रिझवान चाचा - भाग ३

त्यादिवशी रात्री रिझवान चाचांचा डोळ्याला डोळा लागला नाही, इम्रान मित्राकडे थांबतोय म्हणून फोन आला होता बस्स. चाचा एकटेच आपल्या खोलीत आरामखुर्चीत बसून, छताकडे टक लावून बघत होते. त्यांची नजर शून्यात हरवली होती. त्यांना वाटलं एक मस्त ग्लास दारू पिऊन नशेत हरवून जाऊ, पण जग्याला ते आवडत नसे म्हणून त्यांनी बाटली तशीच ठेवून दिली. काय करावे त्यांना सुचत नव्हते. रोज तो पोरगा सकाळ-संध्याकाळ त्यांच्या घरात हक्काने फिरत असे, काय हवं काय नको ते बघत असे. आज तो आपल्यात नाही, कसं पचवणार हे? त्याच्या आईने कोणाकडे बघावं. तिचं तर कोणीच नाही या जगात. विचार करून करून त्याचं डोकं भणभणायला लागलं. त्यांनी झोपेची गोळी घेतली आणि खुर्चीत पडून राहिले. सकाळी ९ च्या आसपास त्यांना जाग आली. इम्रान कोणाशी तरी फोनवर बोलत होता. चाचांनी इम्रानला आपल्याकडे बोलावले.

"बेटा, तुला माहित आहे का, आपलं जग्या आता ह्या जगात नाही. कालपरवापर्यंत घरभर फिरणारी ती पावलं परत दिसणार नाहीत."

"पता हैं अब्बा, मोहसीन ने बताया. बहोत बुरा हुआ.."

"त्याच्या मर्जीसमोर कोणाचं काही चालत नाही... अच्छा हुआ तूने फोन कर दिया. मुझे बहोत फिक्र हो रही थी, पर तू कहां था इतने देर?"

"अब्बा, मित्राकडे होतो माहीमला, नवीन जागेच काम बघायला गेलो होतो आणि मग हे असं झालं, मित्राकडेच थांबलो रात्री."

"अच्छा..."

"खूप लोकं गेली, अल्लाह उन्हे जन्नत बक्शे, चलो अब्बा बहोत काम पडा हैं."

"अरे आज तो जग्या के घर चल..."

"अब्बा, तुम्हाला जायचं तर जा, मी नाही येणार. एक तर आता कुठे धंद्यात जम बसतोय आणि तुम्ही..."

"ठीक आहे...ठीक आहे... जा तू."

----------

रिझवान चाचा जग्याच्या आईचे सांत्वन करून घरी येत असताना, ५-६ लोकं आपल्या घरात शिरताना दिसतात. ते लगबगीने घरात जातात. इम्रानच्या ऑफिसमधून जोरजोरात हसण्याचा आवाज येत असतो. दोन जाडसर लोकं साहेब लोकं, इम्रानची पाठ थोपटत असतात. रिझवान चाचांना आपल्या मुलाचा गर्व वाटतो, लेकाने नक्कीच मोठं काम केलंय. म्हणून तर ही साहेब मंडळी घरी आली आहेत त्याचं कौतुक करायला. ते त्याचं बोलणं ऐकायचा प्रयत्न करतात.

तो साहेब म्हणत असतो, "इम्रान अपनी जिम्मेदारी बखुबी निभायी है. अल्लाहताला तुम्हे बहोत तरक्की दे."

"क्यों शरमिंदा कर रहे हो साब, सब आपकी वजह से तो हुआ हैं."

"खुश रहो... मैने सुना तुम्हारा कोई नजदिकी रिश्तेदार गुजर गया इस ब्लास्ट मैं.."

"नही नही..कोई नही.. अब्बा का एक नौकर मर गया इसमें."

"अच्छा... ठीक हैं. जनरल तुम्हारे काम सें बहोत खुश हैं. तुम्हे इनाम मैं ये दस करोड रुपये भेजे हैं." (एक मोठी बॅग इम्रानकडे सरकवतो, इम्रान हात मिळवतो.)

रिझवान चाचांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, आपल्या पोराने इतक्या लोकांचे जीव घेतले आणि त्याला त्याचे काहीही वाटत नाही. तो बेशरमपणे फिरतोय जगभर. स्वतःची कीव वाटली त्यांना. काय करावं सुचत नव्हते. कोणा एका माणसाचे आयुष्य संपवण्याचा अधिकार देवाने आपल्याला कधी दिला? धर्माच्या नावाखाली लोकं राजकारण करून मोकळे होतात पण त्याचे परिणाम सामान्य माणसाला भोगावे लागतात. काय करायचं अशा धर्माचं? आपल्या खोलीत डोक्याला हात लावून बसले होते. डोकं बधीर झालं होत, आपल्या संस्कारात काय कमी पडलं आणि अशी औलाद निपजली आपल्या पोटी असा अल्लाहला सवाल करत होते. राहून राहून त्यांना जग्याच्या प्रेताजवळ धायमोकलून रडणारी ती आई दिसतं होती. डोळ्यातून वाहणार्‍या अश्रूंच्या धारा थांबायचं नावं घेत नव्हत्या. मध्यरात्री उशीरा गुपचूप ते जग्याच्या घराजवळ गेले आणि तिथे एका बॅगेत आपली आजवरची मिळकत ठेवली. माहित होतं त्यांना, हे केल्याने जग्या परत येणार नाही पण त्या मातेला कोणासमोर हात पसरायला लागू नये म्हणून त्यांनी...

तिथे ओसरीवर शांत बसले थोडावेळ, तिथून जग्याची चहाची टपरी दिसत होती. एकदम गिर्‍हाइकांची गर्दी सांभाळणारा जग्या डोळ्यासमोर आला. त्यांनी डोळ्यांच्या कडा पुसल्या आणि घराकडे चालू लागले. इम्रानच्या ऑफिसमध्ये जोरजोरात गाणी सुरु असल्याचा आवाज आला.

चाचा आत डोकावून बघतात, इम्रान नशेत एकदम टून् झालेला असतो. बोलता येत नव्हते पण गाणी बोलायचा प्रयत्न करत होता. त्याचं असं हे रूप बघून चाचांना राहावलं नाही, त्यांच्या डोळ्यात संतापाने रक्त उतरलं होतं. क्षणात त्यांनी बाजूला पडलेली लोखंडाची शीग उचलली आणि त्याच्या डोक्यात मारली.

"मर साल्या मर... तुला ह्या दिवसासाठी नव्हता मोठा केला... तुझी अम्मी वर रडत असेल. का केलंस तू असं? काय मिळालं तुला हकनाक लोकांना मारून?"

(इम्रान वेदनेने कळवळत होता) "अब्बा, मुझे अस्पताल ले चलो. आप की कुछ गलतफैमी हुयी है. हमें बहोत पैसा मिलेगा. हम अमीर होंगे.. मैं आप को सब बताता हूं... मुझे ले चलो..."

"या अल्लाह! क्या करुं इस नामुरादका. अब भी इसे अपने गलती का एहसास नही हो रहा."

असं बोलून त्यांनी जोरदार घाव घातला आणि इम्रानचा देह शांत झाला. ते लहान मुलासारखे रडत बाहेर आले. आपल्या वखारीवर नजर फिरवली. आजवर बापजाद्यांनी केलेली मेहनत त्यांच्या समोर होती. त्यांनी किचनमधून एक कॅनभरून रॉकेल आणलं आणि वखारीच्या लाकडाच्या ढिगांवर रितं केलं. काडीपेटी पेटवून, त्या ढिगावर फेकली. संपूर्ण वखार सूंऽ सूंऽ सूंऽ करत पेटली. त्या आगीच्या प्रकाशात चाचांचा चेहरा शांत भासत होता. ते शांतपणे आपल्या खोलीत गेले आणि स्वत:ला गळफास लावून घेतला.

एका आईच्या मुलाच्या हत्येचं त्यांनी प्रायश्चित्त घेतलं होतं... प्रायश्चित्त घेतलं होतं!!

भाग १ भाग २ भाग ३

--
सुहास झेले
suhas.zele@gmail.com

24 comments:

Unknown October 20, 2011 at 12:47 PM  

सुन्न झालो वाचून... शब्द सुचत नाहीयेत.

क्रांति October 20, 2011 at 6:09 PM  

खरंच सुन्न केलं रे सुहास! एकीकडे माणुसकी आणि दुसरीकडे दहशतवाद यांचं द्वंद्व. शेवटपर्यंत खिळवून ठेवते कथा.

विनायक पंडित October 20, 2011 at 7:09 PM  

:( :( :( :( लेखन छान जमलंय सुहास! भिडणारं आहे! लेखनाचा फॉर्मही आवडला!

Anonymous,  October 20, 2011 at 8:50 PM  

सुहास खुपच सही लिहिली आहेस कथा ...सहजच आणि परिणामकारक ...

Kanchan Karai (Mogaraafulalaa) October 21, 2011 at 12:14 PM  

सुहास, फार बोधपूर्ण कथा आहे. धर्माच्या नावाखाली दुष्कृत्य करणार्‍यांमुळे संपूर्ण समाज बदनाम होतो. जग्या आणि रिझवान चाचासारखे चांगले नातेसंबंध प्रत्यक्षात असणार्‍या दोन व्यक्तींमधेही कटूता येते ती धर्मांधा दुकृत्यांमुळेच.

priti,  October 21, 2011 at 7:42 PM  

faarch boar watala..
picture chi story watate wachatana..

अपर्णा October 21, 2011 at 10:02 PM  

सुन्न करून टाकणार कथानक...सुहास याच नाव "प्रायश्चित्त " असलं तरी चांगल वाटलं असतं असं सुचवलं तर वाईट नाही वाटणार ना?

Suhas Diwakar Zele October 22, 2011 at 2:46 AM  

योग,

धन्यवाद :) :)

Suhas Diwakar Zele October 22, 2011 at 2:46 AM  

बाबा,

धन्स रे !!

Suhas Diwakar Zele October 22, 2011 at 2:46 AM  

धन्स क्रांतीताई... :)

Suhas Diwakar Zele October 22, 2011 at 2:48 AM  

पंडितकाका,

असंच एक प्रयत्न करून बघितला... धन्यवाद !!

Suhas Diwakar Zele October 22, 2011 at 2:48 AM  

देवेंद्र, धन्स रे भावा !!

Suhas Diwakar Zele October 22, 2011 at 2:49 AM  

कांचनताई,

धन्स गं... :)
धर्माच्या नावाखाली दुष्कृत्य करणार्‍यांमुळे संपूर्ण समाज बदनाम होतो.. +१

Suhas Diwakar Zele October 22, 2011 at 2:52 AM  

प्रिती,

खुल्या दिलाने प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार...

मी लेखक नाही, जे लिहितोय ते सुद्धा शिकतोय. तुम्ही चुका सांगत चला, मी शिकत राहीन. धन्यवाद :) :)

Suhas Diwakar Zele October 22, 2011 at 2:54 AM  

अपर्णा,

हे नावं पण आलं होत मनात... मला सारखं वाटत होत हेच द्यावं शीर्षक...आणि वाईट काय वाटायचं, हक्काने सांग गं :) :)

Meenal Gadre. October 22, 2011 at 7:11 AM  

काही मेसेज देणा-या कथेला अनुसरून भाषा आहे.

अमित गुहागरकर October 24, 2011 at 10:33 AM  

मन सुन्न करणारी कथा..!

Nisha October 24, 2011 at 4:24 PM  

सुरेख! कथा वाचल्यावर क्षणभर सुचलंच नाही काही.
कथा लिहिण्याचा हा प्रयत्न खूपच यशस्वी झालाय.
असंच लिहित रहा. अभिनंदन.

सुधीर कांदळकर,  October 25, 2011 at 5:41 AM  

छान.

भानस October 26, 2011 at 4:53 PM  

दोन प्रकृतिंचा झगडा अव्याहत सुरुच आहे.कथा आवडली!

pavan46 October 28, 2011 at 3:16 PM  

really heart touching.... its stopped my thinking for a while

But still cant understand why we r fighting ?????????

vidhya,  December 10, 2011 at 12:09 AM  

kharch khup sundar kathanak ahe...sevati angavar kata aala vachun....khupch chhan........

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP