिंकलास रे तु.
तुजा हा टॅलेंट माका माहित नव्हता रे !!!+१०००००.

Anjali October 22, 2011 at 1:40 PM  

Hi, Really nice, wachun khup chan watl....

Anonymous,  October 23, 2011 at 9:06 PM  

Sorry dear this is remake of Bablya Chtetun Palala - studied during schooling days...this is just Tadka not original..I would try and find who was original author..

अमित गुहागरकर October 24, 2011 at 1:47 PM  

हाहा... मस्त मालवणी इश्टोरी..!

manikwalekar October 31, 2011 at 10:01 PM  

kokni katha ekadam bhari va va best

Anonymous,  November 1, 2011 at 4:57 PM  

lai zyak... :)

Ganesh Pathare May 3, 2021 at 6:48 PM  

बाबल्या चितेतून पळाला वसंत सबनीसांनी लिहिलेली कथा

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP