परमेश्वरला मदत

फिल्मच्या सुरुवातीला एक स्लाईड येते. सिनेमा सुरु होण्यापूर्वी येते तशी!


काही क्षण पूर्ण शांतता!

एका मोठ्या शाळेचं पटांगण.गणवेश घातलेली काही मुलं रांगांमध्ये अजिबात गडबड गोंधळ न करता उभी आहेत. पण चुळबूळ मात्र सुरु आहे. जणू काही कुणाची तरी वाट पहात आहेत. समोर उंच मंचावर पांढरीशूभ्र साडी परिधान केलेल्या दोन शिक्षिका आहेत. तेवढ्यात सात-आठ वर्षाची एक विद्यार्थिनी धावत पळत शाळेच्या आवारात शिरते. धावत पळतच सर्वात पुढे तिच्या जागी जाऊन उभी राहते. बरोब्बर वेळेवर आले नाहीतर मिस् झालं असतं अशी भावना चेहर्‍यावर! सर्वजण सावधान स्थितीत हात जोडतात. राष्ट्रगीत सुरु होतं. बासरी, संतूर आणि इतर वाद्यं आळीपाळीने राष्ट्रगीताची धून वाजवत असतात. काहींचे ओठ हलताहेत तर काहींचे नाही. कानात श्रवणयंत्रे लावलेली! शब्दातून जे व्यक्त करता येत नाही ते हातांच्या भाषेत सांगायचा प्रयत्न करताहेत. भावना तीच! छाती गर्वाने फुगलेली. पाठीचा कणा ताठ आणि मान उंचावलेली!

पंजाब-सिंध-गुजरात-मराठा म्हणतांना त्यांनी करून दाखवलेला शिखांचा बुचडा, विंध्य-हिमाचल-यमुना-गंगा म्हणतांना हातांनी दाखवलेली पाण्याची लहर, आम्हाला आमच्या देशाचा अभिमान आहे, प्रेम आहे हे करपल्लवीने सांगण्याचा त्यांचा आटापिटा थेट हृदयाला भिडतो. त्यानंतर जय हे, जय हे, जय हे, जय, जय, जय, जय हे म्हणतांनाचा त्यांचा आवेश पाहून मान शरमेने खाली झुकते. राष्ट्रगीत संपतं तेव्हा मुलं हाताने हवेत फडकणारा राष्ट्रध्वज दाखवत असतात.

राष्ट्रगीत संपल्यावर एक स्लाईड येते.

देशभक्तीकी कोई भाषा नहीं होतीहे राष्ट्रगीत ऐकताना माझं हृदय नेहमीप्रमाणे उचंबळून का आलं नाही? नेहमी वाटतो तसा अभिमान का वाटला नाही? तोंड का लपवावंसं वाटलं? डोळे का भरून आले?

ज्या माझ्या भारत देशाचा ते आपल्या अनोख्या शैलीत जयजयकार करताहेत तो आपला देश, आपण, आपलं सरकार त्यांच्यासाठी काय करतोय? त्यांच्या कोणत्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतोय? प्रगतीच्या ज्या संधी आपण धडधाकट माणसं घेतो त्यावर त्यांचाही या देशाचे नागरिक म्हणून तेवढाच अधिकार आहे. मग त्यांना पुरेशा संधी मिळतात का? अपंगत्वावर मात करण्यासाठी आपण त्यांना आवश्यक ते शिक्षण देतो का? दुर्दैवाने याचं उत्तर पुरेसं नाही असंच आहे. आणि तरीही ते जयजयकार करताहेत.

----------------------------------------

रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म. पार्श्वभूमीवर एक गाडी जाताना दिसते. Zoom in. एका बाकावर आठ-दहा वर्षाचा काळासावळा मुलगा बसलेला दिसतोय. डोळे बंद पण नजर आकाशाकडे असल्यासारखी मान उंचावलेली! काहीतरी लक्षात येऊ लागतं तोच कानावर हलकं हसू येतं. मुलगा विचारतो," काय झालं?"

कॅमेरा त्या लांबलचक बाकाच्या दुसर्‍या टोकाला पोचतो. तिथे पुस्तक वाचत असलेल्या तरुणाच्या चेहर्‍यावर हसू आहे. तो तरुण आवाजाच्या रोखाने पाहतो. मुलाला निरखतो. विचारतो, "काय ?"

मुलगा विचारतो, "का हसताय ?"

मुलाकडे एक दीर्घ दृष्टीक्षेप टाकून हसत हसत तो तरूण म्हणतो,"या पुस्तकात एक विनोद आहे. लंगडत येणार्‍या एका माणसाला एकजण विचारतो, का लंगडतो आहेस? तर तो म्हणतो, माझा दात दुखतोय." विनोद ऐकून मुलगा हसतो. जरा जास्तच हसतो. जोरजोरात हसतो. कॅमेरा त्या मुलावर स्थिरावतो. हसणं थांबवून तो विचारतो, "तुमचं झालं की मला द्याल?"

तरुण चमकून त्याच्याकडे पाहतो. आश्चर्याने विचारतो, "हे पुस्तक?"

मुलगा गंभीरपणे म्हणतो, "डोळे!"

Zoom in चा Zoom out होऊ लागतो. आपल्या नजरेत भरते ती त्याच्या हातातली पांढरी काठी!

यूट्युबवर वर पाहिलेल्या या दोन फिल्म्स. श्रीलंकेची EYE DONATION CAMPAIGN पाहून आपण सुन्न होतो. इतकी परिणामकारक जाहिरात क्वचितच पाहायला मिळते. नेत्रदान करा असा उपदेश कुठेही न करता तिचा योग्य तो परिणाम होतो. ही जाहिरात बनवणार्‍यांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद!मान्य आहे, ऐश्वर्याचे डोळे खूप सुंदर आहेत. पण जाहिरातीत केवळ ते डोळे पाहून किंवा ऐश्वर्याला पाहून कुणी नेत्रदान करायला उद्युक्त होईल? झाला तरी प्रमाण नगण्यच असेल. नव्हे आहेच! १०००० जण आपण नेत्रदान करण्याची प्रतीक्षा करीत आहेत.

चूक - मग ती कुणाचीही असो! परमेश्वराने केलेली असो वा मानवाने केलेली असो. ती निस्तरण्याचा प्रयत्न व्हायलाच हवा. सुधारायचा प्रयत्न व्हायलाच हवा. तो प्रयत्न परमेश्वर आपल्याकरवी करतो. आपल्यात अंशरूपाने तो वसतोच ना! त्याला ती संधी देऊ या. दिवाळीची ही रोषणाई, हा झगमगाट, हा आनंद, हा जल्लोष उघड्या डोळ्यांनी पाहण्याचं सुख त्यांना अनुभवता येत नाही. त्यांना ते देऊ या. या मंगलप्रसंगी संकल्प करू या.
--
निशा पाटील
patil.nisha178@gmail.com

9 comments:

क्रांति October 20, 2011 at 7:33 PM  

चांगला संकल्प आहे निशा. मनापासून करायलाच हवा असा. मी नक्कीच प्रयत्न करेन हा संकल्प करून सिद्धीस नेण्याचा. दोन्ही दुवे खूपच परिणामकारक आहेत.

Anonymous,  October 20, 2011 at 8:47 PM  

अगदी सुंदर विचार अगदी योग्य शब्दात मांडलात ... मी सुद्धा ह्याबद्दल काही लिहल आहे ...शक्य असल्यास जरूर वाचावे...


http://wp.me/pziD7-Ft

Anonymous,  October 20, 2011 at 8:47 PM  

अगदी सुंदर विचार अगदी योग्य शब्दात मांडलात ... मी सुद्धा ह्याबद्दल काही लिहल आहे ...शक्य असल्यास जरूर वाचावे...


http://wp.me/pziD7-Ft

मीनल गद्रे. October 22, 2011 at 7:32 AM  

उत्तम लेखन. राष्ट्रगीत खासच!

Kanchan Karai October 22, 2011 at 11:11 AM  

नेहेमीप्रमाणे उत्तम लेख, निशाजी. हे दोन्ही व्हिडीओज पाहिले होते. मनाला भावले. आपल्या मनात आलेला विचार माझ्याही मनात आला होता. ज्यांना आपल्या देशाबद्दल अभिमान वाटतो, खरंच त्यांना सचोटीने वागणारे नागरिक म्हणून काय मिळतं? सामान्य माणसाची जर ही स्थिती, तिथे हातांनी बोलणारांची काय अवस्था? ऐश्वर्याची काही वर्षांपूर्वी मुलाखत झाली होती -”जीना इसीका नाम है’ या कार्यक्रमात तेव्हा तिने असं म्हटलं होतं की तिच्या ’त्या’ जाहिरातीमुळे अनेकांनी नेत्रदानाचे फॉर्म भरले. सत्य माहित नाही. पण श्रीलंकेची ही जाहिरात मात्र मनाला चटकन स्पर्शून जाते. दोन मिनीटं काय बोलावं हेच सुचत नाही. खरं आहे, आपलं काम झालं की यांना द्यायला काहीच हरकत नाही. निदान ही जाहिरात पाहून तरी नेत्रदानात भर पडावी.

सुहास October 22, 2011 at 12:48 PM  

सुंदर विचार आणि उत्तम मांडणी...

Nisha October 24, 2011 at 3:09 PM  

धन्यवाद कांचन.लेखासोबत ते video असल्यामुळे लेख वजनदार झालाय असं वाटतं. या लेखाद्वारे जागरूकता वाढली तर आनंदच आहे. नाहीतर प्रयत्न केल्याचं समाधान आहेच! सुहास, दवबिंदू, मीनल क्रांती, अभिप्रायाबद्दल धन्यवाद.या प्रोत्साहनानेच लिहायला बळ येतं.

Anjali October 24, 2011 at 4:14 PM  

Kharch khup chan lihl aahes...ti andh mulanch rashtrageet pahtana sole bharun aale hote....keep it up.. can i add u on fb?

Nisha October 24, 2011 at 10:26 PM  

अभिप्रायासाठी धन्यवाद. fb वर मी फारशी active नाही. पण जरूर add करा. दीपावलीच्या अनेक शुभेच्छा.

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP