जेन जेन

गोरापान रंग, शिडशिडीत देहयष्टी, बारीक मिचमिचे पण चमकदार डोळे, लांबसडक केस आणि चेहराभर हसू, अशी साठीला पोहोचलेली जेन-जेन पहिल्यांदा मला भेटली तेव्हा मी प्रभावित झाले, ते तिच्या अस्खलित इंग्रजीने! तिचा खडा आवाज आणि इंग्रजी बोलण्याची धाटणी यांनी समोरचा चारी मुंड्या चीत झालाच पाहिजे.

जेन-जेन चा जन्म चीनचा. पण काही महिन्यातच ती आई-वडिलांबरोबर तैवानला आली. तिचं बालपण आणि तारुण्यातील सुरुवातीची काही वर्षे तैवान मधेच गेली. घरची प्रचंड श्रीमंती, कशाला काही ददात नव्हती, पण वडिलांचा बाहेरख्यालीपणा, घरात तीन सावत्र आया आणि त्यांची मुलं, स्वतःची आई दुसर्‍या पुरुषाबरोबर लग्न करून निघून गेलेली, अशा विचित्र वातावरणाचा उबग आलेली जेन-जेन वयाच्या सतराव्या वर्षी एकटीच अमेरिकेला निघून आली.

फारसं शिक्षण न झालेल्या जेन-जेनचं इंग्रजी भाषेवर मात्र प्रभुत्व होतं. तैवान मध्ये असताना सतत रेडीओवरच्या बातम्या ऐकून इंग्रजी भाषा तिने आत्मसात केली होती. तिची ग्रहणशक्ती इतकी तीक्ष्ण होती. त्या बळावर अमेरिकेत तिने छोटीशी नोकरी मिळवली. गेली ४५ वर्षे ती इथे राहतेय, पण इथलं नागरिकत्व मात्र तिने घेतलं नाही. अमेरिकन एम्बसी मध्ये नागरिकत्व घेण्यासठी गेली तेव्हा तिथे तिने पाहिलं, ज्यांना नीट इंग्रजी बोलता येत नव्हतं त्यांच्याशी तिथले अधिकारी फारच उद्धटपणे वागत होते. म्हणून ती रागा-रागाने तशीच परत आली.तिला या देशा-देशातील सीमारेषाच मान्य नसायच्या. ती म्हणायची मला देशच नाही. तिला सामाजिक बंधनं ,नियम या सार्‍याचंच वावडं! एकदा पोलिसांनी संशय घेवून तिची गाडी अडवली आणि तिच्याकडे ओळखपत्र मागितलं तेव्हा हिने ओळखपत्र दाखवायलाच नकार दिला. “मी कुणी चोर,गुन्हेगार नाही,मी का ओळखपत्र दाखवायचं?” असा खडा सवाल पोलिसांनाच तिने केला. झालं,सगळी वरात पोलीस स्टेशनात गेली. तिथल्या अधिकार्‍यांनाही तिने जुमानलं नाही. शेवटी हुज्जत घालत एक रात्र स्टडीत काढून दुसर्याद दिवशी घरी आली. वयाच्या ५५ व्या वर्षी पण तिच्या वागण्यात इतका हेकटपणा होता. तरुण असताना एका हातात बियरचा कॅन आणि दुसर्‍या हातात सिगारेट अशी ती मॅन्युअल कार भन्नाट वेगाने चालवायची. अगदी साठीला पोहोचली तरी तिच्या गाडीचा वेग काही कमी झाला नव्हता. ३-४ वेळा स्पीडीगचा दंडही भरावा लागला होता तिला.

तिच्या या वेगवान आयुष्यात दोन पुरुष आले. पहिल्या नवर्‍याने फसवणूक केली, त्याच्याशी घटस्फोट घेऊन पुन्हा नव्याने तिने ज्याच्याशी संसार थाटला त्यानेही विश्वासघात केला. पुढे त्याला एड्स झाला. या नवर्‍यापपासून जेन-जेन ला एक मुलगा झाला. त्याला वाढवताना मात्र जेन-जेन मधली आई जागी झाली. ती आपला पूर्ण वेळ आपल्या मुलामध्ये, ब्रायन मध्ये गुंतलेली असे. अमेरिकन संस्कृतीचं वारं त्याला लागू नये म्हणून तिने त्याला शाळेतही घातले नाही. घरीच त्याचे 'home schooling' करू लागली. आम्हालाही ती बर्‍याचदा सल्ला द्यायची.'मुलांना शाळेत पाठवू नका. घरीच शिकवा.शाळांमधून मुलांना नको ते शिक्षण मिळतंय. अमेरिकन संस्कृतीत मुरलेली जेन-जेन याच संस्कृतीच्या नावाने बोटे सुध्धा मोडी. काळाच्या ओघात तिला बरीच उपरती झाली होती. तिच्या मुलावर तिचा भारी जीव होता. तिला जसं शक्य होतं तसं तिने ब्रायनचं संगोपन केलं, पण आम्हा भारतीयांची मुलांमधली गुंतवणूक बघितली की म्हणायची, “तुम्ही ज्या निगुतीने आपल्या मुलांना वाढवताय तेवढ्या निगुतीने मी ब्रायनला नाही वाढवू शकले.” या अपराधीपणाची बोच जाणवायची तिच्या बोलण्यात. आमचं कुटुंबवत्सल असणं, आमचं आत्तिथ्याशील असणं, या सार्‍याचं तिला प्रचंड कौतुक पण आम्ही जेवताना काटे-चमचे न वापरता हाताने जेवतो, त्याला तिचा कडाडून विरोध असे. भरभरून कौतुक करण्याबरोबरच तोंडावर अपमान करण्याची कलाही तिला चांगली अवगत होती. आमच्या इंग्रजीचे तर ती खास वाभाडे काढायची. तिच्या पुस्तकी छाप इंग्रजीपुढे आमचं इंग्रजी अगदीच बाळबोध वाटायचं. तिच्या मनाजोगतं नाही बोललं तर “मला काही कळलंच नाही“ असं म्हणायची. समोरचा दुखावला जातोय याची तमा ती बाळगायची नाही. मग बोलणार्‍याचं वाक्यं दुरुस्त करून पुन्हा त्याला ऐकवायची. तिच्याशी बोलणं म्हणजे आमचा इंग्रजीचा शिकवणी वर्ग असायचा. तिच्या सध्या बोलण्यातही अनेक इंग्रजी म्हणी, वाक्प्रचारांची पेरणी असायची. आमच्यातल्याच एका धांदरट मैत्रिणीला ती 'chicken with head cut off ' असं चिडवायची. एकदा तिने जेन-जेन कडून एक पुस्तक वाचायला नेलं, ते बरेच दिवस तिने जेन-जेन ला परत केलं नाही. जेन-जेन ने तिच्या घरी जाऊन पाहिलं तर त्या पुस्तकावर अजून काही पुस्तकं ठेवलेली तिला आढळली , त्यावर जेन-जेन तिला म्हणाली, “You are using my book as the coaster for your books.” जेन-जेन मुलांची फार लाडकी. ती आली कि मुलं तिला गराडा घालायची. नेहमी मुलांसाठी काही न काही गिफ्ट घेवून यायची. त्यांच्याशी गप्पा मारायची. आमच्यापैकी कुणी आजारी पडलं तर गुपचूप घराबाहेर 'get well soon' चं फुगा आणि चॉकलेटचं पाकीट ठेऊन जायची. मनानं फार उदार पण तिची पुस्तकं मात्र कुणाला द्यायची नाही. तिचं घर म्हणजे छोटीशी लायब्ररीच होती. विज्ञानापासून सामाजशास्त्रापर्यंत विविध विषयांची पुस्तकं तिच्याकडे होती. संगीतापासून खागोलशास्त्रापार्यांत सगळ्यातलं सगळं तिला कळायचं. तिच्याकडे मायक्रोस्कोप होता तसंच पियानोही होता.तिचा व्यासंग दांडगा होता. भांबावल्या मनाने तिच्यापुढे प्रश्न घेऊन गेलो की चुटकीसरशी मनाचा गुंता सोडवायची.

जेन-जेन देव किवा धर्म मानायची नाही. पण तिच्या म्हणण्यानुसार दोन वर्षांपूर्वी येशू ख्रिस्ताने तिला स्वप्नात येवून दृष्टांत दिला. तेव्हापासून ती चर्चशी जोडली गेली. चर्चच्या कॉयरमध्ये गायची. तिला कधी आम्ही गायचा आग्रह केला की मजेत म्हणायची, “मला कुठलं गाणं येतंय, कॉयर मधल्या इतक्या मोठ्या ग्रुप मध्ये मी नुसतं तोंड हलवलं तरी कुणाला कळणार आहे?” पण तिला संगीताची फार चांगली जाण होती. भारतीय संगीतही तिला फार आवडायचं. ती म्हणायची, “तुम्ही भारतीय, गणितात इतके हुशार कसे असता ते तुमच्या संगीतावरून कळतं.” तिच्या डान्स मध्ये नजाकत असायची तशीच तिच्या वॉकमधे चपळाई असायची. आम्हाला प्रश्न पडायचा हिला इतकी उर्जा मिळते कुठून? ती एकटीच रहायची, पण एकलकोंडी नव्हती. मुलगा लग्न करून दूरच्या शहरात राहत होता. त्याच्या आयुष्यात आपली ढवळा-ढवळ नको म्हणून वेगळी रहायची. तिला माणसांच्या गराड्यात राहायला आवडायचं. आमच्या एखाद्या get together चं निमंत्रण तिला गेलं नाही तर ती फुरंगटून बसायची.

वर्षभरापूर्वी जेन-जेन ला कॅन्सर झाला. ”मला कॅन्सर झालाय” हे तिने आम्हाला “मला सर्दी झालीय” इतक्या सहजपणे सांगितलं. कॅन्सरने एक किडनी निकामी केली, ट्युमरच्या ऑपरेशन ने पोटावर एकवीस टाके पडले तरी ती पूर्वीच्याच उत्साहाने आमच्यात वावरायची. किमोथेरपीमुळे जेव्हा डोक्यावरचे सगळे केस गेले तेव्हा आरशात स्वतःला बघून खो-खो हसायला लागली. “I better use cap,or people will get scared of me.” असं म्हणून स्वतःला चिडवायची. हे पूर्ण वर्ष आम्ही तिला कॅन्सरशी लढताना पाहिलंय. खूप चिवट झुंज दिली तिने. एकटीच दूरच्या हॉस्पिटल मध्ये जायची, सगळा प्रवास एकटीच करायची. पण कधी मदतीसाठी कुणाकडून अपेक्षा नाही करायची. आम्ही स्वतःहून विचारलं तरी मदत घ्यायला नकार द्यायची. सहानुभूतीचा तिला तिटकारा होता. आयुष्यभर ताठ मानेने जगलेल्या जेन-जेन ची देव परीक्षा घेत होता बहुधा. पण मोडून पडेल ती जेन-जेन कसली.हळू हळू कॅन्सर ने तिच्या शरीराचा ताबा घेतला. नेहमी ब्रिटीश पद्धतीची ह्याट घालून, मेक-अप करून समोर येणारी प्रसन्न जेन-जेन हल्ली खूप मलूल दिसायची. थोडं बोलली की तिला धाप लागायची. हल्ली बर्‍याचदा आमचा नजरेनेच संवाद व्हायचा. जगण्याची जिद्द तिच्या नजरेत दिसायची. तिला अजून जगायचं होतं. कधीकाळी आयुष्याला कंटाळून झोपेच्या गोळ्या घेवून मृत्यूला जवळ करू पाहणारी जेन-जेन आज मृत्यूशीच दोन हात करीत होती.

शेवटी कॅन्सर जिंकला. जेन-जेन हरली. तीन महिन्यांपूर्वी जेन-जेन गेली. तिला पहिल्यांदा मी कुणापुढे तरी हरताना पाहिलं. तिच्या मृत्यूआधी पंधरा दिवस तिचा मुलगा तिच्याबरोबर होता. जमेल तशी आईची सेवा करीत होता. मृत्युसमयीमात्र तो तिच्या जवळ नव्हता. तो दोन आठवड्यांनी आला. तोपर्यंत तिचं पार्थिव शवागारात ठेवलं होतं. तो आला पण आईच्या दफन क्रियेला गेला नाही. “मी खूप दमलोय.मला विश्रांतीची गरज आहे.” म्हणाला. त्याने हॉस्पिटलवाल्यांना परस्परच दहन उरकून घ्यायला सांगितलं. आईचं अंतिम दर्शन घेण्याचीही इच्छा त्याला नव्हती. आमच्या भारतीय मनाला हे पटण्यासारखं नव्हतं. कदाचित जेन-जेन लाही याचं दुःख नक्कीच झालं असेल. आयुष्यभर सोसल्यावर निदान जाता जाता तरी हे दुःख तिच्या वाट्याला का यावं? की इथेही ती हरली?

माझ्या घराशेजारच्या चर्चची बेल वाजली कि जेन-जेन ची तीव्रतेने आठवण येते. कधी कुठला निर्णय घेताना गोंधळ उडाला की हटकून ती आठवते. तिच्या इ-मेल आयडी वर आता कधीच मेल पाठवता येणार नाही, सेल मधला तिचा फोन नंबर कायमचा बंद झाला. तिचा “Please leave your name and number. I'll get back to you as soon as possible.” असा मेसेज आता कधीच मिळणार नाही.कारण ती अशा पत्त्यावर शिफ्ट झालीय जिथून she will never get back to us.
--
जान्हवी केंडे
janhavi.kende@gmail.com

6 comments:

Unknown October 20, 2011 at 12:03 PM  

खरच अस दुर्मिळ व्यक्तिमत्त्व अनुभवायला हव प्रत्येकाने..

फार सुंदर व्यक्तिचित्रण ..ओघवतं..

क्रांति October 20, 2011 at 8:53 PM  

खूप चांगलं रेखाटलं आहे. जेन-जेन कधी आपल्यालाही भेटली आहे की काय, असं वाटावं इतकं जीवंत चित्रण!

Kanchan Karai (Mogaraafulalaa) October 22, 2011 at 1:11 PM  

जेन-जेनचं व्यक्तिमत्व डोळ्य़ांसमोर उभं राहिलं. किंचित कठोर, थोडी विक्षिप्त पण आतून प्रेमळ असलेली जेन-जेन सारखी एकतरी मैत्रीण हवीच.

Meenal Gadre. October 24, 2011 at 5:41 PM  

व्यक्तिरेखा तंतोतंत समोर उभी राहिली.

अपर्णा October 25, 2011 at 12:35 AM  

खूप ओघवतं लिहिलंय ....अगदी डोळ्यापुढे जेन-जेन उभी राहिली...

Unknown November 3, 2011 at 12:07 AM  

Excellent article ,Keep it up.

God has given you excellent command

on Marathi Language.

One day you will be recognized as

great author

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP